ठळक मुद्देउपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये उडाले खटकेसर्व सदस्यांना लवरकच निधी वितरण करू जि.प.अध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१३,जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेला ४० कोटींतुन चार महिने उलटूनही कोणतेही काम न झाल्याने हा निधी खर्च न झाल्यास परत जाण्याची भिती असल्याचे ‘लोकमत’ ने १३ सप्टेंबर रोजीच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावर बुधवारी जि.प.सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना चांगलेच धारेवर धरत या निधीचे वितरण करण्याची मागणी केली. तसेच या निधीवरुन भाजपाचे जि.प.सदस्य व अध्यक्षांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती जि.प.सुत्रांनी दिली आहे. 


जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला २०१८ या वर्षासाठी विभागनिहाय देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामासाठी एकूण अंदाजे चाळीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र चार महिने उलटून देखील या निधीतील रक्कम जि.प.सदस्यांना मिळालेली नाही. त्यामुळे जि.प.सदस्यांमध्ये चांगलीच नाराजी आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या सदस्यांमध्ये नाराजी वाढली असून, जि.प.अध्यक्षांकडून दुर्लक्ष होत असल्याचेही सदस्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. 


उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये उडाले खटके
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाची पाहणी करताना, काही सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीकडून मंजुर झालेल्या निधीबाबत जि.प.अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच जि.प.अध्यक्षा कार्यालयात येत नसल्याने निधीचे वितरण होत नसल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केला. त्यावर जि.प.अध्यक्षांनी सदस्यांचा आरोपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या चेंबरमध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे, सदस्या पल्लवी सावकारे, माधुरी अत्तरदे, प्रताप पाटील व जयपाल बोदडे आदी उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्षा व सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. 


निधीचे लवकरच नियोजन करणार
त्यानंतर जि.प.अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेवून, जिल्हा नियोजन मंडळाकडून ४० कोटीचा निधी मंजूर झाला असला तरी या निधीला शासनाने ३० टक्के कात्री लावली आहे. तसेच त्या निधीमध्ये गेल्या वर्षाचे दायित्व असल्यामुळे निधी तोकडा पडणार असल्याचे अध्यक्षा उज्वला पाटील यांनी सांगितले.यावेळी जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोरमहाजन, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, शिक्षण सभापती पोपट भोळे, आरोग्य सभापती दिलीप पाटील व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर आदी उपस्थित होते. तसेच निधी बाबत पालकमंत्र्यांकडे दोन वेळा प्रस्ताव दिले असून, पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला  असून, निधी वाढवून मिळण्याची अपेक्षा असल्याची जि.प.अध्यक्षांनी दिली. 

चार विभागाच्या निधीचे नियोजन बाकी
जिल्हा परिषदेच्या नागरी सुविधा, जनसुविधा, तिर्थक्षेत्र व ग्रामिण रस्ते यांचे नियोजन बाकी असल्याची माहिती उज्वला पाटील यांनी दिली. या चार हेडवर निधी असला तरी देणे बाकी आहे. अधिक प्रस्ताव व निधी कमी असल्याने अडचण आहे. मात्र निधीचे तात्काळ नियोजन करून निधी वितरीत केला जाणार आहे. नागरी सुविधाला १ कोटीचा निधी आहे. जाहीर झाला मात्र त्यात ३० टक्के कपात होवून ७० लाख मिळणार आहेत.जनसुविधेसाठी २ कोटी ४५ मंजूर आहेत. मात्र खर्चासाठी १ कोटी ६५ मिळणार आहे. तर ग्रामीण रस्त्यासाठी मंजूर ९ कोटीमधून ६ कोटी तर तिर्थक्षेत्राच्या २ कोटीतून खर्चासाठी १ कोटी २५ लाख उपलब्ध होणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.