वाढदिवशी केले जाते वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:48 PM2019-06-16T23:48:15+5:302019-06-16T23:50:59+5:30

कासोदा येथे ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांच्या घरी जाऊन एक रोप भेट द्यायचे. त्यांच्याच हस्ते लावायचे. संगोपनाची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच सोपवायची. पुढील वाढदिवसाला हे रोप जगले, किती मोठे झाले, हे पहायला ग्रीन आर्मीचे सदस्य पुन्हा येतील. हे बजवायचे. असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Plantation done on birthday | वाढदिवशी केले जाते वृक्षारोपण

वाढदिवशी केले जाते वृक्षारोपण

googlenewsNext
ठळक मुद्देएरंडोल तालुक्यातील कासोदा येथे स्तुत्य उपक्रमग्रीन आर्मी ग्रुपने घेतला पुढाकारनागरिकांचाही मिळतोय प्रतिसाद

प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांच्या घरी जाऊन एक रोप भेट द्यायचे. त्यांच्याच हस्ते लावायचे. संगोपनाची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच सोपवायची. पुढील वाढदिवसाला हे रोप जगले, किती मोठे झाले, हे पहायला ग्रीन आर्मीचे सदस्य पुन्हा येतील. हे बजवायचे. असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम इतका भावतो आहे की, परिसरातील अनेक गावात ह्या ग्रीनआर्मी ग्रुपचे झपाट्याने अनुकरण सुरू झाले आहे. वर्षभरात गावातील प्रत्येक घरापुढे एक झाड जगलेले दिसेल असा प्रयत्न आहे, तेही शासनाचा एक नया पैसा न खर्च करता...
गावातील काही ज्येष्ठ व तरुण मित्रांनी एकत्रित येऊन वाढदिवसाला वृक्षारोपणाची कल्पना सुचवली. यासाठी कासोदा ग्रीन आर्मी या नावाने आधी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवला. हा ग्रुप तयार करण्याबाबत आधी प्रचार प्रसार केला. उद्देश लोकांना कळविण्यात आला. एक अ‍ॅप बनवून स्वेच्छेने सभासद व्हा, असे आवाहन करण्यात आले. या ग्रुपला एकाच दिवसात मोठा प्रतिसाद मिळाला. २५६ सभासद काही तासातच जुळले. यामुळे आयोजकांचा उत्साह वाढला. गावातील देशविदेशात असणारे सामान्य नागरिक व उच्चपदस्थ सगळेच एका ग्रुपवर दिसू लागले. विचारांची देवाणघेवाण सुरु झाली.
ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्याला फोन करुन शुभेच्छा द्यायच्या व आम्ही तुमच्या घरी रोप देऊन सत्कार करायला येत आहोत. किती वाजेला यायचे ते कळवा. खड्डा पण खोदून ठेवा, असा निरोप दिला जातो. ठरल्याप्रमाणे ज्या सभासदांना शक्य होते ते १० ते १५ लोक संबंधित व्यक्तीकडे जातात. रोप लाऊन जगवायची हमी घेऊन परतात. दि.३१ मेपर्यंत सुमारे ५० घरांसमोर रोपं लावण्यात आली आहेत. गावकऱ्यांचा इतका मोठा प्रतिसाद मिळत आहे की, उद्या कुणाचा वाढदिवस आहे हे आदल्या दिवशी या ग्रुपला माहिती कळवली जाते. काही नागरिक स्वत:च रोप लाऊन या ग्रुपला फोटो शेअर करीत आहेत.
या ग्रुपची लिंक इतर व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर फिरत असल्याने अनेकांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत, पण काही गावांनी यापासून प्रेरणा घेऊन आपल्या गावाच्या नावाने ग्रीनआर्मी असा उपक्रम सुरू केला आहे.
याकामी काही दानशूर व्यक्तींनी ट्रीगार्ड देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम येथे इतका लोकप्रिय होत आहे की, जि.प.च्या अध्यक्षा उज्वला पाटील वाढदिवसाला त्यांच्या घरासमोर रोप लावण्यासाठी फक्त अर्ध्या तासासाठी गावी आल्या होत्या. रोप लाऊन लागलीच जळगावी परतल्या होत्या.
झाडांची रोपं काही लोक भेट देत आहेत. ट्रीगार्ड पण लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यामुळे कोणताही पैसा खर्च न करता हे जनहिताचे मोठे काम होऊ पहात आहे.
सरकार वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पण पाहिजे तेवढा प्रतिसाद दिसत नाही. पण अतिशय छोट्याशा या उपक्रमातून कुठलाही पैसा खर्च न होता ४० हजार लोकसंख्येचे हे गाव ग्रीन सीटी म्हणून ओळखले जावे व कासोदा पॅटर्न म्हणून या उपक्रमाला पाठिंबा मिळावा, अशी तळमळ आयोजकांना आहे.
पण हे करीत असताना या ग्रुपमधील व्यावसायीक, नोकरदार, शेतकरी, शेतमजूर सारेच आपला अतिशय मोलाचा वेळ देत आहेत. त्यामुळे हे शक्य होत आहे. ही चळवळ यशस्वी होऊन गाव, तालुका, जिल्हा ग्रीनसीटी म्हणून ओळखला जावा, असा प्रयत्न सुरू आहे.
 

Web Title: Plantation done on birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.