The way to establish Chhatrapati Shivaji Maharaj statue at Chalisgaon is finally open | चाळीसगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचा मार्ग अखेर मोकळा
चाळीसगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचा मार्ग अखेर मोकळा

ठळक मुद्देरस्ता झाला अवर्गीकृत शिवजयंतीची भेटचाळीसगाववासीयांमध्ये समाधान

चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत सिग्नल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिग्नल पॉर्इंट ते मालेगाव नाक्यापर्यंतचा रस्ताच सार्वजनिक बांधकाम विभागाने अवर्गीकृत करण्याला सोमवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या शिवजयंतीदिनी येथे पुतळ्याचे भूमिपूजन करण्याला वेग येणार असून, शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती सिग्नल पॉर्इंट येथील त्रिकोणी जागेतील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व प्रस्तावित शिवसृष्टी उभारण्याचे नियोजन पालिकेने काही वर्षांपूर्वीच केले होते. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. शासनाने सोमवारी यातील रस्ता अवर्गीकृत करण्याचा निर्देश दिल्याने पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी विविध संघटनांनी आंदोलनेही सुरूच ठेवली होती. पुतळ्याजवळून जाणाऱ्या पालिका हद्दीतील सोलापूर-औरंगाबाद-धुळे रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११) अंतर्गत सिग्नल पॉर्इंट ते मालेगाव नाक्यापर्यंतचा रस्ता अवर्गीकृत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे टाऊन प्लॅनिंगच्या मान्यतेलाही आडकाठी येणार नसल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. गेल्या दीड वर्षांपासून आमदार उन्मेष पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले, असा दावा करण्यात आला आहे.
सिग्नल पॉर्इंट परिसरातील सर्वे क्रमांक ५१ मधील त्रिकोणाकृती जागेतील ६८० चौ.मी. जागा याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महसूल विभाग व महसूल विभागाकडून पालिकेला हस्तांतरण करण्यात आली आहे. तसेच पालिकेमार्फतदेखील शिवपुतळ्याची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र याा जागेजवळून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शासनाच्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या १०० मीटर अंतरात कोणतेही स्मारक व बांधकाम करता येत नव्हते. ही जागा राष्ट्रीय महामार्गाकडून अवर्गीकृत व्हावी, अशी मागणी बºयाच वर्षांपासून होती. याबाबत पाठपुरावा झाल्याने शासनाने मान्यता दिली आहे.
तीन कि.मी. रस्ता अवर्गीकृत
चाळीसगाव पालिका हद्दीतील सोलापूर-औरंगाबाद-धुळे रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११) यातील साखळी क्रमांक ३९७/८०० ते ४०१/०० (३.२० कि.मी.) लांबीचा रस्ता अवर्गीकृत करण्यात आला आला आहे. याच भागात सिग्नल पॉर्इंट येथे शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टीही उभारली जाणार आहे.

२० रोजी भूमिपूजन
गेल्या अनेक वर्षांपासून पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता. सोमवारी शासनाने परवानगी दिल्याने पुतळा उभारणीतील अडथळा दूर झाला आहे. २० रोजी नियोजित जागेवर भूमिपूजन करण्यात येईल.
- आशालता चव्हाण
नगराध्यक्षा, चाळीसगाव


Web Title: The way to establish Chhatrapati Shivaji Maharaj statue at Chalisgaon is finally open
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.