एकनाथराव खडसे यांच्याविषयी बनावट तक्रारीवरून संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:21 PM2018-07-18T12:21:00+5:302018-07-18T12:22:37+5:30

आमदारांच्या तक्रारीनंतर ५३ तासांनी गुन्हा दाखल

Suspicion by a fake complaint about Mr. Khandsey | एकनाथराव खडसे यांच्याविषयी बनावट तक्रारीवरून संशयकल्लोळ

एकनाथराव खडसे यांच्याविषयी बनावट तक्रारीवरून संशयकल्लोळ

Next
ठळक मुद्देविधानसभेत प्रकरण पोहचल्यानंतर दखल१४ जुलै रोजी तक्रार अन् १६ रोजी दाखल झाला गुन्हा

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तक्रारीसाठी आमदार सुरेश भोळे यांचे लेटरहेड वापरल्याप्रकरणी अखेर ५३ तासांनी गुन्हा दाखल झाला. याबाबत भोळेंनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही गुन्हा दाखल झाला नव्हता. या बनावट पत्रामागे नेमके कोण आहे, यावरून संशयकल्लोळ सुरू झाला आहे.
भोसरी जमीन प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याविषयी वेगवेगळ्या तक्रारी आणि चौकशीची प्रकरणे सुरू आहेत. त्यात या बनावट पत्राची भर पडली आहे.
यापूर्वी बनावट डीडी तयार करून हायकोर्टात पुराव्यादाखल सादर केल्याबद्दल खडसे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह बॅँक अधिकाऱ्यांविरुध्द गेल्याच महिन्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता आमदारांच्या बनावट लेटरहेडवरील तक्रारीचे प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
काय म्हटले आहे बनावट पत्रात?
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आहे, त्याशिवाय कन्या रोहिणी खडसे-खेवलकर चेअरमन असलेल्या जिल्हा बॅँकेतून खडसे यांनी कोट्यवधीच्या नोटा बदल केल्या आहेत. याची सीबीआय चौकशीही दाबण्यात आली आहे, याशिवाय खडसे यांना बसविलेली किडनी, पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख असलेली तक्रार आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व्ही.के.ताहील रामाणी यांच्याकडे करण्यात आली आहे. खडसे यांचा मूळ व्यवसाय शेती असूनही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आहे. याबाबत समिती नेमून चौकशी करावी, असेही पत्रात म्हटले आहे. भोळे यांची हुबेहूब स्वाक्षरी या पत्रावर आहे. त्याच्यावर जावक क्रमांक मात्र नमूद करण्यात आलेला नाही.
बनावट डीडीप्रकरणी बॅँक अधिकाºयांसह तिघांना अटक
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात चोपडा अर्बन बँकेच्या माजी व्यवस्थापकासह तीन जणांना मुक्ताईनगर पोलिसांनी २१ जून रोजी जळगाव येथून अटक केली होती. खडसे यांच्याविरुद्ध खोटे दस्तावेज, बनावट कागदपत्रे तयार करून कट कारस्थान रचल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार १३ जून रोजी मुक्ताईनगर पोलिसात अंजली दमानियांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार चोपडा अर्बन बँकेचे सन २००८ मधील तत्कालीन व्यवस्थापक अविनाश भालचंद्र पाटील (४६), वसुली अधिकारी किशोर लक्ष्मण अत्तरदे (४७), योगेश काशीनाथ बºहाटे (४३, सर्व रा. चोपडा) यांना अटक करण्यात आली. जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात तपासकामी आले असता त्यांना अटक झाली होती.
कडलग यांची मुंबई वारी अन् तपासाधिकारी बदल
दमानिया यांच्याविरुध्द डीडी व बँकेचे स्टॅम्प चोरल्याचा खडसे यांनी मुक्ताईनगरात गुन्हा दाखल केला होता. याची चौकशी पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्याकडे होती. गुन्हा १३ जूनला दाखल झाला व कडलग हे मुंबईला दमानिया यांच्याकडे १६ रोजी यायला निघाले. ज्या अधिकाºयाविरुद्ध माझ्याच केसमध्ये मध्ये एप्रिलपासून चौकशी चालू होती, तोच अधिकारी ही चौकशी चालू असतांना माझ्याविरुद्ध झालेल्या या दुसºया एफआयआरची चौकशी करणे हे कायद्याला धरून नसल्याचे सांगून दमानिया यांनी १७ तारखेलाच ई-मेल वरून लिखित तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवली व हा तपास मुक्ताईनगरच्या बाहेर कोणत्याही अधिकाºयांकडे द्यावा अशी विनंती केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी कडलग यांच्याकडील तपास काढला होता.
१४ जुलै रोजी तक्रार अन् १६ रोजी दाखल झाला गुन्हा
आमदार भोळे यांनी १४ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन खडसे यांची बदनामी करणारे बनावटपत्र पाठविणाºया व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर लगेच गुन्हा दाखल झाला नाही. दोन दिवसांनी म्हणजे १६ जुलै रोजी खडसे यांनी विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात या बनावट लेटरहेडचा मुद्दा उपस्थित केला. विधानसभाध्यक्षांनी त्याची दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनीही सभागृहाला गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. १६ जुलै रोजी रात्री ८.४० वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला. आमदारांचे पत्र ते गुन्हा दाखल या प्रक्रियेला तब्बल ५३ तास लागले. विधानसभाध्यक्षांच्या आदेशानंतरच सूत्रे हलली. एखाद्या लोकप्रतिनिधीने तक्रार दिल्यानंतरही गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न विधीमंडळात आमदारांनी उपस्थित केला.
काय आहे आमदार भोळे यांची फिर्याद?
मी जळगाव शहराचा आमदार असल्याने मी माझ्या लेटरहेडवर अनेकांना शिफारशी दिलेल्या आहेत व देत असतो. त्यानुसार असेच माझ्या एका लेटरहेडवर दिलेल्या शिफारस पत्रावर १२ जून २०१७ अशी तारीख टाकून कोणीतरी बनावट लिखाण करून माझ्या मूळ लेटरहेडवर अज्ञात व्यक्तीने केलेले लिखाण रंगीत प्रिंट करून श्रीमती व्ही.के.ताहिलरामाणी मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे नेहमी कोणाच्या न् कोणाच्या माध्यमातून खोटी तक्रार करून प्रकरण न्यायप्रविष्ट करीत असतात. समाजसेविका अंजली दमानिया यांच्याविरोधात वेगवेगळ्या २५-३६ ठिकाणी न्यायालयात खटले दाखल करून मानसिक छळ करीत आहेत.
जळगाव म्युनिसिपल मार्केटबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याने न्यायालयाने माजी आमदार गुरुमुख जगवानी व खडसे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना यांना शेतीत कोट्यवधीचे उत्पन्न होत आहे. त्या उत्पनातून शाळा, साखर कारखाना, फार्म हाऊस, शेती इतर बरेच मिळकती तसेच भोसरी, पुणे एमआयडीसीची जमीन शासकीय किमतीपेक्षा बºयाच कमी दराने व रोख रक्कम बॅँकेतून भरून ती डी.डी.ने दिल्याचे दर्शवून खरेदी केलेली आहे. तरीही लाच प्रतिबंधक शाखेने यांना क्लीन चीट दिलेली आहे.आयकर विभागाच्या नियमानुसार शासकीय किमतीपेक्षा मालमत्ता कमी दराने खरेदी केली असल्यास तितक्याच रकमेचा दंड लागतो.
नोटाबंदीच्या काळात खडसे यांची मुलगी चेअरमन असलेल्या जिल्हा बॅँकेतून कोट्यवधीच्या नोटा बदलण्यात आल्या होत्या. त्या वेळी सीबीआय चौकशी झाली होती. परंतु ही चौकशी राजकीय दबाव वापरून दडपण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात अशोक सादरे नामक पोलीस निरीक्षकाने यांच्या दडपशाहीने आत्महत्या केली होती, त्याबाबत सादरे यांच्या पत्नीने टी.व्ही.वर मुलाखतही दिलेली आहे. त्या वेळीदेखील त्यांनी राजकीय दबाव व आर्थिक बळ वापरुन त्यांना स्टेटमेंट बदलण्यास भाग पाडले.
राज्यात अवयव तस्करी करणाºया रॅकेटमार्फत गरीब मुलांची किडनी घेऊन ती स्वत:साठी वापरण्यात आली व पत्रकार परिषद घेऊन ही किडनी पत्नीने दिल्याचे जाहीर केले. वास्तविक किडनी बदलण्याकरिता जेथे राहतो तेथील राज्य व देशाची परवानगी लागते. तरी न्यायालयाने गंभीर आरोपांची दखल घेत न्यायालयाच्या अंतर्गत मेडिकल चौकशी समिती नेमून त्यांच्या पत्नीची सोनोग्राफी केल्यास सत्य उजेडात येईल व अवयव तस्करी करणारे रॅकेट पकडले गेल्यास गरीब लोकांच्या शारीरिक छळास प्रतिबंध बसेल. हे मूळ पत्र मी मुख्य न्यायाधीश यांच्या नावाने देत असून या पत्रावर माझे मूळ हस्ताक्षर आहे. उद्या पक्षाच्या दबावामुळे खोटा खुलासा सादर करावा लागल्यास माझ्या पत्रावर केलेली स्वाक्षरी आपण प्रयोगशाळेत पाठवून तपासणी करू शकता. तरी अशा भ्रष्ट माणसाची चौकशी होणे गरजेचे आहे.
या आशयाचा मजकूर डकवून माझ्या लेटरहेडचा दुरूपयोग झालेला आहे. तसेच हे पत्र कोणीतरी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून प्रसारित झालेले आहे. याबाबत मला १६ जुलै रोजी समजल्याने मी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद देत आहे.
निवेदनावरुन चौकशी सुरु झालीच होती : एस.पी
आमदार सुरेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चौकशी सुरुच झालेली होती. गुन्हा दाखल करण्याची तयारी झालेली असतानाच सोमवारी सायंकाळी भोळे यांनी फोन करुन फिर्याद द्यायची आहे, असे सांगितले. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे व निरीक्षक बी.जी.रोहोम यांना सूचना दिल्या होत्या, अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी ‘लोकमत’ ला दिली.

१४ जुलै रोजी दुपारी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन बनावट लेटरहेडप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. या वेळी त्यांच्याकडे लेखी तक्रारही दिली होती. तेव्हा कराळे यांनी अज्ञात व्यक्ती आहे. चौकशी करून कारवाई करू असे सांगितले होते.
-सुरेश भोळे, आमदार

Web Title: Suspicion by a fake complaint about Mr. Khandsey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.