सत्ता राबविण्याचे भाजपापुढे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:49 AM2018-12-16T11:49:29+5:302018-12-16T11:49:45+5:30

खान्देशात भाजपाला यश मिळत आहे. एकापाठोपाठ एक संस्था ताब्यात येत आहेत. या ताब्यात आलेल्या संस्थांमधील सत्ता नीटपणे राबविली जात आहे किंवा नाही, हे बघण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जळगावात हे प्रामुख्याने जाणवत आहे.

Big challenge for BJP to dominate power | सत्ता राबविण्याचे भाजपापुढे मोठे आव्हान

सत्ता राबविण्याचे भाजपापुढे मोठे आव्हान

Next

मिलिंद कुळकर्णी
जळगाव : एखाद्या संस्थेमध्ये सत्ता येण्यासाठी जेव्हा सर्व राजकीय पक्षांमधून वजनदार आणि महत्त्वाकांक्षी मंडळी वेचून घेतली जातात, त्या मंडळींचा उपयोग सत्ता राबविण्यासाठी होत नसेल तर गोंधळाचे वातावरण निर्माण होते. जळगावच्या जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सध्या हेच सुरु आहे. विरोधकांपेक्षा सत्ताधारी मंडळीच पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणत आहे. पाच राज्यातील अपयशाचे विचारमंथन करताना भाजपाने या गोष्टींचा विचारदेखील करायला हवा. अन्यथा अवघड आहे.
शेंदुर्णी (ता.जामनेर) नगरपंचायत आणि धुळे महापालिका निवडणुकीतील भाजपाचा दणदणीत विजय हा एका दिवसाचा आनंद ठरला. कारण मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी पट्टयातील भाजपाची सत्ता उलथवून टाकण्यात काँग्रेस आणि विशेषत: राहुल गांधी यशस्वी ठरल्याने भाजपाच्या मंडळींच्या आनंदावर विरजण पडले. धुळ्यात प्रथमच भाजपा स्वबळावर सत्तेत आली आहे तर शेंदुर्णी त्यांनी चांगल्या रितीने ताब्यात ठेवले आहे. हे विजय अर्थात महाजनांच्या खात्यात जातात.
गेल्या आठवड्यातील दोन घटना राजकीय क्षेत्रात भूकंप घडविणाºया ठरल्या. सोमवारी धुळे महापालिका आणि शेंदुर्णी (ता.जामनेर) नगरपंचायत निवडणुकांचा निकाल घोषित झाला. दोन्ही ठिकाणी भाजपाने दणदणीत विजय मिळविला. जळगावपाठोपाठ खान्देशातील दुसरीदेखील महापालिका भाजपाने ताब्यात घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यादृष्टीने दोन्ही ठिकाणचे विजय महत्त्वाचे होते.
धुळ्याच्या निकालाची अनेक वैशिष्टये आहेत. पूर्वीच्या जनसंघ आणि आताच्या भाजपामध्ये अनेक दिग्गज कार्यकर्ते कार्यरत होते. उत्तमराव पाटील, काकाजी शर्मा, लखन भतवाल, धरमचंद चोरडीया, दिलवरसिंग पाडवी, डॉ.सुहास नटावदकर, डॉ.कांतीलाल टाटीया या दिग्गजांनी संयुक्त धुळे जिल्ह्यात जनसामान्यांसाठी लढे उभाारले.
पक्ष खेडोपाडी पोहोचवला. मात्र कॉंग्रेससारख्या बलाढ्य पक्षापुढे जनसंघ-भाजपाचे काही चालले नाही. उत्तमराव पाटील, दिलवरसिंग पाडवी, गोविंदराव चौधरी यांच्यासारखे नेते सत्तेच्या वर्तुळापर्यंत पोहोचू शकले. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळणे कठीण होते.
धुळे महापालिकेत मंजुळा गावीत यांच्यारुपाने महापौरपद भाजपाने मिळविले होते. जयकुमार रावल यांच्या पुढाकाराने झालेल्या या खेळीला निर्भेळ यश म्हणता येणार नाही. तसेच अवघे तीन नगरसेवक असताना याचवर्षी मिळविलेले स्थायी समितीचे सभापतीपद त्याच प्रकारातले होते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भाजपामधील अंतर्गत गटबाजीचा निकाल या निवडणुकीने दिला आहे. आमदार अनिल गोटे हे या ना त्या कारणाने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना लक्ष्य करीत असल्याने पक्षात सुंदोपसुंदी सुरु होती. या निकालाने भाजपा आणि गोटे यांची फारकत स्पष्ट झाली. डॉ.भामरे आणि रावल हे आता जिल्ह्याचे एकमुखी नेतृत्व असल्याचे या निवडणुकीने सिध्द केले आहे.
गिरीश महाजन यांच्यावर खान्देशचे नेते म्हणून या निवडणुकीने शिक्कामोर्तब केला आहे. खडसे यांची जागा आता त्यांनी घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वी ते नंदुरबारचे पालकमंत्री होते. आता धुळे आणि जळगावात त्यांचाच शब्द प्रमाण मानला जातो. त्यामुळे वेगळे काही सांगायची गरज नाही. नाशिकचे पालकमंत्री असल्याने उत्तर महाराष्टÑाचे नेते असा त्यांचा उल्लेख समर्थक करीत असले तरी नगरमधील अपयशाचे काय, हा प्रश्न पुढे येतोच. तेथे महाजन हे प्रभारी नसले तरी उत्तर महाराष्टÑातील चार पैकी तीन महापालिका भाजपाकडे आहेत, हे यश मोठे आहेच. नगरचीच काय अगदी गमावलेल्या तीन राज्यांची जबाबदारीदेखील महाजन यांच्यावर सोपवायला पाहिजे होती, हे दुसºयादिवशी प्रसारीत झालेल्या विनोदाचा मथीतार्थ लक्षणीय आहे.
शेंदुर्णीतील यश निश्चितच कौतुकास्पद आहे. नगरपंचायतच्या या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादी प्रथमच एकदिलाने कार्यरत होते. गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये फंदाफितुरी होती. जामनेरपाठोपाठ शेंदुर्णीत यश मिळवून महाजन यांनी मतदारसंघाचा गडकोट मजबूत केला आहे.
धुळ्यातील निकालानंतर भाजपाच्या सर्व ५० नगरसेवकांना घेऊन नेते मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. तेथे मुख्यमंत्र्यांनी आनंद जसा व्यक्त केला तसे कानदेखील टोचले.
सरकार निधी उपलब्ध करुन देईन, पण टक्केवारी चालणार नाही. गैरव्यवहार झाला, तर महापालिका बरखास्त करायला मागेपुढे पहाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या विधानाला तीन राज्यातील पराभवाची पार्श्वभूमी आहे, हे उघड आहे. शतप्रतिशत झाल्यानंतर सत्ता टिकवून ठेवणे अवघड असते.
सत्ता राबविणे खूप महत्त्वाचे असते. नंदुरबार, धुळे जिल्ह्यात भाजपाकडे संपूर्ण सत्ता नाही, पण जळगावात तसे नाही. सर्वत्र भाजपा असताना ‘अँटी इनकम्बन्सी’ फॅक्टर याठिकाणी प्रभावी ठरु शकतो. केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक संस्थांमध्ये भाजपा सत्तेवर असताना समस्या, अडचणी कायम असतील तर जनतेची नाराजी भाजपाला सहन करावी लागेल. हे लक्षात घ्यायला हवे.
जळगावात अ‍ँटी इन्कम्बन्सी?
मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर पाहता हा निकष जळगावसाठी लागू तर होणार नाही ना, अशी गंभीर चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. गेल्या २५ वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात जिल्हा परिषद, काही पालिका, दोन्ही खासदार, निम्मे आमदार, अलिकडे जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, साखर कारखाने आहेत. त्यांच्या कारभारावर जनता खूश आहे का, याचा कानोसा घेतला जात आहे.

Web Title: Big challenge for BJP to dominate power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.