२४ रोजी नगराध्यक्ष निवड
२४ रोजी नगराध्यक्ष निवड

नंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व तळोदा नगराध्यक्ष निवडीसाठी २४ जून रोजी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. २0 पासून अर्ज दाखल करता येणार आहे. दरम्यान, तिन्ही ठिकाणी काँग्रेसची सत्ता असल्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता आहे.
तिन्ही नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २५ जून रोजी संपत असल्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी २४ जून रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी २0 जूनपासून नामांकनपत्र दाखल करता येणार आहेत. आवश्यकता वाटल्यास २४ जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून राहणार आहेत.
नंदुरबार पालिकेत काँग्रेसची एकतर्फी सत्ता आहे. ३७ पैकी ३६ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. त्यामुळे आमदार चंद्रकांत रघुवंशी जो उमेदवार देतील त्यांचीच नगराध्यक्षपदी निवड होणार आहे. नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असल्याने विद्यमान नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी याच कायम राहण्याची शक्यता आहे.
तळोदा पालिकेतदेखील काँग्रेसची सत्ता आहे. या ठिकाणीही सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव आहे. तळोद्यात दोन जण इच्छुक आहेत. त्यात विद्यमान नगराध्यक्षा रत्ना चौधरी व सकिराबी सैयद यांचे नाव चर्चेत आहे. अंतिम क्षणी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे लक्ष लागून आहे.
नवापूर पालिकेतदेखील काँग्रेसची सत्ता आहे. १८ पैकी १३ काँग्रेसचे व एक अपक्ष असे एकूण १४सदस्य काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे या ठिकाणीही एकतर्फीच निवड होण्याची शक्यता आहे. येथेही नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यासाठी चार जण इच्छुक आहेत. त्यात विद्यमान उपनगराध्यक्षा ज्योती दीपक जयस्वाल, रशिदा शेख आरिफ, मेघा हेमंत जाधव व रेणुका विनय गावीत यांचा समावेश आहे. यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागून आहे


Web Title: Election of the city president on 24th
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.