जळगावात श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवात भारूडांनी रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:47 PM2018-11-12T12:47:27+5:302018-11-12T12:48:58+5:30

वावडद्यातील ओम साई भजनी मंडळाचा पुढाकार

Bharud painted the festival at the festival of Shriram temple in Jalgaon | जळगावात श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवात भारूडांनी रंगत

जळगावात श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवात भारूडांनी रंगत

googlenewsNext
ठळक मुद्देविविध सादरीकरण विशेष वेशभुषा

जळगाव : रथोत्सव हा लोकोत्सव व्हावा असेच पूर्वीपासून प्रयत्न आहेत. उत्सवादरम्यान सादर होणारी भारूडे ही लोककला खास आकर्षणाचे केंद्र बनत असून वावडदा येथील साई भजनी मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा देत भक्तगणांकडून दाद मिळवत आहेत.
श्रीराम मंदिर संस्थान हे जळगाव नगरीचे ग्रामदैवत असून मंदिराला लाभलेला धार्मिक व सांस्कृतिक वारसा हा अतिप्राचीन आहे. रथोत्सवाचे वेध लागले की त्या दरम्यान राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणाºयांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. श्रीराम मंदिरात तर पहाटे चार वाजेपासून दिवस सुरू होतो. सकाळची काकड आरती परिसरातील अन्य भक्तगणांना जाग आणते. मंदिरातील घंटेचा निनाद हा दूरवर ऐकू येतो. भक्तगणांकडून म्हटली जाणारी भजनेही उत्तमच. दुपारी महिला मंडळाकडूनही भजने सादर होतात. तुळशीची आरतीही महिला वर्ग मोठ्या उत्साहाने करतात. त्यानंतर सुरू होती ती सायंकाळची धावपळ. सायंकाळी निघणारे वहन म्हणजे उत्साहाला पारावार रहात नाही.
बालगोपाल, अबालवृद्ध, महिलांचीही यावेळी धडपड असते. आपापल्या परीने हातभार लावण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचीच प्रचिती येते. याच दरम्यान भारूडे सादर करणाºया मंडळाचीही लगबग सुरू असल्याचे दिसून येते. वावडदा येथील ओम साई भजनी मंडळाचा या उत्सवातील सहभाग गेल्या अनेक वर्षापासूनचा. सायंकाळी वहनोत्सव सुरू झाला की जणू मंडळाच्या कलावंतांमध्ये देव संचारतो. वहनाबरोबर जात असताना अभंग, गवळण, भारूड सादर करताना ही मंडळी तल्लीन होऊन जातात.
असे असते सादरीकरण
संबळ, मृदुंग, नाल, टाळ आणि पेटी असे या मंडळींचे वाद्य. संबळचा ताल घुमू लागला की पावले गतीन उचलली जातात. तीच प्रचिती येथे येते. सुरूवात होते ती अभंगाने. त्यानंतर गवळण होऊन भारूड सुरू होते. वाद्यांचा गजर अन् टाळ्यांचा गजर करत ही मंडळी नाचत असते. लोककलेचे हे सादरीकरण मोठी दाद मिळविणारे ठरत आहे.
विशेष वेशभुषा
डोक्यावर टोपी, अंगात पांडरे शुभ्र कपडे, गळ्यात लाल मफलर, कपाळी बुक्का..असा साधा पेहराव हे कलावंत करतात. सायंकाळी सात वाजता वहनाबरोबर कामाला सुरूवात होते ती रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असते. मध्यरात्री तीन वाजता ही मंडळी आपल्या घरी परतते. मात्र रथोत्सवाच्या उत्साहामुळे थकवा असा कधी जाणवत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
गमती जमती
सादरीकरणा दरम्यान केल्या जाणाºया गमती जमती उपस्थितांना खिळवून ठेवते व तेवढेच हसवतेही. त्यामुळे भारूड ते अभंग व गवळण असे सादर करताना उपस्थित अगदी खिळून असतात. उपस्थितांना तेथून उठून जाण्याची इच्छाही होत नाही. सादरीकरणादरम्यान कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची खबरदारी बाळगत असताना रथोत्सव हा एक लोकात्सव आहे त्याची परंपरा व शिस्त पाळण्याचाही मंडळी प्रयत्न करत असते.
जनजागृतीचे माध्यम
भारूड सादर करणारी ही मंडळी धार्मिकतेचा जागर करत असताना जनजागृती करण्याचाही प्रयत्न करत असते. त्यासाठीचे सादरीकरणही वेळोवेळी दाद मिळविणारे ठरत असल्याच्या भावना कलावंतांनी व्यक्त करत समाधान व्यक्त केले.
यांचा असतो सहभाग
वाल्मीक गोपाळ, भास्कर गोपाळ, छगन गोपाळ, दीपक गोपाळ, विशाल गोपाळ, जगदीश गोपाळ, संदीप गोपाळ, कृष्णा गोपाळ, शुभम् राजपूत, भाऊसाहेब पाटील, सूजर गोपाळ, सुरेश गोपाळ, मुकेश ठाकरे हे उत्कृष्ठ सादरीकरण करतात. दिलीप सोनवणे, जितेंद्र वाळके, केशव बारी, गोकूळ साळुंखे हे पालखीधारी म्हणून तर जगन्नाथ दामू हे चोपदार म्हणून जबाबदारी संभाळतात.

Web Title: Bharud painted the festival at the festival of Shriram temple in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.