परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:36 PM2017-09-21T23:36:35+5:302017-09-21T23:38:08+5:30

एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी : चाळीसगावात गाय मृत्यूमुखी, गिरणा नदीला प्रथमच पूर, एरंडोल तालुक्यात बैल, वासराचा मृत्यू

Crop damage due to back rain | परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

Next
ठळक मुद्देकाही गावांचा संपर्क तुटलाअग्नावती, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य साठाअधून-मधून पडतोय पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी संध्याकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने केळी व कपाशीचे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहे. गेल्या २४ तासात विक्रमी ४४१.४ मि.मी.इतका एकूण पाऊस जिल्ह्यात झाला. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ७८ मि.मी. पाऊस झाला.
चाळीसगाव तालुक्यात गाय तर एरंडोल तालुक्यात बैल व वासराचा या परतीच्या पावसामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे यंदाच्या मोसमात प्रथमच गिरणा नदीला पूर आला असून दापोरा तसेच कांताई बंधारा ओसंडून वाहत आहे.
एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी झाली असून या तालुक्याची सरासरी शंभरीपर्यंत पोहचण्यास केवळ २.१ टक्के पावसाची गरज असल्याचेही चित्र आहे. तर धरणसाठ्यातही वाढ झाली आहे.
बुधवार, २० सप्टेंबर संध्याकाळपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली व तो अधून-मधून सकाळपर्यंत सुरूच होता. यंदाच्या मोसमात गिरणा नदीला पहिल्यांदा पूर आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.
पिकांचे नुकसान
जिल्ह्यात या परतीच्या पावसाने केळी, कपाशी पिकाचे नुकसान केले असून त्याचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहे. हे पंचनामे पूर्ण झालेले नसल्याने नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ७८ मि.मी. पाऊस झाला तर सर्वात कमी ९.२ मि.मी. पाऊस पारोळा तालुक्यात झाला.
चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा
जिल्ह्यातील मोठ्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली असली तरी चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. हतनूर धरणात ८१.१८, गिरणा धरणात ६४.३३ तर वाघूर धरणात ६९.३१ टक्के जलसाठा आहे. अग्नावती, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. गेल्या आठवड्यात शून्य टक्के असलेल्या हिवरा, बहुळा प्रकल्पामध्ये अनुक्रमे १६.३१ व ३.७९ टक्के जलसाठा झाला आहे. अंजनी प्रकल्पातील साठा केवळ ४.२८ टक्केच आहे.
धुळ्यात अर्ज भरणाºयांवर पाऊस
शिरपूर तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. एकाच दिवसात ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. शिरपुरात रात्री साडेआठ वाजेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते़ तहसील कार्यालयासमोरही पाणी साचले़ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरणाºयांनी तोबा गर्दी केली होती़ पाणी साचल्यामुळे इच्छुक उमेदवारांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागला़
नंदुरबार चारशे हेक्टरचे नुकसान
जिल्ह्यात तळोदा, शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील काही भागात ऊस व मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. साधारणत: साडेतीनशे ते चारशे हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
धडगाव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर नंदुरबार व तळोदा तालुकादेखील सरासरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील चार मध्यम व ३७ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे.
गावांचा संपर्क तुटला
गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दापोरी, रवंजा, खर्ची या परिसरातून जळगावला येण्यासाठी सोयीचा असलेला मार्ग बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला.
रावेर तालुक्यात संततधार
रावेर शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या पावसाची संततधार गुरुवारी सुरू होती. दरम्यान ४४. ४२ मि.मी. पाऊस झाला. आता ८९.७८ टक्के पर्जन्यमान गाठले आहे. सुकी धरण ९६.६४ टक्के भरले आहे. ०.९४ मिटरचा अनुशेष बाकी आहे. आभोडा ८५.४२ टक्के भरले. ते ०.८० मीटरने खाली आहे. दोन्ही धरणे भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने कमी अधिक जोराने हजेरी लावली आहे.
यावलला ५० लाखांचे नुकसान
तालुक्यात बुधवारी सांयकाळी झालेल्या एक तास वादळी पावसाने यावल शहरासह तालुक्यातील निमगाव येथील सुमारे १ हजार हेक्टर शेतीतील ज्वारी, कपाशी, मका, व केळी पिकाचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त भागात पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. येथे एका तासात ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
टेंभी शिवारात असलेल्या राजकुमार पाटील व काशीनाथ पाटील यांच्या ६ हजार केळीच्या खोडांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासह इतरही १२ ते १५ शेतकºयांच्या कपाशीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील बळीराजाचा पुन्हा बळी गेला आहे. शेतकºयांकडून पंचनामे करण्याची मागणी होत आहे़

पंचनाम्यासाठी तलाठी व कृषी सहायक जात आहेत़ शेतकºयांनी पीकविमा कंपनीकडे तक्रार नोंदवून पंचनामा करवून घ्यावा. आम्हीही प्रयत्न करितच आहोत.
- कुंदन हिरे, तहसीलदार, यावल.
हतनूरचे २० दरवाजे उघडले
भुसावळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तापीनदीवरील हतनूर धरणाचे ४१ पैकी वीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे.

Web Title: Crop damage due to back rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.