Primary teachers in the state rejected the special leave | राज्यातील प्राथमिक शिक्षकांना अधिवेशन विशेष रजा नाकारली

ठळक मुद्देग्रामविकास विभागाचा सुटींवर अंकूश लावण्याचा प्रयत्नशिक्षकांचे अधिवेशन उन्हाळी सुटीमध्येच घेण्याच्या सूचनाविशेष रजा मिळणार नसल्याने गुरुजींमध्ये नाराजी

आॅनलाईन लोकमत
गोंडगाव, ता भडगाव,दि.६ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीच्या वतीने शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन किंवा शिक्षण परिषद घेण्यासाठी शिक्षकांना विशेष रजा मंजूर करण्याबाबतचे पत्र ग्रामविकास विभागाला दिले होते. मात्र ग्रामविकास विभागाने विशेष रजा नाकारून उन्हाळी सुटीमध्ये हे अधिवेशन घेण्याच्या सूचना शिक्षक समितीला दिल्या असल्याचे समजते. त्यामुळे शैक्षणिक सत्रामध्ये शिक्षकांना विशेष रजेच्या निमित्याने मिळणारी सुटी दुरापास्त झाली आहे.
राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. दिवाळीनंतर दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर या संघटनांना वेध लागतात, ते शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे. या अधिवेशनाच्या निमित्याने सात दिवसांच्या विशेष रजा शासनाकडून मंजूर करून घेतल्या जात होत्या. यापूर्वी शासन तशा रजा शिक्षक संघटनांना देत असे. मात्र आता ग्रामविकास विभागाने त्यावर अंकूश लावण्याचा प्रयत्न केला आहे. दुसºया शैक्षणिक सत्रामध्ये अधिवेशन किंवा शिक्षण परिषद घेतल्यास आठ दिवस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी शैक्षणिक सत्राच्या कालावधीत अधिवेशन घेता येणार नाही, असे ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षक समितीच्या राजाध्यक्षांना दिलेल्या पत्राद्वारे सांगितले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करायची असेल, दिशा ठरवायची असेल तर शिक्षकांचे अधिवेशन प्रदीर्घ असलेल्या उन्हाळी सुटीमध्येच घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्याध्यक्षांना २३ नोव्हेंबर रोजी दिले आहे. शिक्षण विभाग व ग्रामविकासाच्या मदतीने उन्हाळी सुटीमध्ये हे अधिवेशन घेण्यासही त्यांनी सांगितले आहे.
शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी
अधिवेशनाच्या निमित्ताने विशेष रजा घेऊन वैयक्तिक कामे करण्याºया गुरुजींना ग्रामविकासाच्या या निर्णयाने धक्का बसला आहे. विशेष रजा मिळणार नसल्याने गुरुजींमध्ये नाराजी पसरली आहे. मुलांचा गुणवत्तेचा विचार करता शासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 अधिवेशन काळात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, ज्ञानरचनावाद तसेच शैक्षणिक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी अधिवेशन होत असते. ग्रामविकास विभागाने स्पष्टपणे नकार द्यायला नको होता. शिक्षकाने जी रजा भोगली त्याचा अभ्यासक्रम तो पूर्ण करतोच. त्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील असून, पुन्हा ग्रामविकास विभागाला पत्र पाठविणार आहे.
-विलास यादवराव नेरकर
जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना, जळगाव