चिरंजीव काय करतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:54 PM2018-07-15T17:54:19+5:302018-07-15T17:54:42+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल यांनी लिहिलेलं खुसखुशीत...

What does the old age do? | चिरंजीव काय करतो?

चिरंजीव काय करतो?

googlenewsNext


परवा लग्नाच्या पंगतीत एकाने विचारले, सर, तुमचा चिरंजीव का? मी म्हटले हो. काय करतोय? मी म्हटले बारावी झालीय. मग पुढे काय ठरवलंय. मी म्हटले, काही नाही. व्यवसायात वळवायचंय. त्यांना प्रचंड आश्चर्य वाटले. प्राध्यापकाचा पोरगा. हुशार, गुणवंत, मेडिकल, फार्मसी, आयआयटी असं काहीतरी उत्तर त्यांना अपेक्षित होतं.
काही वर्षांपूर्वी आमच्या शहरात नवीनच आयटी पॉर्इंट म्हणून एक फॅड सुरू झालं. या पॉर्इंटमध्ये नामांकित आयआयटीचे प्राध्यापक शिकवायला येणार, भरपूर सराव परीक्षा होणार. कोटा येथे मिळणारे शिक्षण गावातच मिळणार, पोरं आयआयटीयन्स होतील. अमूक पॅकेज मिळवतील. गाजावाजा, प्रसिद्धी खूप झाली. पालक भुलले. कर्ज काढून शुल्क भरले. स्वप्ने रंगवली गेली. आम्हालाही पाल्य येथेच टाका म्हणून सांगितलं गेलं. दिशा निश्चित असल्याने आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही. या व्यवस्थेतून आजवर कुणी आयआयटीला प्रवेशपात्र झाला नाही. शहरात प्रथम येऊनही मी माझा पाल्य या पॉर्इंटला टाकला नाही म्हणून प्रचंड आश्चर्य वाटणाऱ्यांनी पाहून घेतले. काही तर या पॉर्इंटला पाल्याचे अ‍ॅडमिशन न घेऊन पाल्याचे भविष्य खराब करता आहात, असा अभिप्राय व्यक्त करून गेले.
क्लासेस, खासगी शिक्षण संस्थांचे असे पॉर्इंटस् या समांतर व्यवस्थेने पालकांना गांगरून सोडले आहे. या व्यवस्थेने पालकांना अशी भीती अप्रत्यक्षपणे दाखविली आहे की, आमचा क्लास तुम्ही जॉईन केला नाही तर तुमच्या पाल्याला भवितव्यच नाही. त्याला गवंड्यांच्या हाताखाली कामाला जावे लागेन. तुम्ही जागरूक पालक आहात ना? अशा शीर्षकाची हस्तपत्रिका वाटून पालकांवर दबाव आणला जातो.
खरे तर पालकांनीच विवेकी होण्याची गरज आहे. युपीएससीसारख्या परीक्षेत प्रथम येणाºया मुलांना ४५ ते ५५ टक्के एवढेच गुण मिळतात. हे सर्व टॉपर्स पाठ्यपुस्तकांचाच अभ्यास करतात. संबोध आणि आकलनावर भर देतात. स्वयंअध्ययन करतात. नोटस् स्वत: काढतात. सराव परीक्षा देतात. यशाचा राजमार्ग तो हाच, असे पॉर्इंटस्, क्रॅश कोर्सेस, रेडिमेड गाईडस्, क्लासेस हा भूलभुलैय्या आहे. पालकांना दरिद्री करण्याचं हे षङ्यंत्र आहे.
बरे, मुलांनी चांगले गुण मिळविल्यानंतरही व्यवसायाकडे का वळू नये? नोकरी श्रेष्ठ ही मानसिकता मध्यमवर्गीयांनी सोडून देण्याची गरज आहे. उद्योग व्यवसायाकडे आता या वर्गाने जाणीवपूर्वक वळायला हवे. बी.फॉर्मसी, बी.टेक, एम.फॉर्मसी, एम.टेक हे पदवीधारक १५-२० हजारांवर दिवसाचे १२-१४ तास खासगी कंपन्यांमधून राबत आहेत. त्यांच्यापेक्षा दहावी, बारावी झालेला प्लंबर, वायरमन, गॅरेज कारागीर जास्त आणि सन्मानाने पैसे मिळवितो. देशाला जिल्हाधिकाºयांची जशी गरज आहे तशीच ती एखाद्या प्लंबरचीदेखील आहे. ज्या क्षेत्रात सर्जनशीलतेला वाव नाही, यंत्रवत जीवनशैली आहे, वरिष्ठांचा जाच आहे, वैयक्तिक छंद जोपासायला अडचणी आहेत अशा क्षेत्रात जाणे म्हणजे विकार जडवून घेणे आहे.
पूर्वी पालकांना मुलांच्या शिक्षणाचीच काय ती फिकीर असायची. आता पाल्यांचे शिक्षण-नोकरी-छोकरी अशी तिहेरी फिकीर आहे. पस्तीशीची बाळं पालकांना पोसावी लागत आहे. वधूपित्यांना नोकरी करणाराच वर हवा आहे, ही स्थिती भयावह आहे. आता यापुढे शासकीय नोकºया कमी होत जाणार. प्रश्न अजून बिकट होणार. तेव्हा खºया अर्थाने सुजाण असणाºया पालकांनी व्यवसायाच्या अंगाने पाल्यांची महत्त्वाकांक्षा रुजवली व वाढवली पाहिजे. अमूक एखादा उद्योगपती फॅक्टरी सुरू करेल. त्या फॅक्टरीत माझ्या मुलाला रोजगार मिळेल या मानसिकतेऐवजी माझा मुलगाच फॅक्टरी टाकेल, असा आशावाद जागवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
मालक होण्याची मानसिकता रुजविण्याची गरज आहे. दीडशे वर्षे इंग्रजांच्या अखत्यारीत आपण गुलामीचे संस्कार पचविले. वस्तुत: आपला देश हा राज्यकर्त्यांचा देश, पण परिस्थितीला शरण जाण्याची मानसिकता आपण जोपासत गेलो. त्यामुळे धाडसी मानसिकता घडविण्याची गरज आहे.
-प्रा.डॉ.फुला बागुल, शिरपूर

Web Title: What does the old age do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.