लोकसभा निवडणुकीमुळे वायदे बाजाराची चलती : सरकारचे नियंत्रण नसल्याने महागाईच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:21 PM2019-05-19T12:21:47+5:302019-05-19T12:25:07+5:30

धान्यासह डाळी, खाद्य तेलाचे चढते भाव

Futures market move due to Lok Sabha elections: inflation is soaring due to lack of control of government | लोकसभा निवडणुकीमुळे वायदे बाजाराची चलती : सरकारचे नियंत्रण नसल्याने महागाईच्या तीव्र झळा

लोकसभा निवडणुकीमुळे वायदे बाजाराची चलती : सरकारचे नियंत्रण नसल्याने महागाईच्या तीव्र झळा

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीमुळे सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून वायदे बाजाराची चलती आहे. त्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहे. दीड महिन्यात गव्हाचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने तर डाळींचे भाव तब्बल १२०० ते १३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत. या सोबतच शेंगदाणा तेलाचे भावदेखील ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढल्याने गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले आहे.
१० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशभरात वेगवेगळ््या टप्प्यात विविध राज्यांमध्ये मतदान सुरू झाले. यात आता शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होत असून या निवडणुकीच्या धामधुमीत सरकारचे बाजारपेठेवरील नियंत्रण कमी झाल्याने त्याचा पुरेपूर फायदा वायदे बाजारातील मंडळी घेऊ लागले. त्यामुळेच दीड महिन्यातील महागाईचा आकडा पाहिला तर धान्याची चांगली आवक असली तरी त्यांचे भाव वाढू लागले.
पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न तर प्रशासन तयारीत व्यस्त
अनेक ग्राहक आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवण्यासाठी साधारण मार्च महिन्यापासून धान्याची खरेदी करतात. त्यानुसार मार्च महिन्यापासून गव्हाला मागणी वाढली. असे असली आवक चांगली असल्याने गव्हाचे भाव एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत स्थिर राहिले. मात्र या काळात सत्ताधारी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीत कंबर कसून उतरल्याने बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे प्रशासनदेखील निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने बाजारपेठेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने दलाल मंडळींचे यात चांगले फावले व त्याचा फायदा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न या मंडळींकडून सुरू झाला. त्याचाच प्रत्यय म्हणून धान्याचे भाव यंदा चांगलेत कडाडले.
आवक असली तरी भाववाढ
मागणी वाढली तरी सुरुवातीला भाववाढ न झालेल्या गव्हाच्या भावात ३ एप्रिलपासून वाढ सुरू झाली. त्यानुसार या दिवशी गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली. त्यानंतर ही वाढ अशीच सुरू राहून दीड महिन्यांपूर्वी २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव सध्या २३५० ते २४५० रुपयांवर पोहचले आहे. लोकवन गव्हाचे भावदेखील २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटलवरून २२५० ते २३०० रुपयावर पोहचले आहे तर शरबती गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवरून २४०० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवर गेले आहे. चंदोसीचे भाव ३६०० ते ३७०० रुपयांवरून ३८०० ते४०००रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. विशेष म्हणजे आवक असली तरीही भाववाढ होत आहे.
डाळींमध्ये अवाक् करणारी भाववाढ
आधीच उत्पादन कमी असल्याने भाववाढ होत जाणाºया डाळींच्या भाववाढीत भर घातली ती वायदे बाजाराने. बाजारातील मोठ्या उलाढालीने डाळींचे भाव तब्बल १२०० ते १३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत. यामध्ये दीड महिन्यांपूर्वी ६८०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ सध्या ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ८०० ते १००० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ५२०० ते ५५०० रुपयांवरून ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. ५३०० ते ५६०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव सध्या ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. तर तूरडाळदेखील ७३०० ते ७५०० रुपये प्रती क्विंटलवरून ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे.
तांदुळाचेही भाव वाढले
हिवाळ््यापासून स्थिर असलेल्या तांदळाच्या भावातही या काळात वाढ सुरू होऊन तेदेखील २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले. यात चिनोर ३३०० ते ३७०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४३०० ते ४६०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४९०० ते ५२०० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २८०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती तांदुळाचे भाव ९१०० ते १ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचेले आहेत.
खाद्य तेलाला महागाईची फोडणी
गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या खाद्य तेलालादेखील वायदे बाजारामुळे महागाईची फोडणी बसली आहे. या मध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच शेंगदाणा तेलाच्या भावात ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली असून ती अद्यापही कायम आहे.

एक तर आवक कमी असल्याने धान्य, डाळींचे भाव वाढत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीमुळेही भर पडत आहे. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.

शेंगदाणा तेलाचे भाव १२४ रुपये प्रती किलोवरून १३० रुपये प्रती किलो झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तेलाचे भाव स्थिर होते. मात्र या महिन्यात ते वाढले आहेत.
- मनीष देपुरा, तेल विक्रेते.

Web Title: Futures market move due to Lok Sabha elections: inflation is soaring due to lack of control of government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव