गहाणवटीचा ऐवज डोके : बसंती, उस कुत्ते के सामने मत नाचना बसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:33 PM2018-05-21T22:33:10+5:302018-05-21T22:33:10+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रा.अनिल सोनार.

The greedy lover's head: Basanti, do not dance in front of that dog! | गहाणवटीचा ऐवज डोके : बसंती, उस कुत्ते के सामने मत नाचना बसंती !

गहाणवटीचा ऐवज डोके : बसंती, उस कुत्ते के सामने मत नाचना बसंती !

Next

ज्याने ‘शोले’ चित्रपट पाहिलेला नाही, असा माणूस भारतवर्षाच्या इतिहासात, वर्तमानात आणि भूगोलावर शोधूनही सापडणार नाही. एकवेळ रामायण, महाभारत, बायबल, कुराण इत्यादी ग्रंथ माहीत नसलेली व्यक्ती सापडेल, पण ‘शोले’ न पाहिलेली व्यक्ती सापडणे म्हणजे ‘गुल बकावलीचं फूल’ सापडण्यासारखं आहे. (आता, गुलबकावली म्हणजे काय? असा प्रश्न जर, आजीच्या तोंडून गोष्टी न ऐकताच लहानाचा मोठे झालेल्या मानवाने मला विचारला, तर मला, आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली, मी त्याच्यावर खटला भरीन.)
चाळीस, पंचेचाळीस वर्षे होत आलीत तरी लोक न थकता शोले बघताय आणि त्याच्याबद्दल न थकता बोलताय अशी ‘शोले’ ही देदीप्यमान, अजरामर कलाकृती. ती बघा २०-२५ झोपड्या आणि एक ठाकूरची गढी, उर्फ दुमजली वाडा असलेली रामगढ नावाची वस्ती. नायकाला दारू पिऊन वर चढून आत्महत्येचं नाटक करता येण्यासाठी उभारलेली उंचावरची पाण्याची टाकी. तिच्या साक्षीने समोरच्याच विहिरीवरून, मातीच्या घागरींमधून, पाणी भरून नेणाऱ्या स्त्रिया. ‘मातीच्या’ घागरीतूनच अशासाठी, की जर घोड्यावरून खदडक खदडक करत डाकू आलेत, तर त्यांना एखाद्या गोरीच्या डोक्यावरील घड्याला नेम धरून गोळी मारता यायला हवी. घड्याला छानसं कलात्मक गोल भोक पडून, त्यातून पाण्याची धार लागणार. डाकूंना उगीचच गोळ्या खर्ची घालाव्या लागू नयेत म्हणून पनघटवरच्या उरलेल्या पनीहारीनी डोक्यावरच्या मातीच्या घागरी स्वत:च किंचाळत फोडून टाकत सैरावैरा पळणार. हजार घरांच्या वस्तीला पुरून उरेल एवढी मोठी पाण्याची टाकी उशाशी असताना, २०-२५ झोपड्या असलेल्या रामगढवासी स्त्रिया विहिरीवरून पाणी का भरतात? काय करणार बिच्चाºया, त्या पाण्याच्या टाकीला नळच जोडलेले नाहीत. बरं, नळ असते तरी काय उपयोग, पाणी खालून वर टाकीत चढवायला विजेची मोटार नको का? पण गावात वीजच नाही. वीज असती तर सगळ्यात आधी श्रीमंत ‘ठाकूर की हवेली’ उजळून निघाली नसती का? पण गावातच वीज नाही म्हणून हवेलीतही वीज नाही. वीज असती तर ठाकूरची वीजवंचित विधवा सून बिचारी उगाचंच संध्याकाळी गॅसबत्तीची ज्योत मोठी करून पेटवण्याच्या आणि सकाळ झाली, की ज्योत लहान करत विझवण्याच्या कामावर नेमल्यासारखी दिसली असती का? ‘गब्बरसिंग’ हा वेडसर दाखवला आहे. ते योग्यच आहे. गावात वीज नाही, चक्की नाही, आणि हे बाळ विचारतं, ‘ये रामगढ वाले कौनसी चक्कीका पिसा आटा खाते है रे’. वेडा कुठला! वेडा नाही तर काय, ज्या घरात विधवा सून आणि तिचा म्हातारा सासरा, असे फक्त दोनच व्यक्ती आहेत. अशा घरातल्या सासºयाचे दोन्ही हात छाटून टाकायचे, म्हणजे सगळीच कल्पनातीत पंचाईत की! नाही म्हणायला एक उत्तम केले आहे. विरू आणि बसंती ह्यांचे प्रेम तडीस जाऊ दिले आहे. पण ठाकूराच्या विधवेचं प्रेम काही सफल होऊ दिलेलं नाही. तिथे जय ह्या नायकाचा मृत्यू अचूकपणे मदतीला धाऊन आलाय. कल्पना करा ना राव, खानदानी ठाकूरच्या घरातील ‘विधवेचा पुनर्विवाह’ दाखवला असता, तर समस्त भारतातील ठाकूरांनी ‘शोले’लाच आग लावून नसती का टाकली. गहाणवटीतली डोकीसुद्धा जपावी लागतात राव ! (अपूर्ण)

Web Title: The greedy lover's head: Basanti, do not dance in front of that dog!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.