एकनाथराव खडसे यांची एल्गार यात्रेची घोषणा तारक की मारक ठरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:59 PM2018-09-04T13:59:58+5:302018-09-04T14:00:57+5:30

खडसेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Eknathra Khadse's announcement of Elgar Yatra will be a war of terror? | एकनाथराव खडसे यांची एल्गार यात्रेची घोषणा तारक की मारक ठरणार?

एकनाथराव खडसे यांची एल्गार यात्रेची घोषणा तारक की मारक ठरणार?

Next
ठळक मुद्देमहाजन व तावडे यांची अनुपस्थिती बोलकी‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ असे धोरण

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून मन मोकळे केले किंवा वर्ष-दिड वर्षांपासून मनात सुरू असलेली खदखद बाहेर काढत आता एल्गार यात्रेची घोषणा केली. हा त्यांचा पक्षावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांना तारक ठरतो की मारक? याबाबत आता राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
खडसे यांचा वाढदिवस नेहमीच चर्चेचा ठरला आहे. जिल्ह्यात कोणत्याच नेत्याचा साजरा होत नाही असा वाढदिवस त्यांचा साजरा होतो. दोन वर्षांपासून तर काहीशी वाढच झाली असल्याचे लक्षात येते.
आरोप अन् त्याला सडेतोड उत्तर
पुणे येथील भोसरी प्रकरणानंतर खडसेंना राजीनामा द्यावा लागला. या बाबतचे आरोप सुरू असतानाच अन्य काही आरोप त्यांच्यावर झाले. एका पाठोपाठ एक आरोप होत राहीले तरी खडसे डगमगले नाहीत. त्यांनी या स्थितीवर मात करत ‘अभिमन्यूची’ भूमिका बजावत सर्व आरोपांना सडेतोड उत्तरे दिली. ही त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल. जे आरोप झाले त्यातून बऱ्याच बाबतीत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. मात्र त्यानंतर जी पाऊले पक्षाकडून त्यांना अपेक्षित होती ती पडली नाहीत. त्याचा त्रागा खडसेंकडून होत आहे. विविध पातळ्यांवर त्यांनी केलेला त्रागा त्यांच्या कृतीतून उमटत गेल्याने अनेक जण त्यांच्यापासून दूर गेले आहेत. मग एकेकाळचे त्यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हाध्यक्ष उदय वाघ, सह संघटन मंत्री किशोर काळकर असे एक ना अनेक जण त्यांच्यापासून दूर गेले आहेत. हे प्रकार लक्षात घेऊन ते काहीसा सावध पवित्रा घेतील असे अनेकांना वाटत होते मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ते अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत. मग जिल्ह्यात काही कार्यक्रम असो वा विधासभेतील अधिवेशन काळ ते पक्ष धोरणाविरोधातच भूमिका व्यक्त करत आले असल्याचे लक्षात येत आहे.
महाजन, तावडे दूरच राहीले
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खडसे यांच्यातील वैर आता नवीन नाही. एकमेकांविरूद्ध बोलणे, टोमणे मारणे हे उघडपणे सुरू असते. मुक्ताईनगर येथील कार्यक्रम पत्रिकेवर गिरीश महाजन यांचे नाव होते मात्र त्यांनी तेथे टाणे टाळले. तसेच उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे हे वाढदिवस कार्यक्रम व अल्पसंख्यांकांसाठीच्या मुक्ताईनगर येथे झालेल्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यास आलेच नाहीत. महाजनांची अनुपस्थिती समजू शकते मात्र विनोद तावडे यांची अनुपस्थिती खटकणारी आहे.
पालकमंत्री आले पण...
मुक्ताईनगरला झालेल्या वाढदिवस सोहळ्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे अगत्याने आले. खडसेंसारखा नेता पक्षापासून दूर जाऊ नये अशी त्यांची या मागील भूमिका असल्याचे जाणकार सांगतात. मात्र व्यासपीठावरून खडसेंनी व्यक्त केलेल्या तीव्र भावना संवेदनशील चंद्रकांत पाटील यांनाही बोचतील अशाच होत्या.
‘एल्गार’ची भूमिका कितपत योग्य?
खडसे हे आता मंत्रीमंडळात जाण्यास फारसे उत्सुक नाहीत असे त्यांचे समर्थक सांगतात मात्र त्यांचे निर्दोषत्व जाहीरपणे मांडले जाणे, अधिवेशन काळात त्यावर भाष्य तेदेखील मुख्यमंत्र्यांकडून होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र नेमका हाच विषय टाळला जात आहे. त्यामुळे अनेक पातळ्यांवर त्रागा व्यक्त करूनही उपयोग न झाल्याने आता एल्गार यात्रेचे अस्त्र खडसेंनी उपसले आहे. याला कितपत पाठींबा देईल, हे येता काळच ठरवेल. खडसेंचे हे अस्त्र कितपत योग्य हे काळ ठरवणार असला तरी आगामी काळात विविध निवडणुका आहेत. त्यांची ही भूमिका त्रासदायकही ठरू शकते. आता त्यांच्या ‘एल्गार’वर पक्ष काय दखल घेतो, की नेहमी प्रमाणे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ असे धोरण समोर येते हे लवकरच समजेल.

Web Title: Eknathra Khadse's announcement of Elgar Yatra will be a war of terror?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.