Trying to push me out of the party - Eknath Khadse's explosion | मला पक्षातून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
मला पक्षातून ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

रावेर (जळगाव) : ‘आपण पक्ष सोडणार नाही. मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर जळगावात भाजपला दिला. ‘जनतेच्या मनात माझ्याबद्दल उत्सुकता आहे की आपण अशा काय भानगडी केल्यात. गुन्हेगार असेल तर आपल्याला तुरुंगात टाकावे, असेही खडसे यावेळी उद्विग्नपणे म्हणाले. मी कोणता भ्रष्टाचार केला असेल तर तो सरकारने जनतेसमोर आणावा असे आव्हान देतानाच, पक्ष सोडण्याचा विचार नाही पण पक्षातील लोक मला ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत असा गौप्यस्फोट माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज केला.

राजीव पाटील यांचा एकसष्टी गौरव सोहळा रावेर ( जळगाव) येथे पार पडला या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण उपस्थित होते. मी कोणता भ्रष्टाचार केला मला याचे उत्तर हवे आहे. पक्ष सोडण्याची इच्छा नाही पण मला पक्षातून बाहेर ढकलले जात आहे असे सांगतानाच मला पक्ष सोडायला भाग पाडू नका असा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.नाथाभाऊ तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्यासाठी केव्हाही तयार आहोत, ढकलण्याची वाट पाहू नका, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले. या कार्यक्रमाला खडसे यांच्यासह विधानसभेचे आजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्‍वर जैन, आमदार भाई जगताप, आमदार हरिभाऊ जावळे, खासदार रक्षा खडसे आदी उपस्थित होते.

या दिलेर दोस्ताला केंव्हाही आवाज द्या आम्ही तुमच्या साथीला आहोत - अशोकराव चव्हाण

राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावरून व्हॅटसारख्या विषयांवर सतत आठ आठ तास बोलणारे एकनाथराव खडसेंनी पक्षासाठी जे केले, तो पक्ष कोणताही असो पण त्यांच्या कामाचे मोजमाप करून पक्षाने ताकद देण्याची गरज आहे.  आजची राजकीय पक्षांमधील सत्तेच्या खुर्चीसाठी गुळाला लागणार्‍या मुंगळ्यासारखी शिरलेली लाचारी पाहता नाथाभाऊंसारखा एकही स्वाभिमानी नेता या राज्यात नाही. स्वाभिमानी पक्ष काढणार्‍यांची आज काय अवस्था आहे.  ते आपण पाहतोय. पक्षाला स्वाभिमान नसला तरी स्वाभिमान बाळगण्यासाठी खुर्ची नसली तरी बेहत्तर असा स्वाभिमानी नेता राजकीय जीवनात कुणीही नाही. नाथाभाऊ पक्ष ढकलत असेल तरी त्याची ढकलण्याची वाट पाहू नका या दिलेर दोस्ताला केंव्हाही आवाज द्या आम्ही तुमच्या साथीला आहोत असा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचेवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी टिकेची तोफ डागली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.