कर्तृत्ववान महिलांचा जळगाव घडवण्यात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:03 PM2018-03-08T13:03:56+5:302018-03-08T13:03:56+5:30

fortified women's Jalgaon | कर्तृत्ववान महिलांचा जळगाव घडवण्यात सहभाग

कर्तृत्ववान महिलांचा जळगाव घडवण्यात सहभाग

googlenewsNext

प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा सहभाग असतो असे म्हटले जाते. जळगाव शहराचा विचार केल्यास या शहराला घडवण्यात स्त्रियांचा मोठा सहभाग आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या शहरातील महिलांनी अनेक शासकीय पदांवर आपले कर्तृत्व गाजवले आहे. आपले वेगळेपण उमटवले आहे. कालच्या ओघात अनेक नावे विस्मरणात गेली असली तरी विविध पदांवर राहिलेल्या पहिल्या महिला कोण हे जाणण्याचा हा धावता प्रयत्न. .
भारताचे घटनात्मक सर्वोच्चपद - राष्ट्रपतीपद भूषवणाºया श्रीमती प्रतिभा पाटील या देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या. एक महिला देशाचे सर्वोच्चपद भूषवू शकते हे या व्दारे दाखवून देतांना, देशातील तमाम महिला वर्गाला याचा अभिमान वाटला. जळगावकरांना प्रतिभाताई पाटील यांची राष्ट्रपतीपदी निवड होताच जळगाव शहराने दिवाळी साजरी केली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयास शंभर वर्ष झाली असली तरी पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून या पदावर बसण्यास १९९६ साल उजाडावे लागले. सुजाता सौनिक या जळगावच्या पहिल्या महिल्या जिल्हाधिकारी ठरल्या. त्यांचे दोन वर्षाच्या काळात लोकसभेच्या चुरशीच्या निवडणुका देखील पार पडल्या होत्या. आज मंत्रालयात त्या अर्थ विभागात सचिव पदावर कार्यरत आहेत. पोलीस अधीक्षक पदावर आजपर्यंत महिला विराजमान झालेली नाही. मात्र अप्पर पोलिस अधीक्षक पदावर १९९२ मध्ये रश्मी शुक्ला यांनी पदभार सांभाळला होता. त्यांना केवळ आठ महिन्याचा कालावधी मिळाला असला तरी त्यांनी गुंडांना भररस्त्यात झोडपून शहरात जरब बसवली होती. न्यायदानात आपला वेगळा ठसा उमटवणाºया रेखा सोंडूर -बलदोटा या पहिल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश ठरल्या. २००५ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर वर्षभरात मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली होती. राजकीय दबावासाठी माहिर असलेल्या जिल्हा परिषदेत पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून १९९२ मध्ये वंदना खुल्लर यांनी कार्यभार स्वीकारला. केवळ दहा महिनेच त्यांच्या वाट्याला आले असले तरी त्यांनी आपल्या कार्याने एक वेगळी छाप उमटवली होती.
शासकीय पदाबरोबरच अन्य क्षेत्रात देखील जळगावच्या महिलांनी आपली कर्तृत्वाची छाप उमटवली होती. १९२८ मध्ये मुंबईला झालेल्या मराठी नाटयसंमेलनाचे अध्यक्षपद भुषवणाºया गिरीजाबाई महादेव केळकर या जळगावच्या. माहेरच्या द्रौपदी बर्वे. १९०१मध्ये विवाहानंतर केळकर कुटुंबियांनी त्यांना लेखनास प्रोत्साहीत केले. लेखिका आणि उत्तम वक्त्या म्हणून नावलौकीक मिळवला. संसारी स्त्रियांना मार्गदर्शन व बोधपर विपूल लेखन त्यांनी केले. संस्कारशील मध्यमवर्गीयांचे प्रातिनिधीक ठरू शकेल असे लेखन त्यांनी केले. कथा कादंबºया नाटके विविध मासिकातून स्फूट लेखन करणाºया गिरीजाबाई केळकर या जळगावातील पहिल्या महिला साहित्यिक ठरल्या.
जळगाव शहरातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून अत्यंत शांत मृदू स्वभावाच्या यमुनाबाई लागू यांचे नाव समोर येते तर पहिल्या महिला वकील म्हणून कोर्टात प्रत्यक्ष प्रॅक्टीस करणाºया पुष्पा पिले या आहेत. शिक्षणक्षेत्राचा विचार करता महिला प्राध्यापक म्हणून मु.जे महाविद्यालयात इंग्रजी शिकवणाºया नलिनी तारळेकर (सन १९४९) या ठरल्या आहेत. क्रीडाक्षेत्रात महिलांमध्ये बॅडमिंटनपटू म्हणून डॉ. सुमनताई आठवले यांनी राज्यात नाव कमावले होते. सांस्कृतिक क्षेत्राचा विचार करता गायनात कुमुदिनी रावेरकर यांचे नाव घेतले जाते तर नाटयक्षेत्रात कला काणे, आशाताई पेंडसे असल्याचे जाणकार सांगतात. पत्रकारितेत देखील महिला मागे नव्हत्या. जळगावच्या पहिला महिला पत्रकार म्हणून कमलाबाई चौगुले यांचे नाव होते.पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून विचार करता कमलाबाई जोशी यांचे नाव समोर आले तर महापौर म्हणून आशाताई कोल्हे या ठरल्या. समाजसेवेचा विचार करता काँग्रेसचे गांधीवादी नेते अत्रे गुरूजी यांच्या पत्नी सुशिलाबाई अत्रे या शिवाजीनगरात वंचित वर्गासाठी कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. त्या काळात या महिलांनी आपापल्या परीने कार्य केले.
(उपलब्ध व जाणकारांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे हे लेखांकन करण्यात आले आहे.)
-विजय पाठक

Web Title: fortified women's Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.