मराठी बिग बॉस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:19 AM2019-07-22T01:19:17+5:302019-07-22T01:19:31+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत योगिता पाटील...

Marathi Big Boss | मराठी बिग बॉस

मराठी बिग बॉस

Next

सध्या मराठी बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. कधी त्या घरात घडलेल्या हिंसक कृतीमुळे, तर कधी त्यातल्या एका स्पर्धकाला थेट घरातून करण्यात आलेल्या अटकेमुळे! कधी एका स्पर्धकाने दुसऱ्या स्पर्धकाविषयी वापरलेल्या अर्वाच्य भाषेमुळे, तर कधी पुरुष स्पर्धकाकडून महिला स्पर्धकावर झालेल्या आक्रमकतेमुळे!
आंतरराष्ट्रीय स्वरूप एकसारखे असणाºया या शोचा मराठीतला हा केवळ दुसराच सीझन, पण तरीही डेली सोपला वळसा घालून तो मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरात स्थिरावत चाललाय हे मात्र नक्की. नेमकं काय असावं बरं यात जे मराठी प्रेक्षकांना आकर्षित करतं? वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेले, नावाजलेले चेहरे जेव्हा स्वत:चं कुटुंब, मोबाईल, करमणुकीची इतर साधनं असं सगळं विसरून, संपूर्ण बाह्य संपर्क तोडून एका विशिष्ट कालावधीसाठी एकाच घरात रहायला येतात तेव्हा आपल्या मनात असलेल्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध असा त्यांचा चेहरा आपल्यासमोर येतो. सुनेचा उत्तम अभिनय करणारी एखादी अभिनेत्री खाष्ट वागते. लोकसंपर्क समाजसेवेत अग्रेसर असणारी एखादी व्यक्ती तिथे स्त्रीचा अनादर करताना दिसते. गोड गळ्याने गाऊ शकणारी एखादी गायिका कर्कश आवाजात भांडताना दिसते. आपल्याला हे सगळं पाहायला आवडतं. कारण समाजाचंच तर हे प्रतिबिंब असतं. समाजात अशा अनेक व्यक्ती आपल्याला पावलोपावली भेटतात. अगदी खळखळ हसणारी व्यक्ती मनातून दु:खी असू शकते आणि खूप जास्त गोड बोलणारी व्यक्ती आतून कडवट मनाची असू शकते. आपल्या श्रद्धांना असे वास्तवात तडे जाण्याआधी आपण त्याचा सराव करतो अशा एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमधून. भावनांचा कस लागणाºया या घरात क्षणोक्षणी स्पर्धकांचे खरंतर माणसांचे चेहरे बदलले जातात. जिंकण्याची ईर्षा माणसाला अगदी कोणत्या थराला नेऊ शकते हे पाहून आपण अचंबित होतो. रोज कट-कारस्थाने करायची, दिवसरात्र समोरच्याला कसं नमवता येईल याचा विचार करत रहायचंं, खोटं हसायचं, खोटं बोलायचं आणि खोटं रडायचंदेखील! हे असं सगळं इतकं स्पष्ट दिसत असतानाही मध्यमवर्गीय माणूस यातल्या काही पात्रांमध्ये अडकत जातो. त्याला स्वत:चं प्रतिबिंब त्या स्पर्धकांत दिसतं. प्रत्यक्ष आयुष्यात आपणही कुणाकडून तरी नकळत फसवले गेलेलो असतो. कुणीतरी आपल्याला कॉर्नर करून पुढे निघून गेलेलं असतं. आपण ओरडून सांगितलेला असतो आपला निर्दोषपणा. तरीही कधीतरी आपल्याला सुळावर चढवलं गेलेलं असतं आणि आपल्याचसमोर असत्याला डोक्यावरही घेतलं गेलेलं असतं. ही सल त्या स्पर्धकाच्या जिंकण्यातून जरा कमी करण्यासाठी मग असा एखादा बिग बॉस आपल्या घरापर्यंत येतो. डेली सोप्सच्या कथांमधील अतार्किकता आणि अशा एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमधील वास्तवाचा भडकपणा या दोघांत हेलकावत राहतं ते केवळ मध्यमवर्गीय मन. विरंगुळा म्हणून पाहता पाहता ते आपल्या जगण्याचा भाग होत जातात. अर्थात सतत बदलत जाणाºया मुखवट्यांंच्या या जगात मुखवटा न घालता येऊ शकणाऱ्यांनी एकदा या घरात डोकवायला तशी काही हरकत नाही.
हे घर जरी बिग बॉसच्या आदेशानुसार चालत असलं तरी सुदैवाने प्रत्यक्षात आपल्या आयुष्याचे आपणच बिग बॉस आहोत. त्यामुळे काय घ्यायचं, कितपत घ्यायचं आणि कोणत्या क्षणी सोडून द्यायचं हे आपल्याच हाती ! ‘मेरे अधुरेपन को वो पूरा करता है, इक सपनों का जहाँ है जो मुझे आबाद करता है।’ फक्त वेळीच स्वप्न आणि वास्तवाची जाणीव मध्यमवर्गीय मनाला व्हावी इतकंच..
-योगिता पाटील, चोपडा, जि.जळगाव

Web Title: Marathi Big Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.