धरणगावातील झपाटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तलावातून काढला एक हजार ट्रॉली गाळ अन् केले नाला खोलीकरणही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 04:35 PM2019-07-06T16:35:42+5:302019-07-06T16:36:52+5:30

महाराष्टÑात पाण्याची खोलवर गेलेली पातळी ही भविष्यातील संकटाची चाहूल असून, ही चाहूल लागल्यानंतर समाजाने जागृत होणे आवश्यक आहे. जलदूतच्या माध्यमातून शहरातील माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड अन् संवर्धन आदी कामे समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.

Thousands trolley sludge and canal drainage from the lake | धरणगावातील झपाटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तलावातून काढला एक हजार ट्रॉली गाळ अन् केले नाला खोलीकरणही

धरणगावातील झपाटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तलावातून काढला एक हजार ट्रॉली गाळ अन् केले नाला खोलीकरणही

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे स्पेशलजलदूत फाऊंडेशनच्या तेली तलावाच्या खोलीकरणासाठी सरसावले मदतीचे हात

धरणगाव, जि.जळगाव : महाराष्टÑात पाण्याची खोलवर गेलेली पातळी ही भविष्यातील संकटाची चाहूल असून, ही चाहूल लागल्यानंतर समाजाने जागृत होणे आवश्यक आहे. जलदूतच्या माध्यमातून शहरातील माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड अन् संवर्धन आदी कामे समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी ‘जलदूत फाऊंडेशन’च्या माध्यमातून घेतलेला पुढाकार गावाला विकासाची वाट दाखवेल अशी आशा आहे. समाजातील सुशिक्षित लोकांची निष्क्रियता चिंताजनक आहे. मात्र २००१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसमोर आदर्श उभा केला आहे. विविध क्षेत्रात कार्यरत डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्चर, मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह, शासकीय अधिकारी, शिक्षक, व्यापारी, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून जलदूत संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा साठा, वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन,तलाव खोलीकरण, तलावाला जोडणारे नाले खोलीकरण, गावातील जलस्त्रोताची कामे आदी करणे असे कार्यक्रम हाती घेतले आहेत. उन्हाळ्यात होणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य या उपक्रमातून दूर करता येईल ही त्यामागची त्यांची भावना आहे.
हे काम केले जोमाने
पहिल्या टप्प्यात १३ मेपासून येथील तेली तलावाचे काम या माजी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणीतून सुरू करून तेली तलावाचे खोलीकरण, गाळ काढणे, नाल्याची सफाई करणे ही कामे करण्यात आली. त्यात जेसीबी, पोकलॅण्ड, ट्रॅक्टरच्या माध्यमातून ९९० ट्रॉली गाळ तलावातून काढण्यात आला, तर २ हजार ८०० घनमीटर एवढी त्याची वाढ झाली. त्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता २८ लाख २० हजार लीटरने वाढल्याचा अंदाज आहे. तसेच तलावाला जोडलेला नाला जवळजवळ १ हजार मीटरपर्यत ७ फूट खोल व १० फूट रुंद खोदून पावसाळ्यात थेट रेल्वे स्टेशनकडून चिंतामणी मोरीया गांधी मळ्यालगत असलेल्या नाल्यातून सरळ तलावात पाणी जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मदतीचे आवाहन
जलदूत फाऊंडेशनने सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमाला पी.आर.हायस्कूल व बालकवी विद्यालयाच्या त्यांच्या २००१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, इतर प्रतिष्ठित व्यक्ती, कॉलनीवासीयांनी आर्थिक मदत दिली आहे. मात्र संस्थेचा उद्देश साध्य करण्यासाठी जास्तीच्या आर्थिक मदतीची गरज असून संस्थेने दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे.
दमदार पावसाची प्रतीक्षा
गेल्या चार वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने गावागावात पाणीटंचाई भासत आहे. नदी-नाले,तलाव, धरणं बोअरवेल्स कोरडीठाक पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य सर्वत्र झाले आहे. या वर्षी दमदार पाणी पडावा अन् गाळ काढून खोल केलेला तलाव ओसंडून वाहावा, अशी प्रतीक्षा सर्वांना लागून आहे.

Web Title: Thousands trolley sludge and canal drainage from the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.