जळगाव व रावेर दोन्ही जागा राष्ट्रीवादीकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:05 PM2019-01-20T12:05:40+5:302019-01-20T12:08:49+5:30

अजित पवार यांची माहिती

Both the Jalgaon and the Raver are reserved for the nationalists | जळगाव व रावेर दोन्ही जागा राष्ट्रीवादीकडेच

जळगाव व रावेर दोन्ही जागा राष्ट्रीवादीकडेच

Next
ठळक मुद्देउमेदवारी बाबत अद्याप काहीही ठरलेले नाहीअ‍ॅड. निकम यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही


जळगाव : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी निश्चतच असून राज्यातील ४८ पैकी पुणे, औरंगाबाद, जालना आणि रत्नागिरी या चार जागा सोडल्या तर इतर ४४ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. यानुसार जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडेच राहतील, असा निर्वाळा दिला. तसेच या ठिकाणी उमेदवारी बाबत अद्याप काहीही ठरले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या ‘परिवर्तन’ यात्रेच्या निमित्ताने हे नेते जळगावात शुक्रवारी आले होते. शनिवारी दुपारी चोपड्याकडे रवाना झाले, तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यालयात शनिवारी सकाळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होत. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, राज्य महिलाध्यक्षा फौजिया खान, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महानगर अध्यक्ष नामदेवराव पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, महिला महानगराध्यक्षा निला चौधरी, सविता बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार यांनी सांगितले की, आघाडी झालीच आहे फक्त इतर आणखी कोणत्या पक्षांचा समावेश यात करायचा हे ठरायचे बाकी आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याच्या प्रयत्न असून इतर सोबत येणाऱ्या पक्षांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून त्यांना जागा देतील. दरम्यान खडसे हे भाजपातच असल्याने त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांनाा उमेदवारी देण्याबाबत काहीही विचार करण्याचा प्रश्नच नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी होणाºया चर्चेबाबत दिले.
ईश्वरलाल जैन यांचे मत हे पक्षाचे मत नाही
जामनेर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी खासदार यांनी भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या, यासंदर्भात पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जैन यांचे वक्तव्य किंवा मत हे पक्षाचे नसून त्यांचे वैयक्तीक आहे.त्या वक्तव्याला फारसे महत्व नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

बोंड अळीच्या नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करणार
बोंड अळीमुळे झालेली नुकसान भरपाई ही देण्यात आली आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली असली तरी जिल्ह्यात अनेकांना ही भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी आपण मंत्रालयात याचा पाठपुरावा करु, असेही अजित पवार यांनी सांगितले.
शेवटच्या क्षणी युती होण्याची शक्यता
भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता जरी भांडत असले तरी त्यांना माहीत आहे, की आपण स्वतंत्र लढलो तर काही खरे नाही. यामुळे हे दोन्ही पक्ष ऐन निवडणुकीच्या दरम्यान एकत्र येतील व युती करतील, अशी शक्यता पवार यांनी वर्तवली.
आता अनेक घोषणा होतील
यावेळी पवार म्हणाले की, भाजपाचे आतपासूनच चुनावी जुमले सुरु झाले आहेत. वेगवेगळ्या महामंडळांना ७०० कोटी त्यांनी जाहीर केले मात्र अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मान्यता मिळाल्यावरच ते देता येतील परंतु तो पर्यंत आचारसंहिता लागू होईल. यामुळे हे पैसे देतातच येणार नाही. अशाच प्रकारे आता अनेक घोषणा आता होतील.
‘ते’ भारतीय कसले- भुजबळ
भाजपाने मुस्लीम, दलित आदी समाजांचा द्वेषच केला आहे. भारतीय संविधान आणि संस्कृती हे शिकवत नाही, त्यामुळे ते भारतीय कसेले? असा सवालही छगन भुजबळ यांनी करीत भाजपाने या समाजांवर अन्यायच केला असल्याचा आरोप केला.
महिला आघाडी मुख्यमंत्र्यांना घुंगरु पाठविणार
राज्य सरकाने न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यानेच राज्यात डान्सबारला न्यायालयाकडून परवानगी दिली असून यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील. सरकार आणि डान्सबारचालक यांची मिलिभगत असल्याचा आरोप करीत याचा निषेध म्हणून महिला आघाडीतर्फे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना कुरिअरने घुंघरु पाठविणार असल्याचे फौजिया खान यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
रावेरची जागा मिळण्याची काँग्रेसला खात्री
जिल्ह्यातील दोन जागांपैकी एकेक जागा दोन्ही पक्षाला मिळाल्यास ते दोन्ही पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर राहील व रावेरची जागा काँग्रससाठीच घेतली जाईल, असे आश्वासन आम्हाला वरिष्ठांनी दिले आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी अजित पवार यांच्या विधानासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना दिली. या जागेसाठी त्यांच्यापेक्षा चांगले उमेदवार आमच्याकडेच असल्याचेही ते म्हणाले.
अ‍ॅड. निकम यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने विचार केल्यावर आमच्याकडे उमेदवार नाहीत का? असा अर्थ काढला जाणे चुकीचे आहे. अनेकदा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना संधी दिली जाते. त्यानुसारच आमचा हा प्रयत्न आहे. ही उमेदवारी स्वीकारण्याबाबत अ‍ॅड. निकम यांनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाबाबत बनवाबनवी
५० टक्के पेक्षा आरक्षण देता येणार नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी मागे म्हटले असताना आता सवर्णांना आरक्षण जाहीर केले आहे, तर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ते न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे सांगत शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही परवानगीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने हा विषयही ताटकळला असल्याचा आरोप पवार यांनी केला.

Web Title: Both the Jalgaon and the Raver are reserved for the nationalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.