ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतली रुग्णांची भेटजामनेर मुख्याधिकाऱ्यांना दिले स्वच्छता मोहिम राबविण्याचे आदेशआरोग्य अधिकाऱ्यांनी केली जामनेर शहराची पाहणी

आॅनलाईन लोकमत
जामनेर, दि.३ - शहरातील गिरणा कॉलनी, हिवरखेडा रोड, शंकर नगर भागात मलेरिया व डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. तसेच नगरपालिकेला स्वच्छता मोहिम राबविण्याचे आदेश दिले.
नवीन वसाहतीत मोकळ्या जागेवर झाडे व झुडपे वाढली आहेत. नगरपालिकेने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शुक्रवारी सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी ही बाब मोबाईलवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना सांगितली. त्यांनी कार्यकर्त्यांसह खाजगी रुग्णालयात जावून उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.
गिरीश महाजन यांनी मुख्याधिकारी यांना तत्काळ स्वच्छता मोहिम राबवून फवारणी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी बी.सी.बाविस्कर यांनी या भागात पाहणी केली. नगरपालिकेने आरोग्य कर्मचाऱ्यांना तत्काळ कामाला लावत शहरात फवारणी सुरु केली. गेल्या महिन्यात शहरात स्वाईन फ्ल्यू व डेंग्यूची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. यात एका गर्भवती महिलेचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला होता.

या रुग्णांवर उपचार सुरु
खाजगी रुग्णालयात सुमती अनंत महाजन, मंगला प्रल्हाद सोनवणे, गिरीश सुनिल देवरे, प्रल्हाद वामन महाजन, अलका भोई, अमोल चव्हाण, शुभम गायकवाड, अथर्व नाईक, ज्ञानेश्वर पाटील, नीलेश नेथे, हार्दिक नेवे, भागवत पाटील, नरेंद्र इंगळे, रमेश इंगळे, किरण पाटील, मनिष महाजन, जान्हवी महाजन उपचार घेत आहेत.