जाणून घ्या धनत्रयोदशीला का करतात देवाची पूजा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 11:45 AM2017-10-17T11:45:54+5:302017-10-17T12:22:37+5:30

या दिवशी वर्षभरातील जमापूंजी देवासमोर ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीचा दिवस सुवर्ण खरेदीसाठीही महत्वाचा मानला जातो.

Why do you worship God on Dhanteras? | जाणून घ्या धनत्रयोदशीला का करतात देवाची पूजा?

जाणून घ्या धनत्रयोदशीला का करतात देवाची पूजा?

Next
ठळक मुद्देधनप्राप्तीसाठी आपण धनाची पूजा करतो म्हणूनच हा दिवस व्यापारी वर्गासाठी महत्वाचा असतो. धनत्रयोदशीचा दिवस सुवर्ण खरेदीसाठीही महत्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी वैद्य रुग्णांना कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून देतात.

धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाची सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून या सणाकडे पाहिलं जातं. आपल्या धनाची पूजा करून आपल्या भरभराटीसाठी या धनलक्ष्मीचे आज पूजन केले जाते. तसंच आज सुवर्ण विकत घेण्याचीही प्रथा आहे. साडेतीन मुहूर्तापैकी शुभ मानल्या जाणाऱ्या मुहूर्तात धनत्रयोदशीचाही  समावेश आहे. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात सोनं, वास्तु खरेदी-विक्री होते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यापारी वर्गासाठी हा सण फार मोठा असतो. धनत्रयोदशीविषयी अशीच काही माहिती जाणून घेऊया.

अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारी धनत्रयोदशी सुख, संपत्तीचे द्योतक आहे. ज्या गोष्टींमुळे आपला उदरनिर्वाह होत असतो त्याची आज पूजा करण्याचा दिवस. म्हणजे आपल्याजवळील धनाची पूजा करण्याचा दिवस. जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांनाही आपल्या संस्कृतीत धन म्हटलं जातं.

धनप्राप्तीसाठी आपण धनाची पूजा करतो म्हणूनच हा दिवस व्यापारी वर्गासाठी महत्वाचा असतो. लहान व्यापारी वर्ग त्यांचं व्यवसायिक वर्ष दिवाळी ते दिवाळी असं साजरा करतात. त्यामुळे या दिवशी नवीन चोपडी आणून त्याची पूजा केली जाते आणि नव्या वर्षाची सुरुवात केली जाते. काहींच्या मते या दिवशी वर्षभरातील जमापूंजी देवासमोर ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे.धनत्रयोदशीचा दिवस सुवर्ण खरेदीसाठीही महत्वाचा मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केल्यास वर्षभर घरात सुख, संपत्ती नांदते असं म्हटलं जातं. त्यामुळे कित्येकजण थोड्याफार प्रमाणात का होईना आज सोने खरेदी करतातच.

आजचा दिवस वैद्यांसाठीही महत्वाचा असतो. धनत्रोयदशीदिवशी धन्वंतरी देवेतची जंयती साजरी केली जाते. त्यामुळे आज वैद्य धन्वंतरी देवतेची पूजा करतात. चार हात असलेल्या धन्वंतरिच्या एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख तर चौथ्या हातात चक्र असते. या साऱ्या गोष्टींच्या आधारे धन्वंतरि रोगांना आणि व्याधींना बरे करत असतात. तसेच आजच्या दिवशी वैद्य रुग्णांना कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून देतात.

Web Title: Why do you worship God on Dhanteras?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.