आफ्रिकी वंशाच्या अशा दोन बहिणींची ही कहाणी आहे, ज्यांना आपल्या घनदाट आणि कुरळ्या केसांची आधी लाज वाटायची; पण आता त्यांना त्याचा अभिमान वाटतो. किपरियाना क्वान आणि टी. के. वंडर अशी त्यांची नावे असून, त्या जुळ्या बहिणी आहेत. त्यांचे केस इतके कुरळे आणि घनदाट होते की, त्यांची देखभाल करणे अशक्यच व्हायचे. मोकळे सोडले की, त्यांचा गुच्छ व्हायचा. त्या सतत सलूनमध्ये जाऊन केस स्ट्रेट करून आणायच्या. त्या जसजशा मोठ्या झाल्या, तसतसे त्यांच्या लक्षात येऊ लागले की, लोक आपल्या केसांकडे आकर्षित होतात. त्या रस्त्याने जात असल्या तर लोक उभे राहून त्यांच्या केसांकडे पाहतात. त्यांनी सोशल मीडियावर आपली छायाचित्रे टाकली तेव्हा त्यांच्या केसांची लोकांनी प्रचंड तारीफ केली. लवकरच त्यांना लक्षात आले की, आपले केस आपले वैभव आहे. मग त्यांनी केसांची नैसर्गिक स्थितीत काळजी घ्यायला सुरुवात केली. आता इन्स्ट्राग्रामवर संपूर्ण जगातील लोक त्यांच्या केसांची तारीफ करीत आहेत.आता त्यांनी आपल्या एका मैत्रिणीच्या साथीने ‘अर्बन बुश बेब्स’ या नावाने ब्लॉग सुरू केला आहे. टी. के. वंडरने म्हटले की, आधी मला माझे केस अजिबात आवडत नसत. ते इतके दाट आणि कुरळे आहेत की, त्यांची कोणतीच स्टाईल करता येत नव्हती; पण आता सगळ्या जगातून लोक माझ्या केसांना पसंती देत असल्यामुळे मला ते आवडू लागले आहेत.