जळगाव जिल्ह्यात दररोज 20 टन वांग्याचे भरीत फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:19 PM2017-10-27T12:19:15+5:302017-10-27T15:26:56+5:30

थंडी वाढल्याने मागणी वाढली : खान्देशी वांग्यांची विदेश वारी

Everyday 20 tons of earthen pots are available in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात दररोज 20 टन वांग्याचे भरीत फस्त

जळगाव जिल्ह्यात दररोज 20 टन वांग्याचे भरीत फस्त

Next
ठळक मुद्देतजेलदार वांग्यांना मागणीभरीत केंद्रांवर अधिक मागणीवांग्यांची आवक वाढली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 - गुलाबी थंडी जाणवू लागताच भरीताच्या वांग्यांनाही मागणी वाढू लागली असून तयार भरीताची विक्री वाढली आहे. जळगावातून दररोज सुमारे 20 टन भरीताच्या वांग्यांची विक्री होत असून जिल्ह्यासह राज्यभरात येथून वांगे तसेच तयार भरीत पाठविले जात आहे. इतकेच नव्हे येथील प्रसिद्ध वांगे अमेरिकासह इतर देशातही नातेवाईकांकडे पाठविण्यात येत आहेत.
 
जळगाव जिल्ह्यातील केळीसह भरीताचे वांगेही मोठे प्रसिद्ध आहेत.  त्यात हिवाळ्य़ामध्ये जास्त मागणी असते ती भरीताच्या वांग्यांना. जळगाव जिल्ह्यातील वातावरण व येथील जमीन या वांग्यांसाठी पोषक असल्याने त्यांची जी विशिष्ट चव आहे, ती इतरत्र कोठेही मिळत नाही. त्यामुळे या वांग्यांना जास्त मागणी असते व ते येथेच मोठय़ा प्रमाणात पिकविले जातात. 
गेल्या काही  वर्षापासून  पावसाळ्य़ामध्येच भरीताचे वांगे बाजारात येऊ लागले आहेत. मात्र त्यांची खास चव लागते ती हिवाळ्य़ामध्ये. त्यामुळे थंडी वाढू लागली की या वांग्यांचीही मागणी वाढते.  

वांग्यांची आवक वाढली
जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील बामणोद, भालोद, पाडळसे, जळगाव तालुक्यातील असोदा, भादली तसेच  वरणगाव, बोदवड तसेच रावेर तालुक्यांमध्ये भरीताच्या वांग्यांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या जळगाव बाजार समितीमध्ये या वांग्यांची आवक वाढली असून दररोज 20 टन वांग्यांची विक्री होत आहे. 

भरीत केंद्रांवर अधिक मागणी
घरगुती भरीत करण्यासाठी तसेच हॉटेल चालकांकडून या वाग्यांची खरेदी होते. त्यात आता काही वर्षांपासून खास भरीत सेंटरही सुरू झाल्याने तेथे मोठय़ा प्रमाणात वांग्यांना मागणी असते. जळगाव शहरात 15च्यावर भरीत सेंटर असून त्यातील तीन ते चार सेंटरवर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे या भरीत सेंटरवरच जास्त वांग्यांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या घरी भरीत करण्यासह तयार भरीताला पसंती दिली जात असल्याने त्याची विक्री वाढली आहे. 

भरीत पाटर्य़ाचे आयोजन
जळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात भरीत पाटर्य़ा मोठय़ा प्रमाणात केल्या जातात. त्यास आता हळूहळू सुरुवात होणार असून सुटय़ांमुळे सध्या घरी आलेल्या पाहुणे मंडळींना भरीताचा पाहुणचार केला जात आहे. या सोबतच लग्न असो अथवा कोणताही समारंभ तेथे जेवणामध्ये इतर पदार्थांसह भरीताचा मेनू हमखास असतोच. 
तजेलदार वांग्यांना मागणी
वांगे भाजल्यानंतर त्यामधून जास्त तेल सुटेल अशा वांग्यांना अधिक मागणी असते. यासाठी जळगाव जिल्ह्यातील बामणोद, असोदा, भादली या भागातील वांगे अधिक प्रसिद्ध आहे. असोदा येथे तर पिढय़ां-पिढय़ांपासून भरीताच्या वांग्यांची शेती केली जात आहे.

विदेशवारी
जळगाव जिल्ह्यातील अनेक मंडळी अमेरिका तसेच इतर देशांमध्ये वास्तव्यास आहे. ही मंडळी हिवाळ्य़ामध्ये येथे आली अथवा येथील नातेवाईक त्यांच्याकडे गेले तर सोबत हमखास वांगे अथवा भरीत घेऊन जात असतात. या सोबतच दररोज जळगावातून पुणे, मुंबईला स्थायिक झालेल्या नातेवाईकांकडे ट्रॅव्हल्सद्वारे वांगे  पाठविले जातात. 

भौगोलिक मानांकन
भरीताचे वांगे दोन रुपये प्रति किलोर्पयत घसरतात. त्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसतो. यासाठी या वांग्यांना रास्त भाव मिळावा म्हणून जळगाव तालुक्यातील असोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाच्या वतीने यासाठी प्रयत्न केले जात असून या मंडळाने या वांग्यांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळविले आहे. यामुळे 150 देशांमध्ये वांग्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार असून त्यास भाव मिळण्यासही मदत होऊ शकेल. 

अवकाळी पावसामुळे भाव तेजीत
यंदा गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने त्यामुळे उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाव वाढून होलसेलचे भाव 20 रुपये प्रति किलो आहे. एरव्ही हे भाव 10 ते 15 रुपये असतात. 

सध्या भरीताच्या वांग्यांची मागणी वाढली असून दररोज 20 टन भरीताच्या वांग्यांची विक्री होत आहे. अवकाळी पावसामुळे यंदा भाव वाढले आहे. 
- निर्मला चौधरी, फळ, भाजीपाला विक्रेत्या.

जळगाव जिल्ह्यातील पूरक वातावरणामुळे येथील वांग्यांना विशिष्ट चव असते. सध्या त्यांची आवक वाढली आहे. 
- किशोर चौधरी, वांगे उत्पादक, असोदा

Web Title: Everyday 20 tons of earthen pots are available in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.