पाणी योजनांचा सुकाळ, लाभात मात्र दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:01 PM2019-03-16T16:01:46+5:302019-03-16T16:02:02+5:30

मंगरुळला घोटभर पाण्यासाठी भटकंती

Water Plans, Drought | पाणी योजनांचा सुकाळ, लाभात मात्र दुष्काळ

पाणी योजनांचा सुकाळ, लाभात मात्र दुष्काळ

Next

रावसाहेब भोसले
पारोळा : तालुक्यातील मंगरुळ या गावाला भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून टंचाईवर मात करण्यासाठी गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला जणू पाणी टंचाई पाचवीला पुजली आहे. एक प्रकारे येथे योजनांचा सुकाळ असला तरी प्रत्यक्षात त्यांचा लाभ मिळण्यात दुष्काळच असल्याचे चित्र आहे.
हिवाळ््यापासूनच टंचाईच्या झळा
मंगरुळ येथे डिसेंबर महिन्यापासून टंचाईचा झळा बसत आहे. या गावाची लोकसंख्या साडेतीन ते चार हजार आहे. १९९८मध्ये बिगर आदिवासी पाणी पुरवठा योजना खोलसर धरणावरून होती. पण खोलसर धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. यामुळे ही योजना बंद पडली. त्यानंतर गावात पाणी टंचाई समस्या निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी पुन्हा भारत निर्माण पाणी पुरवठा योजना गावाला दिली. तीही योजना बारगळली. आता पुन्हा एक कोटी पाच लाखांची योजना मुख्यमंत्री पेयजल या गावाला सुरू आहे. या योजनेचे विहिरीचे काम सुरू आहे. पण निधीअभावी ते कामदेखील रखडले आहे.
जीव धोक्यात घालून मिळते हंडाभर पाणी
मंगरुळ गावाला शासनाच्या तीन- तीन पाणी पुरवठा योजना राबविल्या गेल्या पण गाव पाणी टंचाईपासून मुक्त होऊ शकले नाही, हे विशेष. गावाला सद्यस्थितीत पाणी टंचाई समस्याने उग्ररूप धारण केले आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गावाला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत चार खेपा शासकीय टँकरने व दोन खेपा खाजगी टँकरने टाकले जाते. मग रणरणत्या उन्हात अबाल वृद्ध हे टँकर गावात दिसताच विहिरीवर एकच गर्दी करतात. विहिरीतून वाटेल त्या जागेवरून विहिरीतून पाणी तोलून काढतात आणि पिण्यासाठी हंडाभर पाणी भरतात.
विकतचे पाणी घेऊन गुरांना पाजावे लागते पाणी
पाऊस कमी झाल्याने आजुबाजूचे नाले, केटीवेअर भरले नाही. पाण्याचे स्रोतच नसल्याने ग्रामस्थांना एक ते दोन किलोमीटर जिथे शक्य असेल तेथून बैलगाडीने पाणी आणून आपल्या गुरांना दिले जात आहे. गुरांसाठी ५० रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घेऊन गुरांना पाजावे लागत आहे. गावाची कायमस्वरूपी पाणी टंचाई समस्या दूर व्हावी, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ सुनील पाटील यांनी केली.
तासन् तास टँकरची प्रतीक्षा
गावात वर्षातून किमान सहा महिने पाणी टंचाईशी सामना करावा लागतो. सध्या तर दिवसभर टँकरची वाट पहावी लागते. टँकर येण्याची निश्चित वेळ नसल्याने रणरणत्या उन्हात टँकर आले की धावपळ करून बादलीभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी तोलून काढावे लागते. कोणाचा धक्का लागून विहिरीत तोल जाऊन पडणार की काय अशी भीती कायम विहिरवर असताना वाटते, अशी प्रतिक्रिया गृहिणी उषाबाई पाटील यांनी दिली.
निधीअभावी योजना रखडली
गावात पाण्याच्या टँकरच्या केवळ सहा फेºया होतात. तेही विहिरीत टाकून ग्रामस्थ तोलूून पाणी काढतात. यात कुणाला पाणी मिळतं तर कोणाला मिळत नाही त्यातही टँकरची अनियमितता असून विहिरीत पाणी कधी टाकले जाते तर कधी टाकले जात नाही. त्यामुळे बºयाचवेळा पाण्याशिवाय दिवस काढावा लागतो. याआधी जलस्वराज्य योजना झाली पण गावात त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता मुख्यमंत्री पेयजल योजनाचे मंजूर आहे, मात्र निधीअभावी ते काम ठप्प आहे, असे सरपंच आरोस्तलबाई भिल यांनी सांगितले.
गावातील पाणी समस्येबाबत ग्रामसेविकेसी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचा अनुभव आला.

Web Title: Water Plans, Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव