जिद्द कलियुगातील श्रावण बाळाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:35 PM2018-08-19T15:35:32+5:302018-08-19T15:37:07+5:30

आठ वर्षे कष्ट करून रहमानने आईला हज यात्रेला पाठवले

Junk Kidnapped Shravan Child | जिद्द कलियुगातील श्रावण बाळाची

जिद्द कलियुगातील श्रावण बाळाची

Next


संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : रस्त्यावर स्टोव्ह सुधारून कुटुंबाची उपजीविका करून त्यातून रोज रुपया रुपया जमवून तब्बल आठ वर्षांनंंतर कलियुगातील श्रावण बाळ रहमानने आपल्या वृद्ध मातेला हज यात्रेला रवाना केले आहे. जन्मदात्या आईवडिलांना अनाथाश्रमात सोडून देणाऱ्या मुलांसाठी रहमान आदर्श ठरला आहे.
मुस्लीम धर्मात हजयात्रा करणे म्हणजे पवित्र कार्य समजले जाते. ज्याने हजयात्रा केली आहे त्याला समाजात आदराचे स्थान मिळते. त्यामुळे आपल्या आईलादेखील हजयात्रेला पाठवण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती मनात आणून सुभाष चौकातील एक कोपºयावर उघड्यावर स्टोव्ह दुरुस्तीचा व्यवसाय करणाºया रहमान अरबने आपल्या रोजच्या अल्प कमाईतून जेमतेम उपजीविका करून त्यात किरकोळ रुपया रुपया बचत करण्याचा निश्चय केला
रॉकेलवर चालणारा स्टोव्ह कालबाह्य होत चालला आहे. गॅस आणि विद्युत शेगड्या परवडतात आणि रॉकेल मिळणे कठीण त्यामुळे बोटावर मोजणाºया नागरिकांकडे स्टोव्ह असून कधीतरी खराब होतो. त्यामुळे दुरुस्तीला येणाºया स्टोव्हची संख्या कमी कमी झाली. व्यवसाय जेमतेम चालतो. तरी रहमानने चिकाटी सोडली नाही. कोणत्याही परिस्थितीत आपल्या आईला हजला पाठवायचे म्हणून बचत सुरू केली.
तब्बल आठ वर्षांनी रहेमानची आई अबेदाबी रशीद अरब (वय ८१ वर्षे) यांना त्यांच्या श्रावण बाळाने नुकतेच हजयात्रेला रवाना केले आहे.
रहेमानचे वडील रशीद अरब यांच्या पश्चात सुभाष चौकात रस्त्याच्या कडेलाच मिळेल तेवढ्या रोजगारावर रहेमानने आपला रहाटगाडा ओढला. वडिलांच्या मृत्यूनंतर रहेमान घरात कर्ता झाला. आई, पत्नी, दोन मुुले, एक मुलगी असा सहा जणांचा परिवार तो सांभाळतो. यासाठी घरूनदेखील प्रोत्साहन मिळाले. यामुळे सन २०११ पासून पैसे जमा करण्यास त्याने प्रारंभ केला. कारण हजयात्रेसाठी सुमारे अडीच लाख खर्च अपेक्षित होता. काहीही होवो दरमहा दीड ते दोन हजार रुपये आईसाठी बाजूला काढायचेच, असा निश्चय रहेमानने केला होता. दरम्यानच्या काळात अनेक अडचणीदेखील आल्या, पण तो हरला नाही. २०१२ साली राहेमानने आईचे पासपोर्ट बनविले आणि २०१८ ला हज कमेटीत त्याच्या आईचा नंबर लागला.
जमा झालेल्या पैशातून सुमारे दोन लाख २४ हजार रुपये रहेमानने हज कमेटीत भरले व काही पैसे आईला यात्रेसाठी सोबत दिले. असा एकूण अडीच लाखांच्या आसपास रहेमानला खर्च लागला. ४५ दिवसांची हजयात्रा करून २३ सप्टेंबर रोजी आई परतणार असल्याचे रहेमानने सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात रहेमानने बोलताना सांगितले की, मुस्लीम धर्मात हजयात्रेला विशेष असे महत्त्व आहे. केवळ कष्ट्याच्या पैशातूनच ही यात्रा केली जात असते. माझ्याकडे पैसा व मोठा व्यवसाय नसला तरी जिद्द आणि मनस्वी इच्छा होती. प्रत्यक्षात हद्दपार झालेल्या स्टोव्ह दुरुस्तीच्या व्यवसायात स्वत:चे कुटुंब पोसनेही अशक्य आहे. मात्र अल्लामियानेच हे सर्व शक्य केलं. आज केवळ अतिशय गरीब असलेल्यांकडेच स्टोव्ह आहे. अशांच्या घरात किमान दोन वेळचे जेवण कायम बनावे यासाठीच स्टोव्ह दुरुस्तीचा व्यवसाय आपण नियमित सुरू ठेवला असल्याचे रहेमानने भावनिक पणे सांगून या व्यवसायातून जे अपेक्षित होते ते सर्व मिळाल्याने समाधानी असल्याची भावना व्यक्त केली.
आजच्या युगात अनेक मुले मोठी झाल्यावर जन्मदेत्या आईवडिलांना अंतर देऊन आपल्या कर्तव्यापासून दूर पळत असतात. अशांना या गरीब रहेमानने कलियुगातील श्रावण बाळ बनून एक शिकवणच आजच्या पिढीला दिली असून, या आदर्शाचे अनुकरण करणे अपेक्षित आहे.

Web Title: Junk Kidnapped Shravan Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.