नववीच्या विद्यार्थिनीला विषारी सापाने केला झोपेत दंश, धरणगाव तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:33 PM2018-07-03T12:33:12+5:302018-07-03T12:34:09+5:30

व्हेंटीलेटरचे कारण दाखवून ‘सिव्हील’मध्ये उपचारास नकार

snake bite to student | नववीच्या विद्यार्थिनीला विषारी सापाने केला झोपेत दंश, धरणगाव तालुक्यातील घटना

नववीच्या विद्यार्थिनीला विषारी सापाने केला झोपेत दंश, धरणगाव तालुक्यातील घटना

Next
ठळक मुद्देखासगी डॉक्टर व परिचारिकांची रुग्णालयाशी मिलीभगतरात्री दोन वाजेची घटना

जळगाव : आजीजवळ झोपलेल्या कविता सुनील पाटील (वय १४) या नववीच्या विद्यार्थिनीला मध्यरात्री दोन वाजता झोपेत विषारी सापाने दंश केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पथराड येथे घडली.
या घटनेनंतर कविता हिला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याचे सांगून परिचारिकांनी तिला खासगी रुग्णालयात हलविण्याचा अफलातून सल्ला दिला. या ढकलाढकलीच्या प्रकारात तिची प्रकृती आणखीनच खालावली आहे. एकूणच खासगी रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांच्यात असलेली मिलीभगत या निमित्ताने चव्हाट्यावर आली.
मध्यरात्री दोन वाजता कोब्रा नाग अंथरुणात शिरला. कविता हिच्या हनुवटीवर त्याने दंश केला. त्यामुळे कविता लगेच झोपेतून उठली व तोंडाजवळ कशाने तरी चावा घेतल्याचे तिने आजीला सांगितले. चावा घेतल्याची जागा पाहिली असता सापाचे दात उमटलेले होते. आजीने शेजारील लोकांच्या मदतीने कविताला जिल्हा रुग्णालयात आणले.तेथे परिचारिकांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले.
पुन्हा हलविले‘सिव्हील’ला
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारीका व खासगी रुग्णालय यांच्यातील मिलिभगत चव्हाट्यावर आल्यावर रुग्णाला जिल्हा रुग्णालयातच हलविण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. यानंतर अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटर असलेला बेड उपलब्ध करुन देण्यात आला. गेल्या बुधवारीही शहरात एका विद्यार्थिनीला सर्प दंश झाला होता.
रात्री दोन वाजेची घटना
याबाबत कविता हिच्या नातेवाईकांनी ‘लोकमत’ ला दिलेली माहिती अशी की, कविता ही पथराड येथे आजी बेबाबाई गोकुळ पाटील व मामा उमेश गोकुळ पाटील (बोरसे) यांच्याकडे वास्तव्याला आहे. ती नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. वडील सुनील मांगो पाटील हे पिंप्राळा,जळगाव येथे राहतात. मजुरी करुन ते उदरनिर्वाह भागवतात. रविवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर कविता ही आजीजवळ झोपली होती. रात्री दोन वाजता तिला सापाने दंश केला.
अतिदक्षता विभागात दाखल केलेच नाही
सकाळी सात वाजता कविताची प्रकृती खालावली. तिला अतिदक्षता विभागात दाखल न करता परिचारिकांनी खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देऊन शाहू नगरातील एका खाजगी रुग्णालयाचे नावही सांगितले, त्यानंतर एका डॉक्टरशी बोलणेही करुन दिले. काही वेळातच या दवाखान्याची रुग्णवाहिका दाखल झाली. त्याचे चारशे रुपये भाडे आकारण्यात आले. दवाखान्यात गेल्यावर १९०० रुपये रक्त तपासणी व चार हजार रुपयांची औषधीची आकारणी केली. मजुरी करणारे कुुटुंब, त्यांच्याकडे पैशाची कमतरता असताना त्यांना खाजगी रुग्णालयात पाठविले.

 

Web Title: snake bite to student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.