जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईच्या संकटाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:10 PM2018-10-19T22:10:07+5:302018-10-19T22:15:35+5:30

जलसंपदामंत्र्यांनी केले पाणी जपून वापराचे आवाहन

signs of shortage of Water on Jalgaon, Jamnar | जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईच्या संकटाचे संकेत

जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईच्या संकटाचे संकेत

Next
ठळक मुद्दे पाणी जपून न वापरल्यास एप्रिलपासूनच पाणी टंचाईची भितीजळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षण एरंडोलची समस्या गंभीर

जळगाव: जळगाव शहर व जामनेरचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणात यंदा कमी पाणीसाठा आहे. केवळ निम्म्यावर हा पाणीसाठा असल्याने पाणी जपून वापरा. थोडी कळ सोसून सहकार्य करा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मेहरूण तलावावर आयोजित रावण दहन कार्यक्रमाप्रसंगी केल्याने जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईचे संकट गडद झाले असल्याचे संकेत मिळाले आहेत.
महाजन म्हणाले की, वाघूर धरणात निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहराची, जामनेरची पाणीयोजना या धरणावरच आहे. ते पाणी संपले तर कुठलीच पर्यायी सोय नाही. त्यामुळे जामनेर, जळगावकरांनी थोडी कळ सोसून पाणी जपून वापरावे. काटकसर करून सहकार्य करावे. तरच एप्रिल, मे महिन्यात व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकेल.
जळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षण
वाघूर धरणात जेमतेम ४४ टक्के पाणीसाठा आहे. ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहरासाठी १४१५ एमसीएफटी तर जामनेरसाठी ९२ एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी मागील वर्षी होती. त्यानुसार आरक्षण देण्यात आले होते. यंदाही तेवढीच मागणी असून त्यानुसार आरक्षण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच मंजूर करण्यात आले होते. मात्र भोकरबारीच्या विषयावर घोळ चालल्याने पाणी आरक्षणाचा आरखडा अंतीम झालेला नव्हता. आता आठ दिवसांत त्याबाबत बैठक होऊन अंतीम मंजुरी होणार आहे.
एरंडोलची समस्या गंभीर
पारोळ्यासाठी मागील वर्षी १०० एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी केली होती. मात्र ७५ एमसीएफटी एवढेच आरक्षण दिले होते. यंदा ७५ एमसीएफटी आरक्षणाची मागणी करण्यात आली असून तेवढेच मंजूरीची शिफारस प्रशासनाने केली आहे. मात्र एरंडोलसाठी अंजनी धरणातून मागील वर्षी ६० एमसीएफटीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३० एमसीएफटी देण्यात आले होते. यंदाही ३० एमसीएफटीच पाणी दिले जाणार आहे. तर १५ एमसीएफटी कासोद्याला दिले जाणार आहे. यंदा अंजनी धरणात केवळ ८२ एमसीएफटी मृत पाणीसाठा आहे. त्यातून हे ३० व १५ एमसीएफटी पाणी देणे शक्य असले तरीही फेब्रुवारीपर्यंतच ते देणे शक्य होईल. कारण बाष्पीभवनामुळे पाण्याच्या साठ्यात नंतर वेगाने घट होणार आहे. त्यामुळे एरंडोलची समस्या गंभीर आहे.

Web Title: signs of shortage of Water on Jalgaon, Jamnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.