रावेरची जागा काँग्रेसकडे जाण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:00 AM2019-03-14T11:00:47+5:302019-03-14T11:02:24+5:30

राष्टÑवादीला रत्नागिरीचा पर्याय

Raver's sign to leave for Congress | रावेरची जागा काँग्रेसकडे जाण्याची चिन्हे

रावेरची जागा काँग्रेसकडे जाण्याची चिन्हे

Next
ठळक मुद्दे दिल्ली दरबारी हालचाली गतीमान


जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी कॉँग्रेसकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे असून रत्नागिरीचा मतदारसंघ राष्टÑवादीला देऊन त्याबदल्यात रावेर काँग्रेसकडे घेण्याच्या हालचाली आता दिल्ली दरबारी पोहोचल्या आहेत. तसे झाल्यास रावेरमधून उमेदवारीसाठी काँग्रेसतर्फे माजी खासदार उल्हास पाटील किंवा माजी आमदार शिरीष चौधरी यांचा विचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदार संघात पूर्वी कॉँग्रेसचे प्राबल्य होते. १९९८ मध्ये कॉँग्रेसने हा मतदार संघ भाजपाकडून आपल्या ताब्यात घेतला होता. त्यावेळी डॉ. उल्हास पाटील व डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्यात लढत झाली होती. डॉ. उल्हास पाटील त्यात विजयी झाले. या लोकसभेचा कार्यकाळ १३ महिन्यांचा होता. त्यानंतर १९९९ ला पुन्हा निवडणूक झाली. त्यावेळी भाजपाचे वाय.जी. महाजन विरूद्ध कॉँग्रेसचे डॉ.उल्हास पाटील अशी लढत झाली व त्यात वाय.जी. महाजन विजयी झाले होते. त्यानंतर २००४ मध्येही कॉँग्रेस विरूद्ध भाजपा अशीच काट्याची लढत झाली होती. त्यावेळीही भाजपाने मतदार संघ राखला होता.
राष्टÑवादी कॉँग्रेसला दोन वेळा अपयश
२००९ मध्ये पुनर्रचनेमुळे जळगाव लोकसभा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या या मतदार संघाची ओळख रावेर लोकसभा मतदार संघ अशी झाली. यावेळी हा मतदार संघ राष्टÑवादी कॉँग्रेसकडे आला. राष्टÑवादी कॉँग्रेसने अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती तर भाजपाकडून हरिभाऊ जावळे हे उमेदवार होते. त्यावेळी व त्यानंतर २०१४ मध्ये भाजपाने बाजी मारली. राष्ट्रवादी कॉँगे्रसला सलग दुसऱ्या वेळी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता २०१९ च्या या निवडणुकीत हा मतदार संघ आमच्याकडे द्या अशी मागणी कॉँग्रेसकडून सुरू आहे. यासाठी पक्षाने अद्यापही पाठपुरावा सुरूच ठेवला असल्याचे या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. या संदर्भातील प्रस्ताव दिल्ली दरबारी असून त्यावर दोन दिवसात निर्णयाचे संकेत आहेत.
बदलाची जोरदार चर्चा
राष्टÑवादी कॉँग्रेसने जळगाव लोकसभा मतदार संघातून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र अद्याप रावेर लोकसभा मतदार संघातून कुणाला संधी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. भाजपा विरूद्ध भक्कम उमेदवार अद्यापतरी या पक्षाकडे नसल्याचेच बोलले जात आहे. त्यामुळेच कॉँग्रेसला हा मतदार संघ द्यावा व त्या बदल्यात दुसरा मतदार संघ आपल्याकडे घ्यावा अशी चर्चा दोन्ही पक्षात सुरू असल्याचे समजते. जळगावच्या बदल्यात सिंधुदुर्ग-रत्नागिरी अशी चर्चा सुरू आहे.
पाटील किंवा चौधरी
रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आल्यास निवडणूक लढविण्यासाठी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील इच्छूक आहेत. तर एका गटाकडून माजी आमदार शिरीष चौधरी यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.
नंदुरबारला काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस
नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी स्पर्धेला जोर आला आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे महाराष्टÑ काँग्रेस कमिटीने आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी व जिल्हा परिषदेचे माजी व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत यांचे सुपूत्र अध्यक्ष भरत गावीत या दोघांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यानंतर मात्र सातत्याने अ‍ॅड.के.सी. पाडवी यांचे नाव आघाडीवर राहिले. त्यांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. भरत गावीत यांचे मात्र उमेदवारीसाठी अंतर्गत प्रयत्न सुरू होते. परंतु जाहीरपणे ते कधीही चर्चेत राहिले नाही. आता अंतिम टप्प्यात त्यांनी दिल्ली गाठली असून, पक्षश्रेष्ठींकडे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या नव्या घडामोडींमुळे काँग्रेस वर्तुळातही आता उमेदवारीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, पक्षातर्फे अधिकृत कोणाला उमेदवारी घोषित होते याकडे लक्ष लागले आहे.
धुळ्यात उमेदवारांच्या नावाच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष
कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीत धुळ्याची जागा कॉँग्रेसला तर भाजप-शिवसेना युतीत ही जागा भाजपला सुटलेली आहे. भाजपातर्फे विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे हे यावेळीही पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील, अशीच साऱ्यांची अटकळ आहे. कोणी तसा दावाही केलेला नाही. दुसरीकडे कॉँग्रेसतर्फे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे नाव पक्षाचे उमेदवार म्हणून निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोन्ही पक्षांतर्फे उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा केलेली नसल्याने त्याबाबत उत्सुकता कायम आहे. बहुजन विकास आघाडीतर्फे मालेगाव येथील इंजिनिअर कमाल हाशीम यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली आहे. आपतर्फेही उमेदवारी देण्याच्या हालचारी सुरू आहेत.

Web Title: Raver's sign to leave for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.