अक्षय तृतीया सण उत्साह उरला गाव-खेड्यापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 05:07 PM2019-05-07T17:07:58+5:302019-05-07T17:09:46+5:30

भारत हा विशाल देश आहे. येथे हिंदू, मुस्लीम, शीख, जैन, ख्रिस्ती, पारशी असे अनेक धर्मांचे लोक हजारो वर्षांपासून राहतात. प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या चालीरीती व परंपरा आहेत. हिंदू धर्म हा वैदिक धर्म म्हणून ओळखला जातो. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या चार वेदांत दिलेल्या सूत्रांनुसार जीवन जगण्याची रीत आहे. कोणतेही काम सफल व्हावे म्हणून काळ, वेळ निवडली जाते. म्हणूनच प्राचीन ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूर्वी वेगवेगळ्या ऋतूत मुहूर्त देऊन ठेवले आहेत. वसंत ऋतू आला म्हणजे गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करून निसर्गाचे स्वागत करायचे. जुनी पाने गळून नवी पालवी येणे, फुलांना बहार येणे जणू हा वसंतोत्सव साजरा केला जातो. शुभ कामाला सुरुवात करण्यासाठी मुहूर्त म्हणून गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दीपावली, दसरा, कार्तिक प्रतिपदा अशी साडेतीन मुहूर्त दिली आहेत. कार्तिक प्रतिपदा हे अर्ध मुहूर्त मानले जाते. यापैकी भारतीय संस्कृतीत वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे होत असले तरीही आखाजी या सणास एका वेगळ्या परंपरेची झालर आहे. एक विशिष्ट सण म्हणजे अक्षय तृतीया, ज्याचा नाश होत नाही ते ‘अक्षय’. वैशाख शुद्ध तृतीयेला ‘अक्षय तृतीया’ अर्थातच ‘आखाजी’ म्हटले जाते. अक्षय तृतीयेचे महत्त्व हे आगळेवेगळे आहे. अक्षय तृतीयेचा विविध दृष्टिकोनातून घेतलेला हा वेध.

Akshaya Tritiya San Joshi Urla Gaon-Khedi | अक्षय तृतीया सण उत्साह उरला गाव-खेड्यापुरता

अक्षय तृतीया सण उत्साह उरला गाव-खेड्यापुरता

Next
ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील निंभोरा, ता.रावेर येथील मूळ रहिवासी असलेल्या शरयू खाचणे यांनी अक्षय तृतीया आणि आजची स्थिती याचा घेतलेला मार्मिक आढावा.

श्राद्ध म्हणजे काय? ती अक्षय तृतीयेची घागर आणि लोटा कसले प्रतीक आहेत? ती रंगरंगोटी त्यावर का केली जाते? काही... काही माहिती नाही आजच्या पिढीला. फक्त परंपरेने चालत आलेला तो सण आहे म्हणून घरात गोडधोड भोजन बनवायचे म्हणजे सण. एवढे आज महानगरीय, शहरी तरुण पिढीला माहिती आहे. कारण बाकीचे सर्व सोपस्कार काही प्रमाणात का होईना गावाकडच्या घरी आजी-आजोबा करतात.
आपल्या पूर्वजांनी विविध सण-उत्सवांचे आयोजन अगदी विचारपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने केलेले आहे. जुन्या जाणकारांनी शेतीविषयक, जीवनविषयक, मनोवैज्ञानिक, शास्त्रीय अशा सर्व गोष्टींचा विचार करून विविध सण साजरे केले, पण कालानुरूप होणारे बदल पाहता मानवाच्या जगण्यात, विचारांमध्ये, दृष्टिकोनात जसजसे बदल घडत गेले तसतसे ह्या विविध सणांचे स्वरूपही बदलत गेले. त्यापैकी एक असणारा अक्षय तृतीया हा सण. अक्षय तृतीयेला घरातील जीवात्म्यांना, पितृदेवतांना आदरांजली म्हणून खरंतर पितृभोज देऊन श्राद्ध घालण्याची परंपरा आहे. दान-पुण्याचे महत्त्व असलेल्या या दिवशी असं म्हणतात की, देव्हाऱ्यात अक्षय तृतीयेला सोनं-चांदी, रुपये-पैसे ठेवल्यास ते अक्षय होते आणि त्यात सातत्याने वाढ होत जाते.
येणाºया हंगामाचा अंदाज देणारे ते अक्षय तृतीयेचे धान नोकरीसाठी बाहेर असणाºया आप्तस्वकीयांना, सासरी असणाºया लेकीबाळींना गावाच्या ओढीने आपल्या गोतावळ्यात आणत सुखाचा वर्षात करीत असे. पण आज धकाधकीच्या जीवनात तेही पारखं झालंय.
आजच्या आधुनिक जीवनशैलीने विविध सण-उत्सवही हळूहळू परिवर्तनाच्या वाटेवर चालत आहेत. आपल्या चौकोनी कुटुंबाप्रमाणे उत्सवांचे स्वरूपही बदलतेय आणि या बदलांचा स्वीकार आजकाल अपरिहार्य होतोय.
समृद्धी आणि मांगल्याचा अक्षय वर देणाºया या शुभमुहूर्तावर आजच्या काळाची गरज पाहता अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाने एक कलश भरून पाणी आणि पूर्व परंपरेने आलेले धान परमेश्वरापुढे ठेवावे आणि धनधान्य, त्याचबरोबर जल सुबत्तेचे वरदान मागावे. जेणेकरून संपूर्ण चराचराला त्याचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे आपापल्या परीने विद्वत्तेचा वसा हातात घेऊन अज्ञानाच्या अंधकारात असलेला एक तरी बालक शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्याच्या जीवनातला अंधकार दूर करण्याचा प्रण करावा. आजच्या सृष्टीची भीषण स्थिती लक्षात घेता दर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येकाने शक्य होतील तशी पाच-दहा झाडे लावून त्यांचे संगोपन करून संवर्धन करावे व या वैश्विक कृष्ण विवरच्या होऊ घातलेल्या समस्येच्या, पर्यावरणाच्या असमतोलाच्या निराकरणास हातभार लावावा, अशी अक्षय तृतीया प्रत्येकाने साजरी केल्यास खºया अर्थाने मानव प्राण्यासोबतही संपूर्ण धरतीसुद्धा पुन्हा वैभवशाली होईल.
-शरयू खाचणे

Web Title: Akshaya Tritiya San Joshi Urla Gaon-Khedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.