मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 08:38 PM2018-07-19T20:38:36+5:302018-07-19T20:43:45+5:30

स्थापनेनंतर प्रथमच होणाऱ्या मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवार दि.२० जुलै रोजी जाहीर होणार असून नगराध्यक्षपदासह ७३ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगरातील या पहिल्या वहिल्या निवडणुकीने जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष वेधून घेतले आहे.

 Election results of Muktainagar Nagar Panchayat elections today | मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल

मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल

googlenewsNext
ठळक मुद्देमतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्णनेत्यांची प्रतिष्ठा लागली पणालाअवघ्या पंधरा मिनिटात येणार पहिला निकाल

लोकमत आॅनलाईन
मुक्ताईनगर, दि.१९ : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, दि.२० रोजी शुक्रवारी होत असून यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून ७३ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, पहिल्या पंधरा मिनिटातच वॉर्ड क्रमांक १, २, आणि ३ चे निकाल जाहीर होण्याची शक्यता असून दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील असा अंदाज आहे.
स्थापनेनंतर प्रथमच मुक्ताईनगर नगरपंचायतसाठी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना व राष्ट्रवादी मिळून तिरंगी लढत झाली. अपक्षांनी देखील विविध प्रभागातून आपले प्राबल्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षातर्फे माधुरी आत्माराम जाधव, भाजपातर्फे नजमा इरफान तडवी आणि शिवसेना -राष्ट्रवादी आघाडीच्या ज्योत्स्ना तायडे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. एकूण १७ प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
१५ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी होत असून निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
प्रशासनाची तयारी पूर्ण
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे . तहसिल कार्यालयातील सभागृहामध्ये ही मतमोजणी होेणार आहे . त्यासाठी सहा टेबल लावण्यात आलेले असून प्रत्येक टेबलवर ५ मशीन याप्रमाणे मतमोजणी करण्यात येणार आहे. एका टेबलवर दोन कर्मचारी ज्यात एक सहाय्यक मतमोजणी अधिकारी व एक पर्यवेक्षक याप्रमाणे ६ टेबल वर १२ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महसूल व पोलिस प्रशासनाचे एकूण तिनशे कर्मचारी मतमोजणी दरम्यान संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ आढाव यांनी दिली . मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात करण्यात येणार आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मुक्ताईनगर नगरपंचायतची निवडणूक केवळ तालुका जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी चर्चेचा विषय बनलेली आहे. कारण मुक्ताईनगर मतदारसंघ राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाने ओळखला जात असल्याने या निवडणुकीचा निकाल काय लागतो ? याकडे संपूर्ण राज्याचे व विशेषत: खडसे समर्थक व विरोधक या दोन्ही गटातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे अतिशय तंत्रशुद्ध असा प्रचार निवडणुकीच्या दरम्यान करण्यात आला. केवळ तालुक्यातील पदाधिकारीच नव्हे तर भुसावळ, बोदवड सावदा, रावेर व मलकापूर या तालुक्यातून विविध जाती धर्माचे भाजपा कार्यकर्ते , नगरसेवक, नेते व आमदार यांना देखील आमंत्रित करण्यात आलेले होते.
तसेच मतदानाच्या दिवशी प्रत्येक प्रभागात किमान दोन बाहेरील नगरसेवकांची नियुक्ती करून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत चुरस वाढवलेली होती. त्यामुळे ही निवडणूक एकनाथराव खडसे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे. खडसे यांनी मुक्ताईनगर शहराचा प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष हा भाजपाचाच असेल तसेच १७ पैकी १७ जागांवर भाजपा विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, शिवसेनेतर्फे जिल्हा शिवसेना प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी एक हाती किल्ला लढवला आहे. मुक्ताईनगरच्या प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची असलेली फळी, मजबूत संघटन व मतदान काढण्याची खुबी यामुळे शिवसेनेने या निवडणुकीत चुरस निर्माण केलेली आहे . शिवसेनेने १२ जागांवर प्रभागातून उमेदवार दिलेले होते तर दोन प्रभागातून अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले होते. तसेच सेनेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी असल्याने तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेल्या होत्या . शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची आघाडी या निवडणुकीत कितपत फायदेशीर ठरते हे आज स्पष्ट होणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
काँग्रेस पक्षाने निर्माण केली चुरस
कधी नव्हे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत नगराध्यक्षांसह सात प्रभागातून उमेदवार दिल्याने निवडणुकीत दुरंगी ऐवजी तिरंगी लढत मुक्ताईनगरवासियांना अनुभवायला मिळाली. तिरंगी लढत असल्यामुळे मते विभागली जाणे हे सहाजिकच आहे. मात्र काँग्रेस पक्षाला मिळालेली मते कोणाची? यावर सर्वच राजकीय पक्षांचे म्हणजे भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. हे मात्र नक्की.
कधी नव्हे ते काँग्रेस पक्षाने या वेळी अतिशय सूत्रबद्ध असे प्रचाराचे नियोजन करत शहरातील सर्वच्या सर्व प्रभागातून रॅली काढत आपला ठसा व काँग्रेस पक्षाचे अस्तित्व शहरात दाखवून दिलेले आहे. जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील यांनी तर काँग्रेसचाच नगराध्यक्ष विजय मिळवेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे . त्यामुळे निवडणुकीचे नेमके काय निकाल लागतात यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.


 

Web Title:  Election results of Muktainagar Nagar Panchayat elections today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.