बांगला देशातील मातृभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 02:07 AM2019-05-18T02:07:02+5:302019-05-18T02:07:10+5:30

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. या भेटीवर आधारित लेखमालेतील नववा भाग ते लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत...

Mother tongue in Bangla country | बांगला देशातील मातृभाषा

बांगला देशातील मातृभाषा

googlenewsNext

बांगला देशात भेटी दरम्यान ‘भाषेचे राष्ट्रीय स्मारक’ म्हणजे काय? असे विचारता त्याचा इतिहास कळला. १९५२ मध्ये पाकिस्तानने उर्दूच राष्ट्रीय भाषा राहील, असा फतवा काढला. त्याला या देशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) प्रचंड विरोध झाला. लोक रस्त्यावर उतरले. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पाकिस्तानने आंदोलन दडपून टाकण्यासाठी अमानुष आणि निर्दयी गोळीबार केला. त्यात हजारो विद्यार्थी शहीद झाले. लोक ठाम होते आणि भाषा टिकली. शेवटी तीच राष्ट्रीय भाषा झाली आणि वापरलीही जाते.
यत्रतत्र सर्वत्र बंगाली भाषेतूनच कारभार आहे हे सर्व पाहून माझ्या अक्षरश: अंगावर काटा आला. किती महत्व असते मातृभाषेचे! जगभरचे पंडित त्याचे महत्त्व सांगत असतात. शिवाय विद्यार्थ्यांनी आंदोलन केले ही केवढी मोठी गोष्ट. मात्र आपल्याकडे माझी मायमराठी टिकून राहावी म्हणून स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत गळे काढणा-या, तसेच मायमराठीसाठीच्या धोरणे ठरवणाऱ्या खात्याचे मंत्री व त्यातले बाबूलोक या सगळ्यांचे वर्षानुुवर्षे वागणे पाहून आपण किती निष्काळजी आहोत याची खंत वाटली. याचबरोबर हिंदी नको म्हणून आपल्या दक्षिणेकडच्या राज्यांनी इंग्रजीच हवी (हिंदी नेव्हर, इंग्लिश एव्हर) अशी घोषणा आणि पोस्टर्स लागली होती) या अनाठायी हट्टपायी पेटवलेले रानही आठवले. कुठे या एवढ्याशा देशात भाषा टिकावी म्हणून आणि आरक्षण रद्द करावे म्हणून आंदोलने करणारे विद्यार्थी आणि कुठे आपल्याकडच्या विद्यार्थ्यांच्या संघटना. या संघटनांचे राजकीयीकरण झाल्याने विद्यार्थ्यांचे आणि पयार्याने आपल्या देशाचे काही बाबतीत किती नुकसान झाले आहे त्याचीही जाणीव प्रकर्षाने झाली.
या चौकात हजारोंनी तरुण मंडळी जमून बंगाली लोकसंगीतातील समूह गीते पारंपरिक वाद्यांसह म्हणत होती. सगळा चौक तरुणाईने, उत्साहाने भरून फुलून गेला होता. ज्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होते त्यात बव्हंश पुस्तके बंगाली भाषेतीलच होती. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये आबालवृद्ध होतेच पण स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. बुरख्याची सक्ती गेली आहे हे जाणवत होतेच. काहीजणींनी बुरखा आणि हिजाब घातला होता. पण चेहरे खुले होते. या मोठ्या जमावाने तेथल्या खुलेपणावर शिक्का मोर्तब केले.
ढाक्का शहरात फिरताना वाहतुकीची प्रचंड कोंडी आपल्याला अडवत राहते. कुठेही जायचे ठरवताना कोंडीतून जायला किती वेळ लागेल हे मनाशी ठरवल्याशिवाय भेटीची वेळच ठरवता येत नाही. अक्षरश: कासव गतीने वाहने चालतात. त्याविषयी भेटलेल्या लोकांशी थोड्या गप्पा मारल्या.त्यातल्या एकाने वाहतुकीचे गणित मांडले. ते असे की, सर्वत्र बहुतेक सीएनजी वापरला जातो आणि तो स्वस्त आहे. त्यामुळे वाहने चालवणे परवडते. परिणामी एकट्या ढाक्का शहरात रोज नवी १२ हजार चारचाकी वाहने रस्त्यावर येतात. शहरातील वाहतुकीचा साधारण वेग ताशी ७ कि.मी.पेक्षा जास्त राहत नाही आणि फुटपाथवर माणसांचा पायी चालण्याचा वेग ४ कि.मी. सहज असतो. म्हणजे काही दिवसांनी माणसे गाड्या सोडून पायीच जातील! ढाक्का ते नारायणगंज अंतर फक्त २४ कि.मी. आहे. पण वाहतूक कोंडीमुळे चौपदरी रस्त्यानेसुद्धा जायला कमीतकमी दीड तास तरी लागतोच. दोन्ही शहरे एकच झाली आहेत. इतकी वस्ती दोन्ही शहरांची पसरत गेली आहे. ढाक्का शहराच्या चहूबाजूंनी हीच परिस्थिती आहे. (क्रमश:)
-सी.ए.अनिलकुमार शाह, जळगाव

Web Title: Mother tongue in Bangla country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.