Lok Sabha Election 2019 : मतदान केंद्रात मोबाईल वापरास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:55 AM2019-04-22T11:55:28+5:302019-04-22T11:56:16+5:30

पाळणा घर, शेड, पाण्याची व्यवस्था

Lok Sabha Election 2019: Disallow Mobile Use in Polling Station | Lok Sabha Election 2019 : मतदान केंद्रात मोबाईल वापरास मज्जाव

Lok Sabha Election 2019 : मतदान केंद्रात मोबाईल वापरास मज्जाव

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील ३४ लाख ३१ हजार ४८५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनदेखील मतदानाच्या प्रक्रियेसाठी सज्ज असून या वेळी मतदान केंद्रांवर मतदारांसाठीही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासह मतदान केंद्रात मोबाईल वापरास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
निवडणूक प्रक्रिया व तयारी संदर्भात माहितीसाठी रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी जळगाव व रावेर मतदार संघातील तयारीची माहिती दिली.
मोबाईल वापराची केवळ अधिकाऱ्यास परवानगी
मतदानाची गुप्तता अबाधीत राहावी, यासाठी मतदान केंद्रात मतदारांना मोबाईल वापरास मज्जाव करण्यात आला आहे. या पूर्वी काही ठिकाणी मोबाईलवर चित्रीकरण झाल्याचा प्रकार घडल्याने मतदान गुप्ततेचा हा भंग होत असल्याचा गंभीर प्रकार असल्याने दक्षता म्हणून मतदान केंद्रात मोबाईल वापरास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. ढाकणे म्हणाले. केंद्रामध्ये केवळ मतदान केंद्र अधिकाºयालाच मोबाईलचा वापर करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाळणा घर, शेड, पाण्याची व्यवस्था
उन्हाळ््याचे दिवस लक्षात घेता मतदारांसाठी मतदान केंद्राजवळ शेडची व्यवस्था करण्यासह पिण्याचेही पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या सोबतच पाळणाघर, वैद्यकीय कीटचीदेखील या ठिकाणी व्यवस्था राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदार चिठ्या उपलब्ध राहणार
ज्या मतदारांना मतदान चिठ्ठ्या मिळल्या नसतील त्यांनाही मतदान करता यावे व नाव शोधण्यास मदत व्हावी, यासाठी मतदान केंद्राबाहेर निवडणूक कर्मचारी मतदार चिठ्या घेऊन उपलब्ध राहणार आहेत.
सहावाजेपर्यंत रांगेत असलेल्यांना प्रवेश
मतदान केंद्रात ६ वाजेपर्यंत रांगेत असणाºया प्रत्येक मतदारांना मतदान करता येणार आहे. यासाठी संबंधित मतदार सहावाजेपर्यंत रांगेत असेल त्यालाच प्रवेश दिला जाईल, सहा वाजेनंतर कोणीही आले तरी त्याला मतदान कक्षात प्रवेश मिळणार नाही, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. रांगेतील मतदारास मतदान केंद्रातील अधिकारी एक कूपन देतील. ज्यांच्याजवळ कूपन असेल त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
७०० व्हील चेअरची व्यवस्था
दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात सहज पोहचता यावे यासाठी जिल्ह्यात मतदान केंद्रांवर ७०० व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
‘टेस्ट व्होट’द्वारे मतदान यंत्राची खात्री
मतदान यंत्राबाबत कोणी आक्षेप घेतल्यास त्यासाठी टेस्ट व्होट’ घेऊन मतदान यंत्राबाबत खात्री करून दिली जाईल, असे डॉ. ढाकणे म्हणाले. मात्र आक्षेप चुकीचा असल्यास संबंधितास सहा महिन्याची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत झालेल्या मतदानादरम्यान कोठेही चुकीचे मतदान झाल्याचे समोर आले नाही, असेही ते म्हणाले.
दर दोन तासांनी कळणार मतदानाची टक्केवारी
मतदानाच्या टक्केवारीबाबत माहिती घेण्यासाठी मोबाईलवर सुविधा अ‍ॅपची उपलब्धता असून त्याद्वारे संंध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक दोन तासांची मतदानाची टक्केवारी समजू शकणार आहे.
कोतवालच करणार जेवणाची व्यवस्था
जळगाव मनपा निवडणुकीच्या वेळी एका मतदान केंद्रावर मतदानाच्या आदल्या रात्री कर्मचाºयांसाठी वाहनातून जेवणाची सोय करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आता असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून मतदान केंद्रात कर्मचाºयांसाठी महसूल विभागाच्यावतीने कोतवालच जेवणाची व्यवस्था करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
कोठेही अनुचित प्रकार नाही
जिल्ह्यात प्रचारदरम्यान कोठेही मोठ्या गंभीर घटना घडल्या नसल्याचे या वेळी सांगण्यात आले.
निवडणूक कर्मचाºयांना मतदानाची व्यवस्था, सर्व्हिस व्होटर या विषयीदेखील माहिती दिली.
जिल्ह्यातील ३ हजार ६१७ मतदान केंद्रांवर 23 एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी १७ लाख ९१ हजार ६६० पुरुष तर १६ लाख ३९ हजार ७३२ महिला व इतर ९३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक प्रक्रियेच्या कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांना सोमवारी सकाळी ८ वाजता विधानसभा क्षेत्रावर बोलावण्यात आले असून त्याठिकाणी मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप होईल. त्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.
जिल्ह्यात ३६ मतदान केंद्र संवेदनशील
जळगाव जिल्ह्यातील ३६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघातील १० तर रावेर लोकसभा मतदारसंघातील २६ मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, ११ उपविभागीय पोलीस अधिकारी, २७ पोलीस निरीक्षक, १६४ सहायक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक, ४ हजार ४९४ पोलीस शिपाई आणि १ हजार ३९२ गृहरक्षक दलाचे कर्मचारी बंदोबस्ताची धुरा सांभाळतील. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या ३, मध्यप्रदेश राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ तर रेल्वे पोलीस दलाची १ तुकडी मदतीला असणार आहे.
प्रशासनाची तयारी पूर्ण
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान यंत्रात काही बिघाड झाला तर अवघ्या अर्धा तासाच्या आत पयार्यी व्यवस्था करणारे पथक नेमण्यात आले आहे. या पथकात अधिकारी व कर्मचारी स्वतंत्रपणे नियुक्त केले आहेत. वाहनेदेखील वेगळी असणार आहेत.
गर्दीच्या मतदान केंद्रांचे चित्रीकरण
मतदानाच्या दिवशी सकाळी ६ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात येणार असून ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. गर्दीच्या मतदान केंद्रांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
कारवाई
निवडणूकीच्या कालावधीत जिल्ह्यात १६ लाख १७ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले असून ४३ हजार २८१ लीटर अवैध दारु जप्त करण्यात आली. तर चाळीसगाव येथील स्थिर निगराणी पथकाने ५ किलो चांदी जप्त केली. आचारसंहिता भंगाचे १५ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ८ प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे सी-व्हीजिल अ‍ॅपवर ४५ तक्रारींची नोंद झाली. त्यापैकी २२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष व उमेदवारांना प्रचारासाठी लागणाºया विविध परवानग्या देण्यासाठी सुविधा प्रणालीद्वारे ९२ अर्ज प्राप्त झाले होते.
मतदान करणे हा आपला हक्क असून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार (महसूल) मंदार कुलकणी उपस्थित होते.

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Disallow Mobile Use in Polling Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.