या कारणामुळे घडले भादली हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:20 PM2018-05-19T14:20:37+5:302018-05-19T14:20:37+5:30

जळगाव तालुक्यातील भादली बु.।। येथील हत्याकांडातील मयत प्रदीप सुरेश भोळे याचे रमेश बाबुराव भोळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, त्यातून भोळे कुटुंबाचे हत्याकांड झाले असल्याची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे व सरकारी वकील आशा शर्मा यांनी शुक्रवारी न्यायालयात दिली.

This happened due to Bhadli massacre | या कारणामुळे घडले भादली हत्याकांड

या कारणामुळे घडले भादली हत्याकांड

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव जिल्हा न्यायालयात युक्तीवादअटकेतील दोन्ही संशयितांना पाच दिवस कोठडीभादली हत्याकांडाचे १४ महिन्यानंतर उलगडले गुढ

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१९ : तालुक्यातील भादली बु.।। येथील हत्याकांडातील मयत प्रदीप सुरेश भोळे याचे रमेश बाबुराव भोळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, त्यातून भोळे कुटुंबाचे हत्याकांड झाले असल्याची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे व सरकारी वकील आशा शर्मा यांनी शुक्रवारी न्यायालयात दिली. या माहितीने १४ महिन्यानंतर या हत्याकांडाचे रहस्य उलगडले आहे. दरम्यान, न्यायालयाने रमेश बाबुराव भोळे (वय ६३) व बाळू उर्फ प्रदीप भरत खडसे (वय ३३) या संशयितांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
या घटनेबाबत आर.टी.धारबळे यांनी न्यायालयात सांगितले की, मयत प्रदीप भोळे व रमेश बाबुराव भोळे हे शेजारीच राहायला होते. प्रदीप याचे रमेश याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. तो सतत रमेश यांच्याच घरी राहत होता. प्रदीप याचे रमेश याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे प्रदीपची पत्नी संगीता हिच्या बहिणीने चौकशीत सांगितले आहे, तसेच तिने कलम १६४ नुसार न्यायालयात जबाबही नोंदविला आहे. सरकारी वकील आशा शर्मा यांनीही असाच घटनाक्रम न्यायालयात सांगून पोलीस कोठडीची मागणी केली.
हत्याकांड ज्यावेळी झाले त्यावेळी प्रदीप, बाळू व रमेश या तिघांचे मोबाईल लोकेशन घटनास्थळाचेच असल्याचे धारबळे यांनी न्यायालयात सांगितले. प्रदीप याने तीन महिन्यापूर्वी दारु सोडली होती, मात्र हत्याकांडाच्या दिवशी रात्री दहा वाजेनंतर तो दारुच्या नशेत होता. व्हिसेरा अहवालातही दारुचा उल्लेख आहे. रमेश व प्रदीप या दोघांनाही रात्री दहा वाजेनंतर साक्षीदारांनी एकत्र पाहिले आहे. प्रदीप याला दारु पाजली, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
संशयितांनी अद्यापपर्यंत गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. प्राप्त पुराव्याच्या आधारावरच दोघांनी खून केल्याचे प्रथमदर्शीनी दिसून येत आहे. हा गुन्हा करताना संशयितांचा काय उद्देश होता याची सखोल चौकशी करणे बाकी आहे. यात आणखी कोणी साथीदार होते का?, हा गुन्हा करण्यासाठी आणखी कोणी मदत केली होती का?, गुन्ह्यात कोणते हत्यार वापरले याची चौकशी करावयाची असल्याने पोलिसांनी दहा दिवसाची पोलीस कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने पाच दिवस कोठडी दिली.
अनैतिक संबंध असलेली महिला नात्याने काकू
प्रदीप भोळे याचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते, ती रमेशची पत्नीही प्रदीप याची नात्याने काकू होती, त्यामुळे हे देखील अनेकांना खटकत होते असे देखील पोलीस तपासात उघड झाले आहे.
तांत्रिक पुरावे, जबाबाच्या आधारावर अटक
ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राम चाचणीत अनेक बाबींचा उलगडा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.आजच्या स्थितीत हे दोन्ही जण संशयितच आहेत. भोळे कुटुंबाची हत्या करताना पाहणारे, प्रत्यक्षदर्शी पुरावा पोलिसांकडे अजूनही नाही. तांत्रिक पुरावे, चौकशीतील जबाब या मुद्याच्याच आधारावर दोघांना अटक करण्यात आली आहे.
संशयित म्हणाला, मी गुन्हा केला नाही
रमेश भोळे व बाळू या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या.निलिमा पाटील यांनी दोघांना नावे विचारली. त्यानंतर तुम्हाला काही सांगायचे आहे का? अशी विचारणा केली असता रमेश भोळे याने मी गुन्हा केलेला नाही इतकेच सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दोघांना बाहेर काढले.

Web Title: This happened due to Bhadli massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.