Aggressive army activist against Khadse | खडसे यांच्याविरुद्ध सेना कार्यकर्ते आक्रमक
खडसे यांच्याविरुद्ध सेना कार्यकर्ते आक्रमकमुक्ताईनगर : शिवसेना संपविण्याची भाषा करणारे एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबातील उमेदवाराचा शिवसैनिक प्रचार करणार नाहीत. ही भावना मातोश्रीपर्यंत पोहोचवावी या मागणीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर गुरुवार, २१ मार्च रोजी सकाळी तीन तास ठिय्या आंदोलन केले.
संतप्त शिवसैनिकांनी ज्यांच्याविरुद्ध संघर्ष करून पक्ष उभारला त्यांना मदत करावी तरी कशी, असा संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला. खडसे कुटुंबातील उमेदवाराला लोकसभेत मदत करणार नाही, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. राज्यात शिवसेना सत्तेत असताना शिवसैनिकांची अवस्था विरोधकासारखी राहिली. हे लोकसभेपुरते गोड बोलतील आणि विधानसभेत दगा फटका करतील. युती नकोच होती, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल बेलासवडी, ता.मुक्ताईनगर येथील शिवसैनिकांचा भाजपा प्रवेश करून शिवसेना संपविण्याचे काम करण्यात आले. लोकसभेत मदत तरी कशी करावी, हा प्रश्न आहे. शिवसैनिकांच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचविल्या जातील आणि त्यांच्या आदेशाने पुढील भूमिका स्पष्ट करू, असे पाटील यांनी सांगितले.


Web Title: Aggressive army activist against Khadse
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.