घड्याळावरून पटली ओळख

भाग्यवंत कुटुंब हे फॅमिली टूरसाठी जाणार होते. त्यामुळे त्यांचे काही सहकारी नागपूरात यापूर्वीच दाखल झाले होते. बस पेटल्याची माहिती मिळाल्यानंतर चक्रधर भाग्यवंत यांचे कंपनीतील सहकारी पंकजसिंग कंडारे यांनी स्थानिक रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी दिव्यांशू हा जखमी अवस्थेत दिसला. कंडारे यांनी नंतर शवविच्छेदन गृहात ठेवलेले मृतदेह पाहिले. चक्रधर यांच्या हातातील घड्याळाच्या आधारावर त्यांची ओळख पटली. कंडारे यांनी ही माहिती जळगावात त्यांच्या नातेवाईकांना सांगितली. त्यानुसार नातेवाईक गुरुवारी संध्याकाळी नागपूरकडे रवाना झाले.
डीएनए टेस्टमुळे मिळाली मयत निष्पन्न
भाग्यवंत यांचे नातेवाईक नागपूरात दाखल झाले. चक्रधर भाग्यवंत, रेखा भाग्यवंत आणि हनी उर्फ निरजा भाग्यवंत यांची ओळख पटविण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या कातडीचे नमुने घेतले. तसेच चक्रधर यांचे वडिल नामदेव आणि रेखा यांच्या आई लताबाई कोळी यांचे नमुनेे तपासणीसाठी हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले. दुपारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तिघे मयत हे भाग्यवंत कुटुंबीय असल्याचे निष्पन्न झाले .
दिव्यांशूवर नागपूरात उपचार
या आगीत दिव्यांशू भाग्यवंत हा बालक २७ टक्के भाजला आहे. त्याच्यावर नागपूरातील सिम्स् हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. त्याच्या चेहर्‍यावर, डाव्या हाताला आणि पायाला भाजले आहे. जखमी दिव्यांशू याचा सारखा आईवडिलांसाठी धावा सुरु आहे. त्याच्याजवळ मामा सुरेश कोळी थांबून आहेत.
भाग्यवंत कुटुंबीयांवर मूळ गावी अंत्यसंस्कार
मयताची ओळख पटल्यानंतर तिघांचे मृतदेह चक्रधर भाग्यवंत यांच्या पुसद या मूळ गावी नेण्यात आले. या ठिकाणी शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांचावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सासू लताबाई कोळी, मामसासरे नरंेद्र बाविस्कर, नातेवाईक ज्ञानेश्वर मोरे, भागवत सैंदाणे, एकनाथ साळुंखे यांच्यासह जळगावातील नातेवाईक उपस्थित होते. मयत चक्रधर यांच्या पश्चात आईवडिल, एक भाऊ आणि दोन बहिण असा परिवार आहे.
दौलत नगरातील घरी स्मशानशांतता
सर्वच नातेवाईक नागपूरकडे रवाना झाल्याने चक्रधर भाग्यवंत यांच्या दौलत नगर भागातील घरी एकट्या रेखा भाग्यवंत यांच्या आजी थांबून होत्या. शुक्रवारी दिवसभर भाग्यवंत यांच्या परिचयातील आणि नात्यातील व्यक्ती येत होते. एकाच वेळी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने दौलत नगरातील त्यांच्या निवासस्थानी स्मशानशांतता पसरली होती.