अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:56 PM2018-03-17T12:56:05+5:302018-03-17T12:56:05+5:30

where do I go? | अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?

अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?

Next

काही माणसांनी स्वत:चं नकारात्मक कौतुक करून घेण्याचा छंद जोपासलेला असतो. छंद जोपासलेला असतो, असे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग झालेला असतो. आपण खूप दु:खी आहोत. उपेक्षित आहोत, सगळ्या जगाने केलेल्या अन्यायाला बळी पडलेले आहोत, असा गंड त्यांनी स्वत:शी प्रयत्नपूर्वक जोपासलेला असतो. अशी माणसं जाणीवपूर्वक बापूडवाणी असतात, दीनवाणी हसतात आणि केविलवाणी दिसतात.
पण म्हणजे ती खरोखरीच तशी असतात असं नाही. सुप्रसिद्ध देवस्थानीच्या भिकाऱ्याला, बॅँकेत लाखो रुपये जमा असूनही भीक मागण्याचा धंदा चालवण्यासाठी जसे, केविलवाणे, बापुडवाणे, भणंग, दरिद्री रूप धारण करावे लागते, तशी ही माणसं आतून अहंकार, महत्त्वाकांक्षी वगैरेच असतात. कोणी सहानुभूती दाखवत त्यांना म्हटलं की ‘अप्पासाहेब, खरंच तुमच्या लायकीपेक्षा तुम्हाला फारच कमी मिळालंय. जे मिळालंय ते अगदी न मिळाल्यासारखं, नगण्य आहे.!’ की अंतरी सुखावत अप्पाजी म्हणणार, ‘माझ्या लायकीनुसार माझ्या पदरात माप घाला, अशी भीक मागत मी कोणापुढे पदर पसरणाºयांतला नाही. तुमच्यासारख्या गुणग्राहक स्रेह्याला माझी कदर आहे हेच खूप झालं.’ खरेतर अप्पाजी आतून सुखावलेले असतात आणि तो सद्गृहस्थही मनातल्या मनात हसत असतो. कारण अप्पाजींनी मागल्या दाराने किती सत्ताधिशांपुढे डोळ्यात पाणी आणून आणून पदर पसरलेले आहेत, हे त्याला चांगले माहीत असते. एखाद्याला भस्म्यारोग झालेला असला की त्याला कितीही खाऊ घातलं तरी आणखी हवं असतं. तसं अशा व्यक्तीची स्वकौतुकाची भूक कधीच भागत नाही आणि म्हणून आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्याला काहीच मिळालेलं नाही, ही खंत बाळगत ते आयुष्यभर ‘खपाटपोटी’ जगतात.
अतृप्त आत्म्यांचे म्हणतात, मेल्यावर भूत होते,
ह्या अतृप्तांचे भूत, जिवंतपणीच झालेले असते.
लायकीपेक्षा ह्यांना जास्तच मिळालेले असते,
त्यांच्या लेखी मात्र ते खूप्पच कमी असते.
असे अतृप्त, जीवनाची माती करून घेतात,
जीवन म्हणजे सरणापुढचे क्रंदन करून घेतात.
(पूर्वार्ध)
- प्रा. अनिल सोनार

Web Title: where do I go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव