Baramatikar's googly wins in BJP | बारामतीकरांच्या गुगलीने भाजपात कल्लोळ
बारामतीकरांच्या गुगलीने भाजपात कल्लोळ

ठळक मुद्देधसका कशासाठी?

मिलिंद कुलकर्णी
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा राष्टÑवादी काँग्रेसच्या बैठकीत झाली आणि भाजपाच्या बालेकिल्ल्यात संशयकल्लोळ आणि खळबळ माजली. या वातावरणात संकटमोचकांंचा ‘बारामती’ जिंकण्याचा साहसवाद फार कुणी गांभीर्याने घेतला नाही. राहुल गांधी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी चर्चेला गेल्याने आघाडी निश्चित असून त्यात पवारांच्या शब्दाला मान राहणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजपाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसची अवस्था बिकट अशीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीला उसने अवसान घेऊन सामोरे जात आहे. सक्षम उमेदवाराचा दोन्ही ठिकाणी अभाव असताना जागा कुणाकडे याविषयी काथ्याकुट सुरु आहे. दोन्ही पक्षांची ही वास्तव स्थिती पक्षश्रेष्ठींना माहित असल्याने त्यांनी जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघासाठी वेगळी रणनीती अवलंबण्याचे ठरवलेले दिसते.
या रणनीतीचा भाग म्हणून शरद पवार यांनी मुंबईत खान्देशातील चार जागांचा आढावा घेतला. पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याचे लक्षात आल्याने जळगावसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम तर रावेरसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाविषयी चर्चा झाल्याची माहिती बाहेर आली आहे. खडसे हे भाजपामध्ये असले तरी नाराज आहेत. त्यांनी पक्षत्यागाचा वारंवार इन्कार केला असलेला तरी ते रक्षा खडसे यांना भाजपाची उमेवारी न मिळाल्यास वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त होत असल्याने राष्टÑवादीच्या बैठकीत त्यांच्या नावाची चर्चा झाली असावी. निकम यांचे नाव चर्चेत आणून पवार यांनी चाचपणी केली असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
चोपडा येथे पत्रकार दिनाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात अरुणभाई गुजराथी आणि अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची भेट झाली. पवार यांनी जबाबदारी सोपविल्याने गुजराथी यांनी निकमांना पक्षाचा अधिकृत प्रस्ताव दिला. सक्रीय राजकारणात येण्याचा विचार नाही. परंतु, कुटुंबियांशी विचारविनिमय करुन निर्णय घेऊ, असे मोघम उत्तर निकम यांनी दिले.
अ‍ॅड.उज्ज्वल निकम हे प्रसिध्द कायदेतज्ज्ञ आहेत. अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पक्षीय बंधनात ते आतापर्यंत अडकलेले नाही. अर्थात राजकारण हे निकम कुटुंबियाला काही नवीन नाही. त्यांचे वडील बॅरिस्टर निकम हे चोपड्यातून विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्यांचे बंधू दिलीपराव, यशवंतराव, वहिनी शैलजाताई हे अनेक वर्षे राजकारणात सक्रीय आहेत. गोव्यातील शांताराम नाईक, खलप या मातब्बर राजकीय कुटुंबाशी त्यांचा नातेसंबंध आहे. तरीही स्वत: निकम यांनी कधीही कोणत्याही राजकीय व्यासपीठावर जाण्याचे कटाक्षाने टाळलेले आहे.
सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांशी त्यांचा स्रेह आहे. राजकीय पक्षाच्या चौकटीत ते बंदिस्त झालेले नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी गाजलेल्या खटल्यांसाठी सरकार आणि जनतेकडून त्यांच्याच नावाची शिफारस, मागणी केली जाते. हा एका अर्थाने त्यांच्या कार्यकर्त्तृत्वाचा सन्मान आहे. या पार्श्वभूमीवर निकम हे काय निर्णय घेतात, याची उत्सुकता राजकीय मंडळींसोबतच सामान्य जनतेला राहणार आहे.
पवार यांनी ही गुगली टाकून भाजपामध्ये गोंधळ, संभ्रमाचे वातावरण तयार करण्यात जसे यश मिळविले तसे दोन्ही काँग्रेसमधील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवार आणि केवळ विधानसभा निवडणूकच लढविणार असा हेका धरुन बसलेल्या स्वपक्षीय उमेदवारांना धोक्याचा इशारा दिला आहे. पक्षाकडे अनेक पर्याय आहेत, असा संदेश त्यांनी या कृतीतून दिला आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक उदय भालेराव यांच्यापासून तर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यापर्यंत अनेक नेते, कार्यकर्त्यांनी निकम यांनी पक्षीय राजकारणात पडू नये, असे आवाहन केले आहे.
जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला असेल तर भाजपाला अ‍ॅड.निकम यांच्या संभाव्य उमेदवारीची भीती का वाटावी, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
यापूर्वी अनेक सरकारी अधिकारी, सरकारी वकील यांनी पदाचा त्याग करुन सक्रीय राजकारणात भाग घेतलेला आहे. भाजपाच्या विद्यमान केंद्र सरकारमध्ये अनेक निवृत्त सनदी अधिकारी, अभिनेते, खेळाडू सहभागी आहेतच. त्यासोबतच अनेक जण खासदार म्हणून भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत.
भाजपाच काय सर्वच पक्षांच्या चिन्हावर या मंडळींनी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे निकम हे काही पहिले व्यक्ती ठरणार नाही.
जळगाव, धुळ्यातील महापालिका निवडणुका आणि नगरमधील महापौर निवडणूक जिंकल्याने गिरीश महाजन हे जोमात आहेत. पक्षाने जबाबदारी दिल्यास बारामती जिंकून दाखवेन असे विधान त्यांनी काळखेडा येथील एका कार्यक्रमात केले. जलसंपदा खाते स्विकारल्यापासून महाजन यांना बारामती आणि पवार यांच्याविषयी विशेष जिव्हाळा असल्याचे वारंवार दिसून आले. अजितदादांचे खाते माझ्याकडे आहे, असे ते सांगतात. पण बारामती हे वेगळेच रसायन आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
धसका कशासाठी?
शरद पवार यांच्या एका गुगलीने खान्देशातील भाजपा नेते त्रिफळाचित झाले. निकम यांनी सक्रीय राजकारणात पडू नये यापासून तर राष्टÑवादीकडे उमेदवार नसल्याने त्यांना निकम आठवले, इथपर्यंत भाजपा गोटात प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय समजंसपणाचा अभाव यातून दिसून आला. पवार, निकम यांच्यातील हा विषय असताना भाजपाने धसका घेण्याचे कारण आकलनापलिकडचे आहे.


Web Title: Baramatikar's googly wins in BJP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.