निकालाचे होणार दूरगामी परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:20 AM2019-05-20T00:20:54+5:302019-05-20T00:21:27+5:30

भाजपाने चारही जागा राखल्यास गिरीश महाजन यांचे स्थान अधिक बळकट ; ‘विधानसभे’साठी मोठी जबाबदारी, जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादीला येईल उर्जितावस्था तर नंदुरबार-धुळे जिल्ह्यात वाढू शकतो आत्मविश्वास

Remedies will result in far-reaching consequences | निकालाचे होणार दूरगामी परिणाम

निकालाचे होणार दूरगामी परिणाम

Next

मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीचे निकाल तीन दिवसात जाहीर होतील. यंदाच्या अतीशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत निकालाविषयी मोठी अनिश्चितता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. देशात आणि खान्देशात सगळेच पक्ष आणि पदाधिकारी विजयाचे दावे करीत असले तरी खाजगीत मात्र वेगळाच सूर लावला जात आहे. मतदारसंघात वेगवेगळी समीकरणे जुळली असल्याने निकाल वेगळे लागू शकतात, असे आता कार्यकर्तेदेखील बोलू लागले आहेत. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. रावेरच्या जागेविषयी भाजप निश्चिंत आहे. दहा वर्षानंतर ‘पंजा’ हे चिन्ह या मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांच्यारुपाने पुन्हा एकदा मतदारांपर्यंत गेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीचा प्रभाव निर्माण होईल.
जळगावच्या जागेविषयी दोन्ही पक्ष ठामपणे विजयाचा दावा करीत आहे. भाजपमधील उमेदवारीच्या गोंधळामुळे हक्काची जागा भाजप गमावेल, असे चित्र निर्माण झाले होते. गुलाबराव देवकर यांच्यासारखा दिग्गज उमेदवार राष्टÑवादी काँग्रेसने मैदानात उतरविल्याने वसंतराव मोरे यांच्याप्रमाणेचे विजयाची पुनरावृत्ती देवकर करतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र गिरीश महाजन यांनी शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्या मदतीने ‘युती’ची एकत्रित शक्ती पणाला लावली असल्याचे चित्र मतदारसंघात तयार झाले. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनाही या दोन मंत्र्यांनी कामाला लावले. ज्याच्या मतदारसंघात मताधिक्य त्याची उमेदवारी निश्चित हा ‘फंडा’ प्रभावी ठरल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यात कितपत तथ्य आहे, हे निकालानंतर कळेल.
धुळे आणि नंदुरबारविषयी काँग्रेस पक्ष खूपच आशावादी आहे. ९ पैकी ५ आमदार, दोन विधान परिषद सदस्य, दोन्ही जिल्हा परिषदा, जिल्हा बँक, पंचायत समित्या, पालिका त्यासोबतच सुरुपसिंग नाईक, माणिकराव गावीत, अमरीशभाई पटेल, रोहिदास पाटील, पद्माकर वळवी, डी.एस.अहिरे यांच्यासारखे दिग्गज नेते असल्याने काँग्रेस पक्ष ताकदवान दिसत आहे. धुळ्यात राष्टÑवादी काँग्रेसची भक्कम साथ मिळाली असली तरी नंदुरबारात तशी स्थिती नव्हती. अनिल गोटे आणि डॉ.सुहास नटावदकर यांच्या बंडखोरीचा फायदा काँग्रेसला होऊ शकेल, असे वातावरण असले तरी प्रत्यक्षातील स्थिती पुन्हा एकदा वेगळी असू शकते, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे.
नंदुरबारात डॉ.विजयकुमार गावीत यांनी एकहाती ही निवडणूक पेलली. पालकमंत्री जयकुमार रावल यांची साथ त्यांना लाभली. नटावदकर यांची बंडखोरी आणि शिवसेनेची नाराजी याचा परिणाम होऊ नये, यादृष्टीने त्यांनी रणनिती आखली. धुळ्यात कुणाल पाटील यांच्यासारखा तरुण आमदार आणि अनिल गोटे या स्वपक्षीय बंडखोरामुळे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे होते. ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांनी शेवटच्या टप्प्यात याठिकाणी लक्ष घातले अशी चर्चा आहे, त्याचा काय परिणाम होतो, तेदेखील तीन दिवसात कळेल.
केंद्रात कोणते सरकार येते, यावर महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. युती-आघाडी, पक्षांतरे हे सगळे पुढील काळात निश्चित होईल.
खान्देशातील चारही जागा प्रथमच भाजपने गेल्यावेळी जिंकल्या. आता जर या जागा कायम राखल्या तर उत्तर महाराष्टÑाची जबाबदारी असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्थान अधिक बळकट होणार आहे. कदाचित बहुप्रतिक्षित जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपददेखील त्यांना मिळू शकते. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडील अधिकारामध्ये वाढ होऊ शकते. विजय झाल्यास जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत, एकनाथराव खडसे यांच्या कामगिरीची पक्ष दखल घेईल. काँग्रेस-राष्टÑवादीच्यादृष्टीने ही अस्तित्वाची लढाई आहे. विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल.

Web Title: Remedies will result in far-reaching consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव