आमदार स्मिता वाघ यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:53 PM2019-03-23T12:53:24+5:302019-03-23T12:53:35+5:30

विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना टाळले

MLA Smita Wagh announces candidature from BJP | आमदार स्मिता वाघ यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

आमदार स्मिता वाघ यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

googlenewsNext


जळगाव : आमदार स्मिता वाघ यांना भारतीय जनता पक्षाने जळगाव लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवारी मध्यरात्री उमेदवारी जाहीर केली.
या निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघातून खासदार ए.टी.पाटील यांची उमेदवारी कापली जाणार अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून होती. त्यामुळे कुणाला उमेदवारी दिली जाते याबाबत उत्सुकता होती. यात खासदार ए.टी. पाटील हे स्वत: पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशिल होते. या बरोबरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, आमदार उन्मेश पाटील यांच्यात स्पर्धा होती. त्यामुळे पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराचे नाव आले नाही. मात्र शुक्रवारी रात्री पक्षाने जाहीर केलेल्या यादीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी आमदार स्मिता वाघ यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाले. आता वाघ यांची लढत राष्टÑवादीचे नेते, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या बरोबर होणार आहे.
रावेरचा आघाडीचा तिढा कायम
रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी या मतदार संघातून आघाडीपैकी राष्ट्रवादी की काँग्रेससाठी ही जागा सुटणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.
धुळे: दोन ‘बाबां’मध्ये रंगणार लढत
धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्ष काँग्रेस व भाजपाने उमेदवार जाहीर केल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे (बाबा) यांना पुन्हा मैदानात उतरविले. तर काँग्रेसने ऐनवेळेस आपला निश्चित उमेदवार माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (बाबा) यांना मैदानात उतरविल्याने निवडणुकीत वेगळीच रंगत भरली आहे. दोन बाबांमध्ये लढत रंगणार आहे. यात शहराचे आमदार अनिल गोटे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करुन मुंबईत राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या असून या भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलणार का, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे.
गोटे व शरद पवारांची मुंबईत भेट
भाजपचे धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा बंड पुकारत धुळे लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी जाहीर केली. तसेच मुंबईत त्यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी मदतीचे आवाहन केले. शरद पवार यांनी आघाडी धर्म आपण पाळणार असून काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असे स्पष्ट सांगितले. चर्चेअंती स्थानिक नेत्याशी बोलून कळवितो, असे पवार यांनी सांगितल्याचे स्वत: आमदार गोटे म्हणाले आहे. आता दुसऱ्या भेटीत काय ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नंदुरबार :स्वातंत्र्यानंतर प्रथमच तुल्यबळ
उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये लढत
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघात पारंपारिक काँग्रेस विरूद्ध भाजप अशी पक्षीय लढत असली तरी या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पक्षांतर्फे या वेळी प्रथमच डॉक्टर व वकीलीची पदवी घेतलेले उच्च शिक्षीत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर आल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघात काँग्रेस, भाजप व वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षातर्फे उमेदवार जाहीर झाले आहेत. अजून काही संघटना व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता आहे. अर्थात मतदार संघातील राजकीय चित्र पाहता या ठिकाणी काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच लढत रंगणार आहे. काँग्रेसने अ‍ॅड.के.सी. पाडवी यांना तर भाजपने विद्यमान खासदार डॉ.हीना गावीत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आजवरच्या या मतदार संघातील लढतीचे चित्र पाहता या वेळी प्रथमच दोन तुल्यबळ पक्षांचे पदवीधर उमेदवार रिंगणात आहेत. या पूर्वी अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी जनता दलातर्फे दोन वेळा उमेदवारी केली आहे. दोन्ही वेळा ते पराभूत झाले. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी त्यावेळी काँग्रेसचे माणिकराव गावीत व भाजपचे कुवरसिंग वळवी होते. तिवारी काँग्रेसतर्फे स्व.गोविंदराव वसावे, भाजपतर्फे डॉ.सुहास नटावदकर, अखिल भारतीय सेनेकडून अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनीही यापूर्वी उमेदवारी केली आहे. तथापि त्यांचे प्रतिस्पर्धी अर्थातच पदवीधर किंवा पद्व्युत्तर शिक्षण घेतलेले नव्हते.
या वेळी प्रथमच काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातर्फे पदवीधर उमेदवार देण्यात आले असून, डॉक्टर विरूद्ध वकील, अशी ही लढत रंगणार आहे.

Web Title: MLA Smita Wagh announces candidature from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.