Handa Morcha of women in the water resources minister's village | जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात महिलांचा हंडा मोर्चा

ठळक मुद्देदोन ठिकाणची पाणी योजना तरी गाव तहानलेलेचसंतप्त महिलांनी सरपंचांना बोलविले कार्यालयातजलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गाव तीन वर्षांपासून तहानलेले

आॅनलाईन लोकमत
नेरी, ता.जामनेर, दि.२ : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील नेरी गावातील नागरिक तब्बल तीन वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारी महिलांच्या संयमाचा बांध सुटला आणि संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. याठिकाणी उत्तर देण्यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
गेल्या अनेक दिवसांपासून नेरी गावात तीव्र पाणी टंचाई भासत आहे. महिन्याभरात केवळ दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्या कल्पना कुमावत यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी गावातून हंडा मोर्चा काढत थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी पुलकेशी केदार, सरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित नसल्याने मोर्चेकरी महिलांच्या संतापात भर पडली. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला थेट कुलूप ठोकले. संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप कायम होते.

जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गाव
सुमारे १० हजार लोकसंख्या असलेले नेरी हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील गाव आहे. १३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत भाजपाचे १२ सदस्य तर एकमेव राष्ट्रवादीच्या महिला सदस्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या पॅनलचे ग्रामपंचायतीत बहुमत आहे. मात्र तरीदेखील गेल्या तीन वर्षांपासून या गावातील नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.

सरपंचांना बोलविले कार्यालयात
ग्रामपंचायत कार्यालयात मोर्चेकरी महिला दाखल झाल्याची माहिती पदाधिकाºयांना फोनवर देण्यात आली. तेव्हा सरपंच याचे पती रवींद्र पाचपोळ व उपसरपंच यांचे पती जितेंद्र पाटील यांनी संतप्त महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सरपंच व उपसरपंच यांना कार्यालयात बोलवा असा पवित्रा या महिलांनी घेतल्याने अखेर प्रभारी सरपंच उज्वला पाटील या कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून चाबी सोबत ठेवून घेतली.

दोन ठिकाणची पाणी योजना तरी गाव तहानलेले
गावासाठी वाघुर धरण व चिंचखेडा शिवारातील एका खाजगी शेतातील विहिरीतून पाणी योजना सुरु आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी गावकरी तहानलेलेच आहे. वाघुर धरणातील आठ गाव पाणी पुरवठा योजना ही वीज बिलामुळे अडचणीत आली आहे. चिंचखेडा शिवारातून एका खाजगी शेतातील विहिरीतून पर्यायी पाणी योजना चालू आहे. मात्र ती देखील वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरत आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. मात्र वापरण्यासाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो.

 खाजगी शेतातील विहिरीतून होणाºया पाणी पुरवठ्याला वारंवार तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतो. मात्र याबाबत लवकर कारवाई होवून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.
उज्वला पाटील, प्रभारी सरपंच, नेरी.