जळगावच्या बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:47 AM2018-12-27T11:47:23+5:302018-12-27T11:47:39+5:30

 बाजारगप्पा : जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे भाव कमी असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.

In the Jalgaon market, the arrival of new rice has increased | जळगावच्या बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक वाढली

जळगावच्या बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक वाढली

Next

- विजयकुमार सैतवाल ( जळगाव )

नवीन तांदळाची आवक जळगावच्या बाजारात वाढली असून, जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे भाव कमी असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून गहू, ज्वारी, बाजरी, रबी ज्वारीला मागणी वाढल्यामुळे भाव वाढ थांबून या सर्वांचे भाव स्थिर राहण्यासह डाळींचेही भाव स्थिर आहेत. 

नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, छत्तीसगड, मध्यप्रदेशसह गोंदिया, तुमसर या भागातून नवीन तांदूळ येऊ लागला आहे. नवीन चिनोर तांदळाचे भाव ३००० रुपये प्रतिक्विंटल असून, जुन्या चिनोर तांदळाचे भाव ३४०० रुपये प्रतिक्विंटल आहे. सध्या आवक कमी असली तरी आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती जळगाव दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.  

यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादन घटण्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन  आवक घटल्याने डाळींच्या भावामध्ये तेजी सुरू होती. मात्र या आठवड्यात डाळींचे भाव स्थिर आहेत.मुगाच्या डाळीचे भाव ७००० ते ७४०० रुपयांवर स्थिर आहे.  उडदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६३००  रुपये प्रतिक्विंटल, हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६००० ते ६४००  रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. दोन आठवड्यांपूर्वी तूर डाळीच्या भावात वाढ झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात तूर डाळ ७००० ते ७४००  रुपये प्रतिक्विंटलवर आली. या आठवड्यातही ती याच भावावर स्थिर आहे.चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ६६७५ रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तसेच चांगल्या दर्जाच्या उडदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.  

गेल्या महिना-दीड महिन्यात गव्हाला मागणी वाढल्याने १०० रुपये प्रतिक्विंटलने गव्हाच्या भावात वाढ झाली होती. मात्र सध्या मागणी नसल्यामुळे भाव स्थिर असून  ग्राहकांना दिलासा आहे. १४७ गहू २६५० ते २७५०  रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे. तसेच लोकवन गहू २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रतिक्विंटल, चंदोसी ३८५० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे.

बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. ज्वारी, बाजरी तसेच रबी ज्वारीचे भावदेखील या आठवड्यात स्थिर आहेत. ज्वारीचे भाव २००० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, बाजरी २३०० रुपये प्रतिक्विंटल, दादर ३००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  

जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर तसेच अकोला या भागातून मुगाची आवक होते तर उडदाची जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून आवक होत असते. मात्र, यंदा पावसाच्या कमी प्रमाणामुळे सर्वच ठिकाणाहून येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. येणाऱ्या काळात पुन्हा भाववाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: In the Jalgaon market, the arrival of new rice has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.