सही पुलंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 03:32 PM2019-03-31T15:32:17+5:302019-03-31T15:32:39+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी लिहिलेला लेख ‘सही पुलंची’

Right bridges | सही पुलंची

सही पुलंची

googlenewsNext

धरणगाव हे माझे गाव. वडिलांचे लेख आचार्य अत्रे यांच्या मराठामध्ये सातत्याने प्रकाशित व्हायचे. हाच वारसा घेऊन मी कविता लिहू लागलो. दहावीत असताना माझी पहिली कविता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. १९८२-८३ च्या काळात मी धरणगावपासून जवळ असलेल्या अमळनेर या पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत प्रताप महाविद्यालयात प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून शहरी भागात आल्याने प्रथमत: लाजरा बुजरा असणारा मी सातत्याने लिहू लागलो. अमळनेरमधील तो काळ 'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे' असा होता. अमळनेर हे त्या काळात शैक्षणिक दृष्ट्या प्रगत तर होतेच पण साहित्य आणि सांस्कृतिक चळवळसुद्धा जोमाने सुरू होती. या चळवळीचा प्रभाव माझ्यावर होता. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, अरुण साधू, यदुनाथ थत्ते, बाबा आढाव, श्रीराम लागू, संगीतकार राम कदम, दादा कोंडके, नरेंद्र दाभोलकर अशी अनेक गणमान्य लोक अमळनेरला यायचे. त्यांची भाषणे, त्यांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकायची संधी मला मिळाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक वा.रा. सोनार यांच्या घराजवळ राहत असल्याने आणि ‘लोकमत’चा पत्रकार म्हणून काम करत असल्याने वा.रा. तात्या मला घरी बोलावून घेत. बव्हशी त्यांच्याकडेच या मंडळींची उठबस असायची. तात्या कामात असले की, मग मला या मंडळींशी बोलायला मिळायचे.
नोव्हेंबर १९८४ मध्ये अमळनेरला साने गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पु.ल.देशपांडे यांना पालिकेने बोलावले होते. मला अजूनही आठवते, नगरपालिका समोरील मैदानात पु.ल देशपांडे यांची सभा होती. अफाट जनसमुदाय पु.लं.चे भाषण ऐकण्यासाठी कान टवकारून बसला होता. पुतळ्याच्या अनावरणानंतर पुलं बोलायला उभे राहिले, ते म्हणाले होते की, ‘मी हे निमंत्रण मिळाल्यापासून विचार करतोय की मी काय पुण्य केलं होतं म्हणून माझ्या आयुष्यात हा प्रसंग आला. जुन्या पद्धतीचा मी जर आस्तिक असतो तर गत जन्मी मी चांगले काही तरी चांगले केलेय वगैरे मानून माझं समाधान करून घेतले असतं. पण गतजन्म वगैरेवर माझा काही फारसा विश्वास नाहीये आणि या जन्मात जे-जे काही माझ्या हातून घडलंय त्यावरून गतजन्मी मी फारसे काही चांगले केलं असेल असं वाटण्या इतकंसुद्धा मला काही वाटत नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षात नसल्यानं व्यावसायिक उद्घाटक पण नाही. तेव्हा पहिल्यांदा माझ्या लक्षात आले की, साने गुरुजी हे तत्त्व, साने गुरुजी हा विचार जरी आपल्याला नाहीसा झालेला दिसतो, तरी आजचा समारंभ नि आजचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की, अमळनेरमध्ये साने गुरुजींचं तत्त्व स्पिरीट ज्याला म्हणतात साने गुरुजींचे चेतन अजूनही जिवंत आहे.'पु लं सांगत होते,
पुलंचे हे भाषण माझ्यासाठी आयुष्यभरची वैचारिक शिदोरीच होती. भाषण आटोपल्यानंतर पुलं गर्दीतून वाट काढत पालिका कार्यालयात मुख्याधिकारी चेंबरमध्ये बसले. मला त्याची सही हवी होती. पण गर्दी इतकी होती की, त्यांच्यापर्यंत जाणं एक दिव्यच होतं. पण काहीही करून पुलंची सही घ्यायचीच, असा निश्चय करून मी गर्दीतून रेंगत रेंगत मी थेट त्यांच्यापर्यत पोहोचलो आणि अचानक त्यांच्यासमोर येऊन वही पुढे करून उभा राहिलो. मला असा आकस्मिक उभा राहिलेला पाहून त्यांनी माझ्याकडे खाली वर पाहिले आणि विचारले, ‘तू असा अचानक कसा आला..? ’ मी म्हणालो, ‘दरवाज्यातून..!!’ त्यांना कौतुक वाटले असावे, ते हसले आणि माझी वही हातात घेऊन त्यातल्या आधीच्या सह्या पाहिल्या आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पुलंची झोकदार सही माझ्या वहीच्या पानावर उमटली..!!
-डॉ.संजीवकुमार सोनवणे, धरणगाव

Web Title: Right bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.