एका दुपारची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:22 PM2018-03-07T13:22:15+5:302018-03-07T13:22:15+5:30

One afternoon | एका दुपारची गोष्ट

एका दुपारची गोष्ट

Next

एकदा असे झाले. कस्तुरबा निघाली. वेळ दुपारची होती. बिहारातले रणरणते ऊन. सोबत अवंतिकाबाई होत्या. त्या महाराष्ट्रातल्या होत्या. दुर्गाबेन होत्या. तिघी सोबत निघाल्यात. या बायका एका चौकात थांबल्यात. चौकात मोठे चिंचेचे झाड होते. प्रगाढ सावली होती. तसे बिहारात बांबू खूप. गवताला तर काही सुमार नाही. यापासून झोपड्या बनवायच्या. एका झोपडीपाशी या तिघी जणी थांबल्यात. हाक मारली.
कुणी आहे का घरात? घरातून काहीही हालचाल कशी नाही?’ उत्तरादाखल अपार शांतता होती. कस्तुरबा म्हणाली, ‘तहान लागलीय बाई खूप. कुणी आहे का घरात? पेलाभर पाणी मिळेल का प्यायला? दाराशी साºया बायका आहेत तुमच्या.’
झोपडीचे कवाड कुरकुरले. किलकिले झाले. एक हात दाराच्या फटीतून बाहेर आला. कृश, काळा कुळकुळीत हात. हातावर निळ्या रेषांचे घनदाट जाळे. हात काळा कळकट. पेला मात्र कमालीचा स्वच्छ. पेल्यातले पाणी झळाळते. कस्तुरबाने पेला हातात नाही घेतला. पाणी देणारे मनगटच हातात धरले. काळा हात थरथरला.
‘कवाड उघड बाई.’
‘लाज आती है.’
‘बाई ग, तू का नाही येत स्वराज्याच्या कार्यक्रमात बाहेर?’
‘अडचण आहे बाई.’
‘कसली अडचण आहे?’
‘काय करू बाई? आम्हाला चळवळीत सामील व्हायची खूप इच्छा आहे. आम्हाला वाटते की सभेला जावे. नेत्यांचे दोन शब्द आमच्या कानी पडावे, पण काय करणार? मोठी अडचण आहे. या, घरात तर या.’
कस्तुरबा आपल्या सख्यांसोबत घरात गेली. घरात तीन बायका होत्या. एकीच्याही अंगावर धडपणे कपडे नव्हते. एक कपडा घरात असायचा. तो पुरुषाने अंगावर घ्यायचा. बाईला तो अर्धा तुकडा अंगावर अर्ध्या साडीसारखा नेसून बाहेर पडावे लागायचे. अंगावर नेसलेली तेवढी एक काय ती साडी. हिंदुस्तानात असल्या झोपड्या अगणित आहेत जिथे काही काही नाही. अंगावरचे कपडे तेवढे जेमतेम आहेत. खूप माणसे अशी रहातात. त्या झोपडीतली एक बाई म्हणाली, ‘आम्ही दोघा जावा घरात आहोत. सासूबाई लुगडे नेसून बाजाराला गेल्या आहेत. अब्रू झाकण्यासाठी आमच्यापाशी दुसरा कपडा नाही. त्यामुळे आम्हाला बाहेर पडता येत नाही. मन मारून झोपडीत बसून रहावे लागते.’
कस्तुरबाच्या प्रश्नाला हे उत्तर होते. सायंकाळी तिने दुपारची ही करुण कथा गांधीजींना सांगितली. ते गंभीर झाले. त्यांच्या हृदयात वेदना जागली.
(क्रमश:)
- प्रा.विश्वास पाटील

Web Title: One afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव