जळगाव - एरंडोल तालुक्यातील कढोली येथील दत्तात्रय त्र्यंबक पाटील (वय-६०) व जामनेर तालुक्यातील वाघरी येथील तुळसाबाई दिलीप गायकवाड (वय-३०) या जळीत रुग्णांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघे जण ५७ टक्के जळाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते.

दुचाकी लांबविली
जळगाव-अजिंठा चौफुली परिसरातील हॉटेल मानसजवळ लावलेली एमएच १९ बीटी २७९० ही दुचाकी अज्ञात चोरट्याने २९ रोजी रात्री ९ वाजता गायब केली. या प्रकरणी गिरीश अशोक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तपास साहाय्यक फौजदार आरिफ शेख करीत आहेत.
प्रसाद महाराजांचे आगमन
जळगाव-अमळनेर येथील श्री सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांचे १ जून रोजी जळगावात आगमन होत आहे. यावेळी पिंप्राळा, खोटे नगर, इंद्रप्रस्थ नगरात पानसुपारीचा कार्यक्रम होईल. पानसुपारीसाठी आमंत्रित करण्यासाठी राजेश बंगाली, संदीप कासार, संदीप जोशी यांच्याशी संपर्क साधावा. ४ जून रोजी ते पुण्याकडे रवाना होणार आहेत.

चक्रधर भाग्यवंत यांना श्रद्धांजली
जळगाव-महाराष्ट्र राज्य वैद्यकीय विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे सदस्य चक्रधर भाग्यवंत, त्यांची पत्नी रेखा भाग्यवंत, मुलगी यांचा बाबा ट्रॅव्हलला लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याने संघटनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घर खाली करण्यावरून वाद
जळगाव- गेंदालाल मिल भागात पार्वताबाई गोविंदा सोनवणे (वय-६५) यांनी घर खाली करण्यास सांगितल्यावरून गोकुळ बुधा अहिरे, मंगला अहिरे यांनी शिविगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तपास हे.कॉ.बळीराम तायडे करीत आहेत.

वाहन लावण्यावरून वाद
जळगाव-नटवर थिएटरसमोरील नंदकुमार वाघ यांच्या दुकानासमोर जयविजय गोविंदा निकम, त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी २७ रोजी संध्याकाळी ७ वाजता दुचाकी लावली. तक्रारदार वाघ यांनी दुचाकी दुसरीकडे लावण्यास सांगितल्याने तिघांनी शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.