जळगावात डाळींचे दर स्थिर, नव्या तांदळाची आवक वाढली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:11 PM2018-12-20T12:11:11+5:302018-12-20T12:11:53+5:30

बाजारगप्पा :  बाजारात नवीन डाळींची आवक विशेष नसून, मागणीदेखील घटली आहे.

In Jalgaon, the rate of pulses has been steady, the arrival of new rice has increased | जळगावात डाळींचे दर स्थिर, नव्या तांदळाची आवक वाढली 

जळगावात डाळींचे दर स्थिर, नव्या तांदळाची आवक वाढली 

Next

- अजय पाटील (जळगाव)

कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव येथे  गेल्या आठवडाभरापासून डाळींच्या दरात कुठलीही वाढ किंवा घट झालेली नाही. बाजारात नवीन डाळींची आवक विशेष नसून, मागणीदेखील घटली आहे, अशी माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.

दोन आठवड्यांपूर्वी डाळींच्या दरात ३०० रुपयांची घट झाली होती. त्या तुलनेत आता आठवडाभरात डाळींच्या भावात कुठलीही घट किंवा वाढ झाली नाही. सध्या तूर डाळीचे दर ५९०० ते ६३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर उडीद डाळीचे ६००० ते ६४००, मूग डाळीचे ७००० ते ७४००, चना डाळ ५८०० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल इतके दर आहेत. उडीद व मूग डाळीचा हंगाम जवळपास संपला असून, आवकदेखील घटली आहे. जळगावच्या बाजारात उडीद व मुगाची आवक जिल्ह्यातूनच होते. तर चना व तूर डाळीची सर्वाधिक आवक ही मराठवाडा व विदर्भात होते. मात्र, ही आवकदेखील कमी झाली असल्याची माहिती प्रवीण पगारिया यांनी दिली आहे. 

यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामात मूग व उडदाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत बाजार समितीत उडीद व मुगाची आवक पूर्णपणे कमी झाली आहे.  याचे दुसरे कारण झालेल्या अल्प उत्पन्नापैकी शेतकऱ्यांनी ५० ते ६० टक्के माल  बाजारात विक्रीसाठी आणला तर काही माल घरगुती वापरासाठी राखीव ठेवला असल्याने बाजारात यंदा उडीद व मुगाची आवक कमी झाली आहे. 

बाजारात नव्या तांदळाची आवक वाढली असून, मागणीदेखील वाढली आहे. शहरात छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश,आंध्र प्रदेशमधून तांदूळ येतो. मागणी वाढली असली तरी तांदळाचे दर स्थिर आहेत. सुगंधी चिनोरचे दर ३४०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कालीमूछ तांदळचे दर ३८०० ते ४००० रुपये, कोलमचे ४२०० ते ४५००, मसुरीचे दर २४०० व २५०० इतके आहेत.

नवीन तांदळाची मागणी घरगुती ग्राहकांकडून वाढली आहे. अनेक ग्राहक वर्षभरासाठी साठवणूक करण्यासाठी नवीन तांदळाला प्राधान्य देत आहेत. तर सध्या लग्नसराई असून, लग्नासाठीच्या कार्यक्रमात नवीन तांदळाऐवजी जुन्या तांदळालाच मागणी असल्याचे पगारिया यांनी सांगितले. दरम्यान, तांदळाचे दर सध्या जरी स्थिर असले तरी मागणी वाढण्याची शक्यता असल्याने भावातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.   

गेल्या पंधरा दिवसांपासून मध्यप्रदेशमधील निवडणुकांमुळे गव्हाची आवक घटली होती. मात्र, आता निवडणूक संपल्यामुळे गव्हाची आवक वाढली आहे. मात्र, दरात कोणताही चढ-उतार नाही. मक्याच्या दरात १०० रुपयांची घट झाली असून, सध्या मक्याचे दर १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.  सोयाबीनच्या दरातही १०० रुपयांची घट झाली आहे. दादर, ज्वारी व बाजरीच्या दरातदेखील कुठलीही वाढ किंवा घट झाली नसून, आठवडाभरापासून दर स्थिर आहेत.

Web Title: In Jalgaon, the rate of pulses has been steady, the arrival of new rice has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.