झोपडपट्टीतील मुलांच्या कलाकृतीने शहरवासीय थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:51 PM2018-06-24T23:51:34+5:302018-06-24T23:53:58+5:30

चित्र व विविध वस्तूंचे प्रदर्शन

Dwelling residents of the slum children | झोपडपट्टीतील मुलांच्या कलाकृतीने शहरवासीय थक्क

झोपडपट्टीतील मुलांच्या कलाकृतीने शहरवासीय थक्क

googlenewsNext
ठळक मुद्दे‘आनंदघरा’तील कलाकुसरांनी अनोखा आनंदखेळात रमले चिमुकले

जळगाव : हसत खेळत गिरविले जाणारे अंक-अक्षरे, भाषीक खेळातून लागणारी वाचनाची गोडी अशा शैक्षणिक साहित्यासह टाकावू वस्तूंपासून तयार केलेल्या फुलदानी, मनमोहक खेळणे अशा एकाहून एक सरस वस्तू आणि आपल्या बाल विश्वातील कल्पना कुंचल्यातून मांडून साकारलेले चित्र प्रदर्शन ‘आनंदघरा’तील मुलांना अनोखा आनंद तर देऊनच गेले सोबतच या प्रदर्शनाने शहरवासीयांची रविवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली.
निमित्त होते वर्धिष्णू सोशल रिसर्च डेव्हलपमेंट सोसायटीमार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘आनंदघरा’तील मुलांनी साकारलेल्या चित्र व विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे.
शहरातील झोपडपट्टी भागातील अनेक कुटुंबातील मुलांनी आर्थिक परिस्थिती व कुटुंबात शिक्षणाचा अभाव असल्याने शाळेकडे पाठ फिरवली आहे. कचरा वेचणे तसेच बाल मजुरी करणा-या या मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी अद्वैत दंडवते यांच्या पुढाकाराने वर्धिष्णू सोशल रिसर्च डेव्हलपमेंट सोसायटीमार्फत काम केले जात आहे. यासाठी सोसायटीच्यावतीने ‘आनंदघर’ उपक्रम राबविला जाऊन येथे शिक्षणासह त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जाते.
याच ‘आनंदघरा’ला पाच वर्षे होत असल्याने त्यानिमित्त आनंदघरातील मुलांनीच तयार केलेल्या विविध वस्तू व चित्रांचे प्रदर्शन व स्नेह मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
खेळात रमले चिमुकले
सकाळी झालेल्या स्नेहमेळाव्यात मुलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. तसेच गाणी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मुले भारावून गेले. सोबतच विविध उपक्रम घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
टाकावूपासून शोभिवंत वस्तू
संध्याकाळी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित प्रदर्शनात ६ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात टाकावू वस्तूंपासून तयार केलेल्या शोभिवंत वस्तू मांडण्यात आल्या होत्या. आईस्क्रीम असो की कुल्फी ते खाल्यानंतर आपण त्याच्या काड्या फेकून देतो. मात्र त्याच काड्यांपासून या मुलांनी तयार केलेले मंदिर, बाहुल्या आकर्षण ठरल्या. त्यासाठी लग्न पत्रिकांचाही खुबीने वापर करीत घरात शोकेसमध्ये ठेवण्यासाठी उपयोग होण्याबाबत कौतूक करण्यात आले.
या सोबतच रंगबिरंगी कागदांपासून तयार विविध आकारातील फुलदाणी, भेट कार्ड (ग्रिटींग), पक्षी, छोट्या-छोट्या गाड्या लक्ष वेधून घेत होत्या.
खेळातून करा गणिते
‘खेळातून शिक्षण’ या अनोख्या साहित्यातून मुलांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसा करता येऊ शकतो हे दाखवून दिले. या सोबतच नावावरुन प्राणी ओळखणे व त्यातून अक्षर ओळख, शब्द वाचन करणे कसे शक्य आहे, हे प्रदर्शनाने दाखवून दिले.
आरोग्यविषयक व स्वच्छतेचाही संदेश
मासिक पाळीसंदर्भात सहजासहजी कोणी बोलत नाही व मुलींनाही मार्गदर्शन होत नाही. मात्र त्याबाबत योग्य माहिती मिळावी म्हणून ‘संवाद मासिक पाळीशी’ असा आरोग्यविषयक संदेश देणारी माहितीही येथे उपलब्ध करून देण्यात आली होती. या ठिकाणी पाळी दरम्यान कशी काळजी घ्यावी याचे पत्रक ठेवण्यात येऊन काळजी न घेतल्यास काय परिणाम होतो हे सापशिडीच्या माध्यामातून दाखविण्यात आले. सोबतच ‘निर्मल’ या उपक्रमाद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत त्या विषयी असलेल्या गाण्यांच्या ओळी भेट देणा-यांनी आवर्जून वाचल्या.
संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रदर्शनास शहरवासीयांनी मोठ्या संख्येने भेट देऊन चिमुकल्यांचे तोंडभरुन कौतूक केले. सोबतच संस्थेच्या उपक्रमास दाद दिली. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत शहरवासीयांची रिघ कायम होती.

Web Title: Dwelling residents of the slum children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.