एका लग्नाच्या पत्रिकेची गोष्ट; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 11:19 AM2018-04-09T11:19:20+5:302018-04-09T11:19:20+5:30

हटके लग्नपत्रिकेची सर्वत्र चर्चा

cop in Rajasthan prints traffic rules on wedding cards to spread awareness | एका लग्नाच्या पत्रिकेची गोष्ट; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

एका लग्नाच्या पत्रिकेची गोष्ट; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Next

लग्न पत्रिका म्हटलं आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट चित्र उभं राहतं. वधू वरांसोबत जवळच्या नातेवाईकांची नावं, विवाह स्थळाचा पत्ता, विवाहाची तारीख, मुहूर्त असं लग्नपत्रिकेचं स्वरुप असतं. मात्र राजस्थानातल्या वाहतूक विभागात काम करणाऱ्या एका महिला उपनिरीक्षकाच्या लग्नाची पत्रिका सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतेय. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झालीय.

भरतपूरमध्ये वाहतूक पोलिसात उपनिरीक्षक असलेल्या मंजू फौजदार १९ एप्रिलला विवाह बंधनात अडकणार आहेत. सध्या लग्नपत्रिकांच्या वाटपाचं काम जोरात सुरूय. त्यांनी त्यांच्या लग्नपत्रिकेवर वाहतुकीचे नियम छापले आहेत. त्यामुळेच त्यांची लग्नपत्रिका अतिशय लक्षवेधी ठरतेय. लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी मंजू यांनी त्यांच्या लग्नपत्रिकेवर वाहतुकीचे नियम छापले आहेत. 

वाहतूक पोलीस विभागात काम करत असल्यानं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं काय घडतं, हे मंजू दररोज जवळून पाहतात. बहुतांश तरुण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे वारंवार दुर्घटना घडतात आणि त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करुन सुरक्षित राहावं, असं मंजू यांना वाटतं. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या लग्नपत्रिकेवर वाहतुकीचे नियम छापले आहेत. 

मंजू फौजदार यांच्या कुटुंबावर अपघातांनी अनेक आघात केले आहेत. भरतपूरमधल्या बेलारा कला गावात राहणाऱ्या मंजू यांचे वडिल ईश्वर सिंहदेखील पोलीस विभागात होते. मात्र एका अपघातात त्यांचं निधन झाले. त्यावेळी मंजू अवघ्या एका वर्षाच्या होत्या. मंजू यांचा एकुलता एक भाऊ देवेंद्र सिंहदेखील अपघातानं त्यांच्यापासून हिरावला गेला. मंजू यांनीही पोलीस व्हावं, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मंजूच्या आईनं प्रचंड कष्ट घेतले आणि मंजूनेही त्या कष्टांचं चीज केलं. आता वाहतूक पोलिसात उपनिरीक्षक असलेल्या मंजू विवाह बंधनात अडकणार आहेत. अपघातामुळे कोणत्याही कुटुंबाचं नुकसान होऊ नये, असं त्यांना वाटतं. त्यामुळेच त्या अनोख्या पद्धतीनं लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा प्रयत्न सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतोय. 
 

Web Title: cop in Rajasthan prints traffic rules on wedding cards to spread awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न