इच्छुकांची वाढती संख्या भाजपची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:20 AM2019-07-21T00:20:12+5:302019-07-21T00:20:50+5:30

प्रभावहीन मतदारसंघासाठी दोन्ही काँग्रेसमधील तुल्यबळ उमेदवाराच्या प्रवेशासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न, अकार्यक्षम मंत्र्यांना घरी बसविण्याच्या निर्णयाची पुनरावृत्ती होण्याची विद्यमान आमदारांना धास्ती

Increasing number of aspirants in BJP's headache | इच्छुकांची वाढती संख्या भाजपची डोकेदुखी

इच्छुकांची वाढती संख्या भाजपची डोकेदुखी

Next

मिलिंद कुलकर्णी
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या दौऱ्यांमुळे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वातावरणातून राजकीय पक्ष, त्यांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते बाहेर पडत नाही, तोच विधानसभेची रणधुमाळी सुरु होणार आहे. भाजप-शिवसेनेला खान्देशात मिळालेले घवघवीत यश पाहता दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. एकमेकांचे पत्ते कापणे, पंख छाटणे, अफवा पसरविणे, कुजबूज घडवून आणणे या प्रकारांना जोर आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. अपेक्षित इच्छुक अर्जाचे सोपस्कार करणार असले तरी त्यांच्याविषयी पक्षालादेखील शाश्वती नाही. अनेक बडे नेते भाजपाशी संधान साधून आहेत, त्यात खान्देशातील काही मंडळीदेखील आहे. विरोधात राहून पाच वर्षे झाली; केंद्रात पुन्हा भाजप सरकार आल्याने आणखी पाच वर्षे विरोधात काढण्याची दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांची मानसिकता नाही. भाजपादेखील ज्या मतदारसंघात पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाही, तेथे दोन्ही काँग्रेसमधून उमेदवार आयात करण्याला प्राधान्य देत आहे. ज्याठिकाणी पक्षाकडे एकापेक्षा अधिक उमेदवार आहेत, तेथे मात्र इच्छुक असले तरी कोणतेही आश्वासन न देता प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला जात आहे.
मंत्रिमंडळात नुकत्याच झालेल्या फेरबदलात अकार्यक्षम मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी घरी बसविले आणि नव्या दमाच्या काही आमदारांना संधी दिली. हाच वस्तुपाठ विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना लावण्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांना धास्ती वाटत आहे. पक्षाकडे एका जागेसाठी किमान २० इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे भाजप आवर्जून भाकरी फिरवू शकतो. अर्थात त्यासाठी स्थानिक नेत्यांचे मत निर्णायक ठरणार आहे. भाजपच्या किती आमदारांचे पत्ते कापले जातात आणि कुणाचे कायम राहतात, याची सध्या भाजपच्या वर्तुळात चर्चा सुरु आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. विधानसभेत त्यांनी केलेले भाषण, रावेरमधील मेळाव्यात तिकीट नाकारले तरी पक्ष सोडणार नसल्याचे केलेले विधान यावरुन तर्कवितर्क होत आहे. भाजपमधील चर्चेनुसार मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना पक्ष तिकीट देईल आणि खडसे यांना राज्यपालपद किंवा राज्यसभेचे सदस्यत्व देऊ करेल. अशा स्थितीत खडसे हा प्रस्ताव स्वीकारतात का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
चाळीसगावात खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नीचे नाव अचानक चर्चेत आले. यापूर्वी मंगेश जाधव यांचे नाव आघाडीवर असताना या नव्या चर्चेने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. रावेरमध्ये आमदार हरीभाऊ जावळे यांच्या नावाचे जाहीर समर्थन एकनाथराव खडसे यांनी करुन गिरीश महाजन यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. अनिल चौधरी हे गेल्या वर्षभरापासून रावेर मतदारसंघात प्रयत्नशील आहेत. ते महाजन यांचे निकटचे सहकारी आहेत. त्यामुळे जावळे की चौधरी हा निर्णय महाजन यांना घ्यायचा आहे. जळगावात सुरेश भोळे यांच्यासोबत ललित कोल्हे, कैलास सोनवणे हे इच्छुक आहेत. महाजन यांचा आशीर्वाद कोणाला लाभतो, यावर गणित ठरणार आहे.
भाजपमध्ये उत्तर महाराष्टÑासाठी गिरीश महाजन यांचा शब्द आता अंतिम राहणार आहे. त्यामुळे भाऊंचा हात ज्याच्या डोक्यावर राहील, तो निवडून येईल, हे समीकरण पक्के मानले जात आहे. महाजन यांच्यापुढे पहिले काम असेल ते जागावाटपाचे. शिवसेनेला कोणत्या जागा सोडायच्या याचा निर्णय घेऊन तो पक्षश्रेष्ठींमार्फत सेनेकडे पोहोचता करावा लागणार आहे. प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाली असली तरी महाजन यांच्या मताला किंमत राहणार आहेच.

 

Web Title: Increasing number of aspirants in BJP's headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.