तुरीची डाळ नव्वदी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:36 AM2019-05-23T00:36:28+5:302019-05-23T00:37:07+5:30

आयात बंदी, आवक घटण्यासह पावसाच्या अंदाजाने वाढताहेत भाव

Turtle dal cross 90 | तुरीची डाळ नव्वदी पार

तुरीची डाळ नव्वदी पार

googlenewsNext

जळगाव : कडधान्यावरील आयात बंदी, बाजारातील घटलेली आवक व आता मान्सून उशिरा येण्याच्या अंदाजाने डाळींच्या भावात पुन्हा वाढ होऊ लागली असून तूर डाळीचे भाव तर नव्वदी पार गेले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तूर डाळीचे भाव ४०० ते ६०० रुपयांनी वाढून ते ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. या सोबतच सर्वच डाळींना महागाईचा तडका बसला असून त्यादेखील सरासरी ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढल्या आहेत. यात तीन वर्षांपासून दिलासा देणाऱ्या डाळींनी गृहिणींची चिंता पुन्हा एकदा वाढविली आहे.
कमी पावसामुळे सुरुवातीपासून कडधान्याची आवक घटल्याने यंदा डाळींचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यात सरकारने कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी घातल्याने भाववाढीत आणखी भर पडली. त्यानंतरही डाळींची आवक घटतच असल्याने बाजारपेठेत डाळींचे भाव दर आठवड्याला वाढतच गेले. त्याची झळ थेट ग्राहकांच्या खिशाला बसू लागली.
मान्सूनचे अंदाज डाळीच्या मूळावर
आयात कमी असण्यासह सरकारी गोदामात असलेला व शेतकऱ्यांकडे असलेला माल संपत आल्याने तसेच आता पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणार असण्याचा अंदाजदेखील डाळींच्या भाववाढीस कारणीभूत ठरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा जूनच्या शेवटी पाऊस येणार असल्याचे सांगितले जात असल्याने त्याचा भाववाढीवर मोठा परिणाम होत आहे.
तीन वर्षानंतर पुन्हा चिंता
तुरीचे उत्पादन कमी आल्याने २०१६मध्ये तूर डाळींचे भाव २०० ते २५० रुपये प्रती किलो झाले होते. त्या वेळी या डाळीने सर्वांचेच गणित कोलमडले होते. मात्र त्यानंतर तुरीचे उत्पादन वाढले व विदेशातूनही कच्च्या मालाची आवक सुरू असल्याने २०१७मध्ये डाळींचे भाव ५५ रुपये किलोवर आले होते. त्यानंतर त्यात थोडी-थोडी वाढ होत जावून ते मार्च २०१८मध्ये ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर पोहचले होते. असे असले तरी ते २०१८ अखेरपर्यंत ८० रुपये प्रती किलोच्या आसपास राहिले. मात्र त्यानंतर ते वाढत गेले. या आठवड्यात तर तूर डाळीच्या भावात थेट ४ ते ६ रुपये प्रती किलोने एकदम वाढून डाळ नव्वदी पार जात ८९ ते ९४ रुपये प्रती किलो झाली.
नवीन तूर येण्यास वेळ
पावसाळा सुरू झाल्यानंतर उडीद-मूग आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत येऊ शकेल. मात्र नवीन तूर डिसेंबर-जानेवारीमध्ये येते. त्यामुळे ही तूर येण्यास सात ते आठ महिन्यांच्या कालावधी असल्याने तूर डाळीच्या भावात अधिक वाढ होत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
सर्वच डाळींना महागाईचा तडका
गेल्या आठवड्यात ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या तूरडाळीचे भाव ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. या सोबतच ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीचेही भावदेखील ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटलवरून ६२०० ते ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत.

मागणी चांगली असल्याने व त्यात तुरीचा साठा संपत येत असल्याने तसेच कच्च्या मालाच्या आयातीवर बंदी असल्याने सर्वच डाळींचे भाव वाढत आहे. यात तूर डाळीत सर्वाधिक वाढ होत आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.

सध्या डाळींची आवक कमी झाली असून त्यात पाऊस लांबणार असल्याच्या अंदाजाने डाळींच्या भाववाढीस मदत होत आहे. यात तूर डाळ ९० रुपये प्रती किलोच्याही पुढे गेली आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव.

Web Title: Turtle dal cross 90

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव