पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फाचे थर कमी होत आहेत. किनारपट्टीच्या भागांना त्यामुळे धोका आहे; पण तापमान वाढीमुळे यापेक्षा मोठे संकट येऊ शकते असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास पृथ्वीवरील माणसांची उंची कमी होऊ शकते. सायन्स अ‍ॅडव्हॉन्सेज जर्नलमध्ये प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ५.३७ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अशीच स्थिती निर्माण झाली होती, तेव्हा पृथ्वीचे तापमान ३ अंशांनी वाढले होते. ही स्थिती १.८0 लाख वर्षांपूर्वीपर्यंत कायम होती. या काळात पृथ्वीवरील प्राण्यांची सरासरी उंची १४ टक्क्यांनी कमी झाली होती. अमेरिकेतील व्योमिंग येथील बिगहॉर्न बेसिनमध्ये सापडलेल्या प्राण्यांच्या काही जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर हे तथ्य समोर आले. घोडे, गायी, मेंढ्या आणि गेंडे यासारख्या अनेक प्राण्यांचे जीवाश्म येथे आहेत. यातील बहुतांश सर्व प्राण्यांची शारीरिक उंची आताच्या त्यांच्या वंशजांच्या तुलनेत १४ टक्के कमी आढळून आली. शास्त्रज्ञांच्या मते, तापमान वाढल्यामुळे पृथ्वीवरील वनस्पती आणि खाद्यस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला. प्राण्यांना पुरेसे खाद्य मिळेनासे झाले. थोड्याशा खाद्यावरच त्यांची गुजराण सुरू झाली.
हळूहळू त्यांचे शरीर अनुकूल होत छोटे बनले. वजन कमी झाले. उंची कमी झाली. साहजिकच कमी खाद्यावर त्यांचे भागू लागले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आताच्या तापमान वाढीचाही असाच परिणाम होईल. त्यातून माणसेही सुटणार नाहीत. माणसांची उंची कमी होईल. वजन कमी होईल. तथापि, माणूस खाद्य साखळीत सर्वांत वरच्या स्थानावर टिकून राहील.