पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन शिक्षकाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:49 PM2019-01-19T12:49:13+5:302019-01-19T12:49:58+5:30

शाळेतून परतल्यावर संपविली जीवनयात्रा

The teacher committed suicide by jumping from the fifth floor | पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन शिक्षकाने केली आत्महत्या

पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन शिक्षकाने केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देप्रचंड आक्रोश आणि खळबळ


जळगाव : भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी समोर असलेल्या ज्ञानचेतना सोसायटीमधील अपार्टमेंटमध्ये रहात असलेल्या जगन्नाथ विठ्ठल पाटील (वय ४५) या शिक्षकाने शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजेच्या दरम्यान पाचव्या मजल्यावरुन जिन्याच्या खिडकीतून स्वत:ला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. ताणतणावातून ही आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जगन्नाथ पाटील यांनी उडी घेतल्यानंतर मोठा आवाज झाल्याने बाहेर खेळत असलेल्या त्यांचा चिमुरडा मुलगा हिमांशू (वय १२) याने काय झाले म्हणून पहाण्यासाठी धाव घेतली असता जन्मदेत्या बापाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्याने भेदरलेल्या स्थितीत पळत जाऊन आईला हा प्रकार सांगितला. अतिशय भीषण दृष्य घटनास्थळी होते.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, अजिंठा हौसिंग सोसायटी परिसरात असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सिद्धी विनायक शाळेतील माध्यमिकच्या वर्गांना शिकवत असलेले शिक्षक जगन्नाथ विठ्ठल पाटील हे सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेले. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेच्या दरम्यान शाळेत परीक्षा होती. दोन विषयांची चाचणी परीक्षा आटोपल्यावर ११ वाजेपर्यंत जगन्नाथ पाटील हे शाळेत होते. सहकारी शिक्षकांशी त्यांनी संवादही साधला. त्यानंतर ते घरी परतले.
प्रचंड आक्रोश आणि खळबळ
घटनास्थळाचे भीषण दृश्य पाहून कॉलनीतील नागरिकांचाही थरकाप उडाला होता. जगन्नाथ पाटील यांच्या पत्नीकडून सिद्धीविनायक शाळेचा नंबर घेऊन काही जणांना तात्काळ शाळेत माहिती कळविली. शाळेतील पुरूष व महिला शिक्षकांनी तात्काळ जगन्नाथ पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. महिलांनी जगन्नाथ पाटील यांच्या घरात जाऊन त्यांना धीर देण्यास सुरूवात केली. शाळेतील शांत, स्वभावी शिक्षक एक तासांपूर्वी आपल्याशी चर्चा करून बाहेर पडतो व आत्महत्या करतो या प्रकाराने सहकारी शिक्षकवर्गही हादरला होता. घटनास्थळावरील चित्र एवढे भयंकर होते की वरून पडलेल्या जगन्नाथ पाटील यांची कवटी फुटून आतील मांस दहा-ते बारा फुटांपर्यंत उडाले होते.
पोलिसांनी घेतली धाव
घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अशोक सनगत, अतुल वंजारी, प्रकाश पाटील, विजय नेरकर यांनी घटनास्थळ गाठून चौकशीची प्रक्रिया सुरू केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास पंचनाम्याची प्रक्रिया आटोपून मृतदेह सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला.
पाटील हे मुळचे चाळीसगाव तालुक्यातील
जगन्नाथ पाटील हे मुळचे चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडिल विठ्ठल पाटील हे रेल्वे आरएमएसमधून निवृत्त झाल्यानंतर सध्या भुसावळ येथे रहातात. जगन्नाथ पाटील यांना असलेल्या दोन मुलांपैकी एक मुलगा अभिषेक (वय १७) हा आजोळी धुळे येथे असल्याचे सांगण्यात आले. तो तेथे अभियांत्रिकीचे (डिप्लोमा) शिक्षण घेतो. त्यांच्या पत्नीचे माहेर हे धुळे येथील असल्याचे सांगण्यात आले. घटनेबाबात सर्वांना माहिती कळविताच नातेवाईकांनी धाव घेतली.
मुलगा हिमांशू अतिशय घाबरला
घरात पत्नी नंदा यांनी स्वयंपाकाची पूर्ण तयारी केलेली दिसत होती. भाजी तयार करून पोळ्यांची कणीकही त्यांनी भिजवून ठेवलेली दिसत होती. मुलगा हिमांशू हा घरात अतिशय घाबरलेल्या स्थितीत निशब्द होऊन थरथर कापत उभा होता. शेजारील महिलांनी त्याला शांत करण्यासाठी बेडरूमकडे नेण्याचा प्रयत्न केला असता तिकडे जाण्याचीही त्याला हिंमत होत नव्हती. समोर आई हंबरडा फोडून रडत असल्याने तो अधिकच घाबरलेला दिसत होेता.
शनिवारी होणार शवविच्छेदन
मयत जगन्नाथ पाटील यांचे आई वडिल दुपारी जळगावी दाखल झाले. घरी पोहोचल्यावर आईला एकदम धक्का बसला. त्यांची तातखिळी बसल्याने त्यांना उपचारार्थ तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन शनिवारी १९ रोजी सकाळी होईल. त्यांची बहिणही अद्याप येणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, असे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडिल किर्तनकार
मयत जगन्नाथ पाटील यांचे वडिल विठ्ठल पाटील हे जिल्ह्यात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तर स्वत: जगन्नाथ हे उत्तम तबला वादक आहेत. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य कार्यक्रमांना तेच तबला वादन करायचे. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांची आठवण येईल, असेही त्यांचे सहकारी शिक्षक सांगतात.
पत्नीला म्हणाले जरा उन्हात जाऊन येतो
या सोसायटीत पाटील हे पहिल्या माळ्यावर रहातात. घरी परतल्यावर जगन्नाथ पाटील तासभर घरातच होते. त्यांनी पत्नी नंदा पाटील यांच्याशी चर्चा केली. तू स्वयंपाक कर मला थंडी वाजते आहे जरा गच्चीवर जाऊन उन्हात उभा रहातो असे सांगून १२.१५ वाजेच्या दरम्यान जगन्नाथ पाटील हे पाचव्या मजल्याकडे गेले. या ठिकाणी गच्चीच्या पॅसेजला काचेची खिडकी आहे. तीन ते साडेतीन फुट उंच ही जागा असल्याने छोट्या बेंचवर चढून जगन्नाथ पाटील यांनी स्वत;ला खाली झोकून दिले.
खाली खेळणाºया मुलाला आला आवाज
जगन्नाथ पाटील हे पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रहातात. घरी पत्नी नंदा या तसेच लहान मुलगा हिमांशू असे तिघे रहातात. हिमांशू हा रायसोनी इग्लिश मिडियमला शिकतो. तो प्रशस्त इमारतीच्या मोकळ्या जागेत घटना घडली त्यावेळी खेळत होता. जोरात आवाज झाल्याने तो आवाजाच्या दिशेने धावला. पुढे जाऊन पहातो तर प्रत्यक्ष आपला पिता रक्ताच्या थारोळ्या पडलेला त्याने पाहीला. हा प्रकार पाहून तो अतिशय भेदरलेल्या स्थितीत घराकडे परतला. तोपर्यंत सोसायटीतील नागरिकही घटनास्थळाकडे धावून गेले. हिमांशू ने घडलेली घटना आईला सांगताच त्यादेखील प्रचंड घाबरल्या.



 

Web Title: The teacher committed suicide by jumping from the fifth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.